Tuesday, January 8, 2019

तेनाली रामकृष्णांच्या “हंपी” मधून...

भारतवर्षाचा सर्वसाधारण इतिहास आपणा सर्वांना काहीअंशी का होईना माहित आहेच. इथली अनेक साम्राज्ये उदयास आली, कालांतराने ती नष्टही झाली किंवा केली गेली. काही साम्राज्यांच्या उदयास प्रामुख्याने लढायांचा आणि तहांचा इतिहास आहे तर काही साम्राज्ये प्रस्थापित राजवटीचा संपूर्ण पाडाव करून उभी राहिलेली आढळतात. त्यातील काही साम्राज्ये संपूर्णपणे लोकाभिमुख राहिली तर काही नुसती सत्तापरस्थ! अशाच काही लोकाभिमुख साम्राज्यांपैकी एक म्हणजे राजा कृष्णदेवरायांचे “विजयनगर तथा हंपी”... काही शतकांच्या राजवटीनंतर हेही साम्राज्य बहामनी सुलतानांच्या आक्रमणाला बळी पडले आणि एक समृद्ध राजवटीची राजधानी उध्वस्त होवून पडली. आज हे भग्नावस्थेत असणारे शहर युनेस्कोने जागतिक वारसा “UNESCO - The United Nations Educational, Scientific and Cultural Organization” ने world heritage म्हणून घोषित केलेले आहे. इथल्या समृद्ध खाणाखूणा वाचविण्यासाठी जागतिक स्तरावर आणि आपल्या सरकारांचे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांस जगभरातून उदंड प्रतिसाद लाभत आहे.

प्रत्येक राजदरबारात एकतरी व्यक्ती असा असतो की तो त्या राज्याची ओळख बनतो आणि ती व्यक्ती चिरकाल स्मरणात राहते. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर ती संपूर्ण राजवट त्या एका नावापाशी वलयांकित होते आणि त्या राजवटीच्या राजदरबाराचे ते वलय होवून जाते. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे “तेनाली रामकृष्ण”... खरेतर तेनाली हे राजा कृष्णदेवरायाच्या दरबारातील विदुषक किंवा सोंगाड्या, ज्याकडे एकच जबाबदारी की राजाला आणि समस्त दरबाराला हसवून सोडायचे. राजा एखाद्या मोहिमेवरून किंवा राज्यकारभाराकडे पाहून थकून भागून दरबारात परत येई तेव्हा तेनाली त्यांना विनोदी किस्से सांगून हसवत असत जेणेकरून राजा आणि त्यावेळचे मंत्रीमंडळ ताणतणावातून बाहेर पडे. पुढे जावून हेच तेनाली राजा कृष्णदेवरायाच्या विश्वासास प्राप्त झाले आणि राजास राज्यकारभाराचे धडे देवू लागले, मुळात ते हुशार तर होतेच आणि हरहुन्नरी सुद्धा. आज विजयनगरचे साम्राज्य कुणाच्या लक्षात आहे की नाही हे सांगता येणार नाही, परंतु तेनाली हे नाव जवळजवळ सर्वांच्याच लक्षात आहे, हेच ते वलय...

२०१८ च्या वर्षअखेरीच्या सुट्ट्या साधून आणि वर्षभर काम करून थकलेले ७ + १ = ८ जीव बादामी आणि हंपी पाहण्याचा एक रग्गड बेत ठरवून निघण्याच्या तयारीत होते, तसे तर १५ जण होते परंतु त्यातले काही गळपटले. काहीजण बाईक राईड करण्यास सज्ज झाले तर काही कारमधून उनवारा न झेलता! बराच काथ्याकूट झाल्यावर माझेकडे निस्सान टरानोचे सारथ्य करण्याची जबाबदारी आली. आमचे डॉक्टर साहेब त्यांची रॉयल एन्फिल्ड बुलेट ३५० थंडरबर्डसहित सज्ज होतेच. नवीन सदस्य चैतन्य त्याची बजाज अवेंजर आणि बाकीच्या सदस्यांना घेवून आलेला सर्वेश उर्फ लेट लातीफांचा बादशहा बाकी भिडूंना घेवून भल्या पहाटे शिरवळ स्थित डॉक्टर सुनील धुमाळ साहेबांच्या हवेलीवर तब्बल दोन तास उशिरा पोहोचला, मला उशीर होण्यास काही कारण नव्हतेच, मी आधल्या रात्रीच येवून थांबलो होतो. चहा नाश्ता उरकून लगोलग सामान गाडीत भरले आणि निघण्याची तयारी झाली आणि सर्वेश येणार नसल्याचे कळले आणि सर्वांना एकच धक्का बसला. तो पुढच्या दिवशी आणखी एक धक्का देणार असल्याचे माहित नव्हते, म्हणूनच मी ७ + १ असे लिहिले आहे.

चालुक्यांची “बादामी” – भाग १ ला ...

दिवस १ ला – २९ डिसेंबर २०१८ – शिरवळ ते बादामी पर्यंतचा प्रवास...

सकाळी ०७:३० ला सर्वांनी आपापल्या वाहनांचे स्टार्टर मारले आणि शिरवळ ते बादामी असा ३६० किमी अंतराचा रग्गड प्रवास सुरु झाला, लक्ष होते बादामी आणि तिथला मुक्काम. माझ्या गाडीत देवा घाणेकर, राहुल सावंत आणि त्याचा संसार सौ. पल्लवी आणि मेव्हणी खुशी आणि मागच्या बाजूस सर्वांचे सामान असा लवाजमा होता. इतक्या सकाळी सकाळी रस्त्यावर वाहनांची भली वर्दळ झाली होती, गर्दीतून वाट काढत, खंबाटकीचा घाट, सातारा, कराड व कोल्हापूर मागे सारत आमच्या गाडीने महाराष्ट्र राज्याची सीमा निप्पाणी जवळ ओलांडली आणि कर्नाटक राज्यात प्रवेश केला. एव्हाना दुपारचे १२ वाजून गेले होते, सर्वांना भुकेचे डोहाळे लागले होते, देवाने फोनाफोनी करून बाईकवाले कुठं पोहोचलेत याची चौकशी केली, ते पुढे होतेच. मग एका कमी गर्दी असलेल्या ढाब्यावर आम्ही सर्वांनी अनपेक्षितपणे अप्रतिम अशा जेवणावर आडवा हात मारून घेतला. थोडा वेळ फोटोसेशन झाले आणि परत गाडीने बादामीच्या दिशेने कूच केले. जसे आम्ही कर्नाटक राज्यात प्रवेश करते झालो आणि एकाएक रस्त्यावरचे खड्डे गायब! इतके स्वच्छ आणि सपाट रस्ते की गाडी चालवतच राहावी असे वाटले. वाटेत महालिंगपूर, मुधोळ आणि इलकल ही ओळखीची गावे मागे टाकत आम्ही संध्याकाळच्या ४ च्या सुमारास बादामीमध्ये प्रवेश करते झालो. रेल्वे स्टेशनच्या बाजूने डाव्या बाजूस लाल-पांढऱ्या रंगाच्या कातळाची छोटेखानी डोंगररांग दृष्टीपथात आली. आपल्या लक्षात असेल तर दक्षिणेकडची “Rocky Mountain Range” ती हीच. त्याच डोंगररांगेत छोटीछोटी मंदिरे दिसू लागली होती. बादामी गाव मागे टाकून ४ किमी अंतरावर असणारे बनशंकरी देवीचे मंदिर गाठले, गाडी बदललेला देवा फक्त आमच्याबरोबर पोहोचला, डॉक्टर साहेबांच्या बुलेटने बागलकोट गाठले होते, अर्थात रस्ता थोडासा चुकला होता.

१.      बादामी -  

बनशंकरी देवी देशस्थ ब्राम्हणांची कुलस्वामिनी मानली जाते, देवीचे दर्शन घेवून मंदिराच्या समोरच असलेला बंदिस्त तलाव पाहून घेतला, हा तलाव एकेकाळी पाण्याने पूर्णक्षमतेने भरलेले असायचा असे स्थानिक लोकं सांगतात. हे एक बंदिस्त तळे असून बांधकाम आजही सुस्थितीत आहे, चारही बाजूंनी बांधलेली वैशिष्ट्यपूर्ण छताची कमान जिच्यातून पूर्ण उंचीचे लोकं सहजपणे चालत जावू शकतात. तळ्यात उतरण्यासाठी समान अंतरावर प्रवेशिका आणि तीन फूट उंचीच्या पायऱ्या. आजच्या काळात एवढं बांधकाम करायचे झाल्यास काही वर्षे तर नक्कीच लागतील. ज्यावेळी तळ्याच्या आतील भागातून फेरफटका मारताना पाणी पूर्ण भरले की बाहेर जाण्यासाठीच्या मोरीवजा जागा, एकूणच उत्कृष्ठ बांधकामाचा एक नमूना. आज हा तलाव पर्जन्यमान कमी झाल्यामुळे कोरडाठाक पडलेला आहे, लोकांनी त्याचा कचराकुंडी म्हणून वापर सुरु केलेला दिसतो काही ठिकाणी. मंदिराच्या अगदी समोर उंचच उंच दीपमाळ आहे, देवीच्या उत्सवावेळी तीवर दीपप्रज्वलन केले जाते. मंदिराच्या आत प्रवेश करताना दोन्ही बाजूस उंच दीपमाळा दिसतात, त्याअगोदरच्या मंडपाच्या छताला एक भलीमोठी घंटा अडकवलेली आहे, तीस उडी मारून वाजवण्याच्या सर्वांनी प्रयत्न केला खरा, घंटा वाजली ती फक्त माझ्याकडूनच. पुढे आत गेल्यावर देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश होतो, देवीस नमस्कार करून मंदिर प्रदक्षिणा घातली. एकूणच संध्याकाळ प्रसन्न झाली. मंदिराचे बांधकाम जवळून पाहिल्यास हेमाडपंथी वाटते. देवदर्शन झाल्यावर सर्वांनी परत तलावावर जावून आजच्या दिवसाचे शेवटचे फोटोसेशन उरकून घेतले. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भक्तनिवासात मुक्कामाची सोय केली, सायंकाळचे जेवण उरकून घेतले आणि परिसरात एक फेरफटका मारला. उद्याचा प्लान ठरला, सकाळी लवकर उठून बादामी केव्ह’ज, अगस्त्य तीर्थ, बादामी किल्ला नंतर पट्टदकल आणि आयहोळे उरकून होस्पेटमध्ये मुक्काम. हे सगळं ठरवून निद्रादेवीस अधिष्ठान घातले.

दिवस २ रा – ३० डिसेंबर २०१८ – बादामी, पट्टदकल, आयहोळे ते होस्पेट... 

दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ५ वाजता जागे झालो, लगोलग आवरून घेतले. सामान बांधले अन तडक शेजारचे हॉटेल गाठले. प्रत्येकी २ प्लेट उपमा आणि १ प्लेट शिरा दाबून घेतला, सोबत चहा आणि बनपाव होतेच. ०७:३० ला गाडी स्टार्ट केली अन बादामी केव्ह’ज कडे प्रस्थान ठेवले. वाटेत एके ठिकाणी डोंगरावर एका अनामिक मंदिराने लक्ष वेधले अन गाडीने तिकडे वळण घेतले सुद्धा, थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावर चार मोठाल्या दगडांच्यामध्ये एका बाजूला ते मंदिर आहे. इथं थोडा वेळ थांबलो आणि मग तडक केव्जकडे निघालो. १० मिनिटांच्या अंतरावर बादामी केव्ह’ज जवळ गाडी पार्क केली. तिकिटे काढली अन पहिल्या केव्हकडे निघालो. एकूण ४ केव्ह’जची ही मालिका आपल्याला विष्णूच्या १२ अवतारांची माहिती अधिक दगडांत कोरलेली सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. चारही गुहांची वर्णने खालीलप्रमाणे ...

गुंफा (गुहा) क्र. १ – ही गुहा तांडव नृत्य करणारा शंकर आणि नटराजास समर्पित आहे. गुहेत नटराज किंवा तांडवनृत्य करणारा शंकर असे शिल्प आहे. गुहेच्या मजल्यावर वेगवेगळ्या मुरुमांमधील वावटळीच्या गाण्यांचे शिलालेख दर्शविणाऱ्या अनेक पायऱ्यांवरून प्रवेश करता येतो. थोड्याच अंतरावर असलेल्या व्हरांड्यामध्ये पाच स्तंभांची पुतळे व फ्लोरीज आणि दागदागिन्यासहित शिल्पकला आहे. गुहेत तांडवनृत्य करणारा शंकर,  प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला नटराज म्हणून कोरण्यात आलेला आहे. सदर मूर्तीस 18 हात आहेत जी भौमितिक नमुन्यात मांडलेली नृत्य स्थिती अभिव्यक्त करतात, ज्यात अॅलिस बोनर - स्विस कला इतिहासकार आणि इंडोलालॉजिस्ट हे कालचक्र असल्याचे प्रतीक असलेले एक वेळ विभाजन आहे. अठरावे शस्त्र नाट्य मुद्रा (प्रतीकात्मक हात इशारे) डमरू, ज्वाला, मशाल, साप, एक ट्रॉइडेंट आणि कुल्हाडा अशा काही वस्तूंसह व्यक्त करतात. शिव त्याच्या मुलाचे गणेश आणि त्याच्या बाजूने नंदी बैल आहेत. नटराजांच्या संबंधात, भिंतीने म्हटलेल्या भित्ती-दैवी महिषासुरला ठार मारणारी शक्ती संस्कृती देवी दुर्गा दर्शविली आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला दोन हात असलेला शिव द्वारपाल असून तिचे खाली एक बाहुबली हत्ती आहे जिथे ते डोके शेअर करतात. मंडपाच्या आत आल्यावर गुहेत अर्ध-शिव आणि अर्ध-विष्णु शिल्पकला, हरिहराची कोरलेली शिल्पकला दिसते. तो देवी पार्वती आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित पक्षांवर विखुरलेला आहे. उजवीकडे भिंतीच्या दिशेने शिव आणि त्याची पत्नी पार्वतीची एक मूर्तीबद्ध प्रतिमा अर्धनारीश्वराची एक शिल्पकला आहे. पार्वतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मूर्तीपुढे दागिन्यांचे तबक ठेवणारा एक कर्मचारी आहे. अर्धनारीश्वरच्या पुढे अर्धा शिव दर्शवितो, नंदी बैल, आणि शिवलांचे भक्त कंकाल भृंगी आहेत. गुहेच्या आत शिवपुत्र गणेश आणि कार्तिकेय युद्ध व देवता चालुक्य घराण्यातील कुटूकीया आहेत. गुहेच्या कार्तिकेय एक मोर राशीत आहे. गुहेच्या छतावर पाच कोरलेली पटले असून नागराज दर्शविणारे मधले चित्र आणि दोन्ही बाजूला उडणारी जोडपे आहेत. डोके आणि दिवाळे व्यवस्थित तयार आहेत. दुसऱ्या खोलीत नर व मादी यांचे शिलालेख आहे. यक्ष म्हणजे यक्ष एक तलवार घेऊन जात आहे आणि मादी अप्सरा आहे. त्यानंतरच्या पॅनलमध्ये दोन लहान आकृत्यांचे आवरण आहे आणि शेवटी  कमळ बनवले जातात. सर्व आकृत्या अलंकारांनी सुशोभित केलेल्या व सजवलेल्या आहेत. सीमा व सभोवताली जनावरे व पक्ष्यांसह राहत आहेत. कमळ नक्षी ही एक सामान्य दृष्य आहे. छतावर विद्याधर जोडप्यांमधील प्रतिमा तसेच मैत्रीण आणि कामुक मिथुन दृश्यामधील जोडपे आहेत. गुहेच्या मागील भिंतीच्या कप्प्यातून अधिक कोरलेली प्रतिमा असलेली चौरस अभयारण्य आहे. मंडप मध्ये एक नंदी आहे ज्यामध्ये शिव लिंग असलेली गर्भघ्याय (सिक्रम अभयारण्य) आहे.

गुंफा (गुहा) क्र. २ – भगवान विष्णूला समर्पित या गुहेचे खोदकाम ६ व्या शतकात आणि इतर कोरीव शिल्पकाम ८ व्या शतकात पूर्ण करण्यात आले आहे. या गुहेच्या सुरुवातीला प्रवेश मंडप आणि नंतर कोरीव खांब असलेला मुख्य सभामंडप आहे तसेच सभामंडपाच्या नंतर गाभारा आहे. शांतसंयमी मुखमुद्रा आणि दोन बाहू असलेले दोन द्वारपाल गुहेच्या समोरच्या भागात कोरलेले आढळतात. गुहेच्या आतल्या भिंतीवर डाव्या बाजूला त्रिविक्रमी वामन तथा उजव्या बाजूस भू-वराह शिल्प कोरलेले आहे. याच वराह शिल्पाच्या पाठीवर आणि पायांवर विविध गणांची शिल्पे आढळतात. गुहेच्या छतावर समुद्रमंथनच्या पौराणिक कथेचे शिल्प तथा कृष्णलीला शिल्पे आहेत. छताची सज्जा मधोमध मत्स्यचक्र आणि त्याच्या चारही बाजूला स्वस्तिक चिन्हाने सजवलेली दिसते. स्तंभांना छताशी जोडणाऱ्या तोडींवर सिंह, हत्ती, मगरीच्या मुखातून बाहेर पाडणारा मानव आणि इतर जलचर प्राण्यांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. स्तंभांवर ब्रम्हा, विष्णू, दुर्गा, कार्तिकेय तथा लकीलुश आदि देवीदेवतांची शिल्पे तर काही सजावटी फलक आणि विद्याधर युग पत्रवल्लरी शिल्पे आहेत. आतील गाभाऱ्याच्या कमानीवर नागर शैलीच्या मंदिरांचे कळस कोरण्यात आलेले आहेत. इथली शिल्पकला आपणांस एलोरा आणि एलिफंटा इथल्या शिल्पकलांचे स्मरण करून देतात, कारण या सर्व शिल्पकला आपल्या देशातील कारागिरांकडून कोरून घेतल्या आहेत. गुहेच्या प्रवेश मंडपाच्या वरच्या बाजूस वाच्या, बुरु आणि दत्तोजा या शिल्पकारांची नावे कोरलेली आढळतात.

गुंफा (गुहा) क्र. ३ –

भगवान विष्णूला समर्पित या गुहेचे खोदकाम व शिल्पकाम इसवी सन ५७८ मध्ये चालुक्य नरेश  मंगलेश याने आपल्या सावत्र बंधू किर्तीवर्मा-प्रथम यांचे शासन काळात पूर्ण करवून घेतले आहे. इथल्या चारही गुहांची संरचना अगदी समान असून या गुहेमध्ये देवकक्ष अधिकचा आहे. ही गुहा इथल्या ४ ही  गुहांमध्ये सर्वात मोठी तथा सर्वाधिक अलंकारिक आणि प्रभावशाली असल्याचे दिसते. गुहेच्या आत उजव्या बाजूस असलेल्या विशालकाय वराह शिल्पाच्या मागे एक संस्कृत अभिलेख कोरलेला दिसतो. या अभिलेखामध्ये गुहेचा निर्माण कालावधी, हेतू आणि मंगलेश याने लांजीश्वर गावच्या (आताचे नंदिकेश्वर) दातृत्वाचा उल्लेख केलेला आहे. प्रवेश मंडपाच्या उजव्या बाजूस अष्टभुजाधारी विष्णू जे की शेषनागावर बसलेले आणि भू-वराह तथा डाव्या बाजूच्या मागच्या भागात हरिहर आणि ललित मुद्रेत उभे असलेले नरसिंह आणि त्रिविक्रम अशा प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. आणखी काही शिल्पांमध्ये समुद्र मंथन, कृष्णलीला आणि महाभारतातील पारिजात हरण सारखी शिल्पे विस्तृत वर्णनसहित कोरण्यात आलेली आहेत. सभामंडपाच्या छतावर मध्यभागी विष्णू, शिव, इंद्र, वरुण, ब्रम्हा आणि यमाच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. सभामंडपाच्या समोरील खांबांवर दैवी मिथुन युग, शिव-पार्वती तथा काम-रति, नाग-नागीण अशी शिल्पे दिसतात. प्रवेश मंडपाच्या सज्जावर नेलाबल्के नावाच्या शिल्पकाराने विष्णू वाहन गरुडाची प्रतिमा कोरलेली आढळते. ही संपूर्ण गुहा चित्रकारीने समृद्ध आहेच, तसेच गरुड प्रतिमेच्या बाजूस एक राजा-राणी दांपत्याचे नृत्य शिल्प खास लक्षवेधी आहे. मुख्य गाभाऱ्यातील महाविष्णू प्रतिमा आता अस्तिवात नाही. प्रवेश मंडपाच्या वरच्या बाजूस कोळी मांची, सिंगी मांची तथा अजू-आचारसिद्धी अशा शिल्पकारांची नावे कोरण्यात आलेली आहेत.

गुंफा (गुहा) क्र. ४ –

बादामीच्या गुहा मंदिरांपैकी सर्वात छोटी आणि शेवटची गुहा ही जैन गुहा मंदिर आहे. या गुहेचे खोदकाम इसवी सन ७ व्या शतकात पूर्ण करण्यात आले आहे. एक खुले प्रवेशद्वार, आयताकार सभामंडप आणि देव्काक्षाची योजना असलेली ही गुहा काहीअंशी अपूर्ण स्वरुपाची आहे. सभामंडपाच्या भिंतींवर ध्यानस्त बाहुबली शिल्प आहे ज्यांस गोमत असे म्हटले जाते. दुसरीकडे ध्यानस्थ पार्श्वनाथास त्याच्या असुर शत्रू कामथवर विजय मिळवतानाचे शिल्प आहे. देवकक्षाच्या दरवाज्यावर कामदेव प्रतिमा द्वारपालच्या रुपात दिसते. देवकक्षाच्या आतील भिंतीवर उपदेश देणारा तीर्थंकर कोरण्यात आलेला आहे, जो की भगवान महावीर सारखा दिसतो आणि ज्याच्या पाठीमागे प्रभामंडळ आहे. भगवान महावीर एका चैत्यवृक्षाखाली सिंहासनावर बसलेले आहेत. त्यांच्यावर तीन छत्रचामरे आहेत, धनुष्यधारी गण, पुष्वृष्टी करणारा विद्याधर आणि दिव्य वाद्य वाजवणारा तीर्थंकर. प्रवेश मंडपाच्या डाव्या बाजूस जक्कावे नावाच्या स्त्रीची प्रतिमा दिसते जी जैनपंथी महिला आहे जिने जैन परंपरेनुसार मोक्षप्राप्ती करून घेतलेली आहे. गुहेच्या बाहेरील पाषाणावर कोलीमांची नावाच्या शिल्पकाराचे नाव कोरण्यात आले आहे. या गुहेचे प्रवेशद्वार वास्तविकत: पूर्वेकडून होते जे की गुहा क्र. ३ आणि ४ ला एका पाषाण भिंतीद्वारे विभक्त करते.

इथं आपले बादामीचे मुख्य आकर्षण असलेल्या पौराणिक गुहा पाहून संपतात. गुहा क्र. ३ आणि ४ च्या समोर आपणास एक भलामोठा तलाव दिसतो, तो तलाव म्हणजेच “अगस्त्य तीर्थ” होय. हे तीर्थ कमी पर्जन्यमान झाल्याने अर्धाधिक भरलेला दिसतो, याच तलावाच्या पश्चिम बाजूस आपणास बादामी किल्ला आणि उत्तर बाजूस एकूण १५ मंदिरे असणारे “भूतनाथ मंदिर संकुल” दिसते. पूर्वीच्या काळी लोकांना भूतनाथ मंदिराकडे जाण्यास तराफ्याचा किंवा छोट्या होडीचा वापर करावा लागत असे. गुहा मंदिरापासून उजव्या बाजूच्या संरक्षित वाटेवरून चालत आणि नंतर तलावातील समुद्रासम वाळू तुडवत आम्ही भूतनाथ मंदिराकडे प्रस्थान ठेवले. मंदिरांच्या शिल्पकला अद्भुत आणि विलोभनीय आहेत. संपूर्ण मंदिर संकुल पाहण्यास अर्धा तास पुरेसा आहे. तिथून तलावाच्या काठाने थोडसं चालून गेल्यास आपण बादामी किल्ल्याच्या पायथ्यास पोहोचतो. पायथ्याला एक पुरातन वस्तू संग्रहालय आहे जे बादामीचे पौराणिक महत्व उद्धृत करते. संग्रहालयात “लज्जागौरी” शिल्प आहे जिला मानवी स्त्रीचे डोके नसून तिचे डोके कमळ पुष्पापासून बनलेले आहे. ती अलंकार मंडित जरी असली तरी नग्न आहे. या शिल्पाकडे पाहिल्यास आपला स्त्रियांकडे वासनांध नजरेने पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलू शकतो. धन्य तो शिल्पकार!

संग्रहालय पाहून झाल्यानंतर आपण पाषाण पायरीच्या वाटेने बादामी किल्ल्यात प्रवेश करते झालो. संपूर्ण किल्ला हा संरक्षित स्वरूपाचा असून आपल्या पूर्वजांचा इथं मुक्त वावर असल्याचे दिसते. किल्ल्यावर निम-सरकारी सुरक्षा रक्षकांचा चोख पहारा बसवलेला आहे, इथं आपणास कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करण्यास मुभा नाही, जी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत भरपूर प्रमाणात आहे. किल्ला इतका स्वच्छ की डोळे दिपावेत असा. दोन टप्प्यांतील पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण एका टेहळणी मनोऱ्याजवळ येतो, इथून बादामी शहराचे विहंगम दृष्य आपणास पाहायला मिळते. इथच एक छोटेखानी शिवमंदिर आहे ज्याला “लोअर शिवालया” संबोधले जाते. इथून अजून वरच्या बाजूस गेल्यावर एक भक्कम बुरुज त्यावर संरक्षित करून ठेवलेली तोफ आणि सभामंडप वजा जागा दिसते. पुढे अजून चिंचोळ्या वाटेने आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो जिथं अजून एक तुलनेने मोठे असे शिवमंदिर आहे ज्यास “अप्पर शिवालया” संबोधले जाते. दोन्ही मंदिरांच्या कलाकृती उत्तम आहेत. किल्ल्याच्या पठारावरून पश्चिमेकडे विस्तीर्ण पर्वतरांग नजरेस पडते तसेच पूर्वेकडे बादामी केव्ह’ज आणि दक्षिणेकडे बादामी शहर. इथला खडक सह्याद्रीतील खडकांच्या तुलनेत अधिक ठिसूळ आहे त्यामुळे डोंगररांगेच्या आजूबाजूस पांढरीशुभ्र वाळू नक्की दिसते.

इथं आपलं “चालुक्यांची बादामी” पाहून संपते. आपण आज पुढच्या प्रवासासाठी निघतोय, “पट्टडकल” आणि “आयहोळे” इथली चालुक्य काळातील समृद्ध मंदिरे पाहण्यासाठी...

************************

टीप: वाचकांनी बादामी आणि बदामी या उच्चारांतील भाषिक अंतर समजून घ्यावे. कानडी भाषेत मराठी बदामीचा उच्चार “बादामी” असा होतो.

२.      पट्टडकल -

      बादामी पाहून झाल्यावर आम्ही सर्वांनी पट्टडकलकडे प्रस्थान ठेवले, बादामीपासून अंदाजे २० किमी अंतरावरील हे छोटसं गाव मलप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आताच्या बागलकोट जिल्ह्यात वसलेलं आहे. यास तिथले स्थानिक लोकं “रक्तपुरा” असेही संबोधतात. या गावातील हिंदू आणि जैन संस्कृतीची मंदिरे आणि स्मारके ही इसवी सन ७ व 8 व्या शतकात बांधलेली आहेत असा उल्लेख सापडतो. या मंदिरांचे आणि स्मारकाचे बांधकाम चालुक्य श्रेणीप्रमाणे करण्यात आलेले दिसते. याही मंदिरांचे सुरेख असे व्यवस्थापन कर्नाटक सरकारचा पुरातत्व विभाग करतो आहे तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याही मंदिर संकुलाचा समावेश करण्यात आलेला आहे. इथली ९ हिंदू मंदिरे भगवान शंकरास समर्पित जरी असली तरी शिल्पकलेत वैष्णवपंथ आणि शक्तीपीठे सुद्धा दर्शविण्यात आलेली आहेत. हिंदू मंदिरांतील सभामंडपात विविध वेदिक आणि पौराणिक शिल्पांची संरचना आढळते, यामध्ये महाभारत आणि रामायण तथा भागवत पुराण, पंचरत्न आणि कीर्तर्जुन्याचा समावेश आहे. इथल एकमेव जैन शैलीचे मंदिर एकट्या जीनास समर्पित आहेत. मुख्य आकर्षण असलेलं “विरुपाक्ष” आणि “पापनाथ” मंदिराची बांधकाम कला उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील बांधकामाचा मिश्र किंवा संयुक्त नमूना म्हणता येईल. एकट्या विरुपाक्ष मंदिरात पूजापाठ, धर्मकार्ये आणि देवसेवा आजही केली जातात.

      मंदिरांची नावे खालीलप्रमाणे...

१.      काडसिद्धेश्वरा मंदिर
२.      जांबूलिंगेश्वर मंदिर
३.      गलगनाथा मंदिर
४.      चंद्रशेखरा मंदिर
५.      संगमेश्वरा मंदिर
६.      कशी-विश्वनाथा मंदिर
७.      मल्लिकार्जुना मंदिर
८.      विरुपाक्ष मंदिर
९.      पापनाथा मंदिर आणि
१०.  जैन नारायणा मंदिर.

जवळपास सर्व मंदिरे एकमेकांस लागून आहेत, एक हिंदू मंदिर साधारण अर्धा किमी अंतरावर दक्षिण बाजूस असून जैन मंदिर एक किमी पश्चिमेकडील बाजूस आहे. सर्व मंदिरांकडे जाण्यासाठी उत्तम दर्जाच्या पायवाटा उपलब्ध आहेत. वेळेअभावी आम्ही इथून पुढे निघण्याचे ठरवले आणि अजून २० किमी अंतरावरील “आयहोळे” हे दुर्गादेवी शक्तीपीठ असलेलं एकूण १५० मंदिरांचे गाव गाठले. वाटेत थोडे थांबून पोटपूजा तीही अगदी कर्नाटक पद्धतीने उरकून घेतली.

३.      आयहोळे (आयवल्ली, अहिवोळल किंवा आर्यापुरा)...

आयहोळे या गावातील हिंदू, जैन आणि बौद्ध संस्कृतीची मंदिरे आणि स्मारके ही इसवी सन ७ व 8 व्या शतकात बांधलेली आहेत असा उल्लेख सापडतो. या मंदिरांचे आणि स्मारकाचे बांधकाम चालुक्य श्रेणीप्रमाणे बादामी आणि पट्टडकल यांस समांतर असे करण्यात आलेले दिसते. एकूण १५० मंदिरे असलेलं हे गाव ५ वर्ग किमी एवढ्या परिघात वसलेलं असून इथल्या प्रत्येक मंदिराकडे जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत. अर्थात वेळेअभावी आम्ही मुख्य मंदिर संकुल आणि पुरातन वस्तू संग्रहालय पाहिले. इथली हिंदू मंदिरे शिवशंकर, विष्णू, दुर्गामाता आणि सूर्यदेवता यांस समर्पित आहेत. जैन शैलीची मंदिरे महावीर, पार्श्वनाथ, नेमीनाथ आणि इतर जैन तीर्थांकरांस समर्पित आढळतात. बौद्ध स्मारके ही हिंदू आणि जैन संस्कृतींचा मिलाप दर्शवितात, त्यात मंदिर संकुलातील पायऱ्यांची विहीर, मंदिरांवरील कलाकुसर समाविष्ट करता येईल. दुर्गादेवीचे मंदिर इथल्या काही खास आकर्षणापैकी एक म्हणावे लागेल, इतर मंदिरांप्रमाणे याही मंदिरास प्रवेशद्वार, सभामंडप आणि देवीचा गाभारा आहे. भाविक भक्तांना देवीस प्रदक्षिणा घालताना उन्हातान्हाचा त्रास होवू नये म्हणून मंदिराच्या सभोवताली बांधलेला प्रदक्षिणा मार्ग अत्यंत विलोभनीय आहे. इथल्या प्रत्येक खांबांवर विविध काळातील कलाकुसरी कोरण्यात आलेल्या आहेत. छतावरसुद्धा नसर्गिक रंगांचा वापर करून चित्रकला दर्शविण्यात आलेली आहे.

खरेतर ही दोन्ही मंदिर संकुले पाहण्यासाठी किमान २ पूर्ण दिवसांचा वेळ हवा असतो, परंतु पुन्हा एकदा वेळेअभावी आम्ही दोन्ही संकुले एकाच दिवसात जलद गतीने उरकून घेतली. एव्हाना सायंकाळ झाली होती आणि मनोमन ओढ लागली होती ती हंपीची, पण हंपी अजून २२० किमी लांब असल्याचे दिशादर्शकाने सांगितले. आम्ही ठरल्याप्रमाणे रात्रीचा मुक्काम हंपीजवळील होस्पेट या शहरात करण्याच्या उद्देशाने सर्वांनी आपापल्या वाहनास गती दिली आणि ३ तासांच्या रग्गड प्रवासानंतर रात्री ८ च्या सुमारास होस्पेटमध्ये पोहोचते झालो.

2 comments: