Saturday, March 9, 2019

माझी पहिली हिमालय भेट ... चादर ट्रेकच्या निमित्ताने ...



 सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या व बागडलेल्या आम्हा मावळ्यांना “हिमालय” नेहमीच साद घालत असतो किंवा खुणावत असतो. “हिमालय” म्हणजे आमच्या सह्याद्रीचा मोठा भाऊ बरे! विस्तीर्ण पसरलेली ती पर्वतरांग, शुभ्र बर्फाच्छादित हिमशिखरे, हाडे गोठवणारी बोचरी थंडी, उणे २५ अंश ते उणे ४० अंश तापमान, गोठलेल्या नद्या व त्यांची उगमस्थाने आणि या सर्वांचा तिथल्या स्थानिक लोकांच्या जीवनशैलीवर झालेला त्याचा प्रभाव. हे सर्वच काही अनुभवण्यास मिळाले ते आमचे सह्यगुरु आणि मार्गदर्शक डॉ. श्री. सुनील धुमाळ सरांच्या साथीने, निमित्त मात्र “चादर” ट्रेकचे...

 ट्रेक हा किती गोंडस शब्द आहे ना, सह्याद्रीकरांसाठी? परंतू लेह-लडाख, कारगील आणि झंस्कार परिसरातील लोकांसाठी ते रोजचेच. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लडाख खोऱ्यात तुफानी बर्फवृष्टी होते आणि परिसरातील लोकांच्या लेह शहराशी जोडणाऱ्या सगळ्या पायवाटा किंवा गाडीवाटा बंद होतात. एकप्रकारे संपूर्ण जीवनमान तथा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री आणि इतर बाजारहाट थांबून जातो. आता यावर काहीतरी उपाय शोधून काढलाच पाहिजे, म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे म्हणून. याच उक्तीचा आधार घेत किमान ४०० वर्षांपूर्वी काही झंस्कारी तरुण-तुर्कांनी लेह शहराशी संपर्क होईल अशी वाट शोधून काढण्याचे ठरविले आणि सुरु झाली शोधमोहीम. बराच काळ काही हातास लागत नव्हते. अशातच झंस्कार नदीचे पाणी गोठलेल्या अवस्थेत दिसले, धाडस करून ते त्या बर्फावर उतरले आणि घसरत का होईना चालण्याचा प्रयत्न करू लागले. ती शुभ्र पांढऱ्या रंगाची बर्फाची लादी सलग होती, बर्फाच्या लादीच्या खालून वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकू येत होती परंतू लादी तग धरून चालण्याचा आत्मविश्वास देत होती. 


विमानतून घेतलेलं झंस्कार नदीचे छायाचित्र 
लोकं पुढे-पुढे चालत होते, काही ठिकाणी लादी कमीअधिक प्रमाणात तयार होत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. मजल दरमजल करत हे लोक काही आठवड्यांच्या पायपिटीनंतर संगमाच्या ठिकाणी पोहोचले. हा संगम म्हणजेच मानसरोवर हिमशिखरात उगम पावणारी इंडस अर्थात आजची “सिंधू” आणि “झंस्कार” नदीचे मिलन होय. पुढे सिंधू नदी कारगील प्रांतातून होवून सध्याच्या पाकिस्तानात जाते आणि नंतर ती अरबी समुद्राला येवून मिळते. “संगम” पासून पुढे काही तासांच्या समांतर चालीवर लेह शहर वसलेले आहे, जि आजच्या लडाख प्रांताची राजधानी म्हटली जाते. वर उल्लेखिल्या गेलेल्या बर्फाच्या लादीला नंतरच्या काळात “चादर” असे संबोधले गेले. आताच्या काळात पर्यटन आणि साहसी खेळप्रकारात अलगदपणे सामावून जाईल अशी ही तंगडतोड “चादर ट्रेक” नावाने ओळखली जावू लागली आणि जगभरातून लोकं इथं येवून आपल्या शारीरिक क्षमतेचे आकलन करू लागली, आम्हीही त्यातलेच काही...

याच “चादर ट्रेकचा” संपूर्ण थरार मी आपणा सर्वांसाठी ३ अंकात शब्दबद्ध करीत आहे, ते खालीलप्रमाणे...
१.      अंक १ ला – पुणे ते लेह प्रवास, आणि लेह-लडाख दर्शन (३ दिवस).
२.      अंक २ रा – लेह ते नेरेक फॉल्स (संपूर्ण चादर ट्रेकचे ४ दिवस)... आणि
३.      अंक ३ रा – खारदूंग-ला पास व परतीचा प्रवास.

अंक १ ला – पुणे ते लेह प्रवास, आणि लेह-लडाख दर्शन (एकूण ३ दिवस)...

येणेप्रमाणे असे की, आले डॉक्टर साहेबांच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना... सरांनी सर्वांसमक्ष प्रस्ताव ठेवला की यंदाच्या वर्षीच “चादर ट्रेक” आपल्याला नैसर्गिक अवस्थेत करता येणार आहे, पुढच्या वर्षी तिकडं रस्त्याचे आणि विविध विकासकामांची सुरुवात होणार असल्याने हा ट्रेक राहून जाईल की काय अशी शंका मनात आली. हिमालयाचे आकर्षण मनात होतेच, मी लगोलग होकार सांगितला. मग इतर भिडूंची जमवाजमव चालू झाली, घोळक्यात डॉ. प्रवीण सर, डॉ. सरीताजी, नरेंद्र आणि सचिन सामावले. सर्वेश आणि इतर भिडू बघतो, सांगतो असं म्हणत २ पावले मागे हटले. दिल्लीवरून डॉक्टरांचे काही मित्र आम्हाला येवून मिळणार होते. मग पुढ काय, ट्रेकसाठीचे बुकिंग केले, यावेळी आम्ही Adventure Nation  या संस्थेच्या सहकार्याने ट्रेक करायचे ठरले, त्यांची ट्रेक फी भरली आणि बुकिंग कन्फर्म केले. आता वेळ होती विमान प्रवास बुक करायची, “गो एयर” नामक विमानप्रवास कंपनीची पुणे-दिल्ली आणि दिल्ली-लेह आणि परतीची तिकिटे बुक करून टाकली. आता उत्सुकता आणि आतुरता होती ती जानेवारी महिन्याची आणि हिमालय भेटीची…

आणि तो दिवस उजाडला, दि. २६ जानेवारी २०१९ च्या भल्या पहाटे जाग आली, शुचिर्भूत होवून घराजवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या झेंडावंदन आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन  कार्यक्रमास हजेरी लावली. एव्हाना दुपार झालेली होती, सहकारी भिडूंना फोन करून कुठवर आलेत याची चौकशी केली. सर्वजण तयार होते. एकत्र येतायेता सायंकाळ झाली अन रात्री ०८:३० च्या सुमारास डॉक्टर साहेब आणि मी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रस्थान केले. विमानतळाच्या आत जावून पहिले फोटोसेशन केले आणि उपलब्ध सर्व सोशल मिडीयावर चादर ट्रेकला निघाल्याचा अपडेट पोस्ट केला. चेक-इन करून मुख्य गेटच्या तिथं पोहोचलो, साधारण १ तासाचा अवधी शिल्लक होता, सर्वजण भुकेने व्याकूळ झालेलो होतोच, चहा आणि नास्त्याची चौकशी केली असता तिथले दर अवाजवी आणि अवास्तव असल्याचे निदर्शनास येताच आठवली ती घरची भाजी-भाकरी. विनाविलंब वरच्या मजल्यावर जावून पथारी पसरली आणि बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, बेसनाची पोळी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, दणकून वढ काढली... माहित होतेच, पुढचे १० ते १२ दिवस आपल्याला आपलं जेवण मिळणार नाही ते. रात्री ११ च्या सुमारास आम्हास घेवून जाणारे विमान आले, आम्ही दंगामस्ती करत-करत आमच्या सीटवर जावून बसलो आणि विमानाने भारताची राजधानी दिल्लीकडे उड्डाण केले.

दोन तास अन पंधरा मिनिटांच्या हवाई सफरीनंतर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर आगमन केले आणि बसने आम्हास टर्मिनल २ च्याच प्रस्थान कक्षात आणून सोडले. आता दिल्लीत सुमारे ५ तास घालवायचे होते, करायचे काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. मग आळीपाळीने झोप घ्यायचे ठरले, काही वेळ मी आणि सचिन झोपलो आणि नंतरचा काही वेळ डॉक्टर साहेब आणि मी झोपलो. पहाटे ०५:३० च्या सुमारास जाग आली, आता मात्र एक कप कॉफी प्यावीच अशा उद्देशाने कॉफीच्या दुकानापाशी गेलो आणि सर्वात स्वस्त रु. २४०/- चा कॉफी कप नाईलाजास्तव घेवून डॉक्टर साहेबांनी आणि मी तो शेयर केला. कॉफीचा दर पाहून एकेक्षणी भारत इतका पुढारलेला आहे की काय अशी शंका मनात येवून गेली. परंतू नंतर सावरून स्वत:ला समजावले की हा तो भारत नाही जिथं आपण राहतो, असो... एक कप कॉफीचा दर ४ अमेरिकी डॉलर...
 आता दिल्लीतला मुक्काम आटोपता घेण्याची वेळ आली होती, आम्हास लेहपर्यंत घेवून जाणारे दुसरे विमान सज्ज झालेले होते. वातावरणात धुके पसरले होते, धुके कसले ते “धुरके” होते ते. बहुदा धुरके म्हणजे काय असा प्रश्न पडला असावा, धूर + धुके = धुरके (smoke + fog = smog).  पूर्वेकडून सूर्य डोके वर काढताना अंधुकसा दिसत होता. आमचे विमान प्रवाशांनी भरले, आणि उड्डाणाच्या प्रतीक्षेत रनवे शेजारी जावून थांबले, १५ मिनिटांनी उड्डाणाचा सिग्नल मिळाला आणि विमान लेहकडे झेपावले. साधारण १५ मिनिटांच्या प्रवासानंतर शुभ्र बर्फाच्छादित हिमालयाची विस्तीर्ण पर्वतरांग नजरेस पडू लागली होती. 







वैमानिकाने आजूबाजूच्या रांगांची आणि प्रदेशाची तोकडी का होईना पण माहिती देणे सुरु ठेवले होते. उजव्या बाजूस गोठलेला अनामिक तलाव विमानातून खूपच सुंदर दिसत होता. विमानातून हिमालयाचे विहंगम दृष्य साठवत दीड तासांच्या हवाई सफरीनंतर लेह विमानतळावर उतरण्याची वेळ होती. विमान उतरल्यावर वैमानिकाने बाहेरचे तापमान उणे ७ अंश सेल्शियस असल्याचे सांगितले, विमानतळावरचे कर्मचारी ३ थराचे गरम कपडे घालून आमच्या स्वागतासाठी नाकातोंडातून वाफा काढत सज्ज उभे होते. विमानच्या दरवाजापाशी येताच वैमानिकाशी हस्तांदोलन केले आणि बाहेर पडताक्षणीच तापमानाची चाहूल लागली. संपूर्ण अंग गारठून गेले, पटापट विमानतळाच्या टर्मिनलमध्ये गेलो, सामान घेतले आणि गाडी घेवून लेह शहरात प्रवेश करते झालो.

लेह मधला दिवस १ ला ... नुकतेच शहर जागे झाले होते, मध्येच एके ठिकाणी ड्रायवरने लडाखी नाश्ता करवला, सोबत चहाचे झुरके मारत आम्ही लेहला पोहोचलो असल्याचे अपडेट्स सोशल मिडीयावर टाकून दिले. आता थोडसं थकल्यासारख वाटत होतं पण उत्साह दांडगा होता. आजच्या मुक्कामाचे हॉटेल गाठले, ते हॉटेल नव्हतेच मुळी. ते होते होम स्टे.

 
अगदी घरच्यासारख आदरातिथ्य झालं, पोहोचल्यावर लगेच लडाखी चहा म्हणजेच “कावा” मिळाला. ओळख वगैरे झाली, मन्सूरा दीदीने आमच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण तपासले, ते प्रमाण व्यवस्थित असल्याचे सांगून तिने अगदी हक्काने आजचा दिवस आराम करायचा कुठेही जायचं नाही, असं सांगितल. मग आम्ही काय सामान कोपऱ्यात टाकले आणि रजईमध्ये शिरलो. दुपारच्या वेळी तिने आम्हास अगदी आत्मीयतेने जेवू घातले, सायंकाळी तसेच. आता उद्या काय करायचे असा प्रश्न घेवून आम्ही मन्सूरा दीदीकडे गेलो असता तिने परत सांगितले की आराम करायचा म्हणून. आता मात्र आम्ही साफ नकार दिला आणि किमान लेह शहर आणि परिसर पाहून घेतो अशी विनंती केली. तिने ती लगोलग मान्य केली आणि आमच्यासाठी गाडीची व्यवस्थासुद्धा केली. रात्रीचे जेवण उरकून आम्ही उद्याच्या लेह आणि परिसर सफरीसाठी उत्सुक झालो आणि झोपी गेलो.


लेह मधला दिवस २ रा ... पहिला दिवस झोपून काढल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाग आली, अर्ध-शुचिर्भूत झालो, आता पुढचे १२ दिवस अंघोळ आणि आम्ही एकमेकांपासून चार हात लांब राहणार होतो. चहा नाश्ता उरकून गाडीमध्ये बसलो आणि लेह परिसराची अद्भुत आणि नयनरम्य सफरीची सुरुवात झाली, आमच्या गाडीचे सारथ्य “रिक्झीन” नावाच्या लडाखी तरुणाकडे होते. मन्सुरा दीदीने दिवसाचा कार्यक्रम दिला होता, पहिले ठिकसे मॉनेस्टरी, शेय महाल, सिंधू नदीचे पात्र, हॉल ऑफ फेम हे मिलिटरी संग्रहालय आणि शेवटी शांती स्तूपा आणि नंतर हॉटेलमध्ये मुक्काम…

ठिकसे मॉनेस्ट्री मधला बुद्ध!!
थोडेसे लडाख प्रांताविषयी...

भौगोलिक दृष्ट्या जम्मू आणि काश्मीर राज्य मुख्यत्वे करून तीन प्रांतात विभागले गेलेलं आहे.
१.      जम्मू – जम्मू प्रांताच्या राजधानीचे शहर जम्मू होय.
२.      काश्मीर – काश्मीर प्रांताच्या राजधानीचे शहर श्रीनगर होय.
३.      लडाख – लडाख प्रांताच्या राजधानीचे शहर लेह होय.

लडाख प्रांताची ओळख हिमालयातील उंचच उंच शिखरांचा आणि एका शिखरावरून दुसऱ्या शिखराकडे जाण्यासाठीच्या नैसर्गिक खिंडीचा (पासेस) प्रदेश अशी सांगता येईल. जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा पास “खारदूंग-ला” याच प्रदेशात येतो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १८३८० फूट इतकी आहे. लडाख प्रांतातील इतर पासेसची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे...

१.      झोजी-ला – सुमारे ४३४ किमी लांबीचा लेह-श्रीनगर हमरस्ता झोजी-ला पास मधून जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून ११५७० फूट इतकी असून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं भरपूर प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि इथली वाहतूक बंद होते. हा पास जून ते सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला असतो.
२.      रोहतांग-पास - सुमारे ४५० किमी लांबीचा मनाली-लेह हमरस्ता रोहतांग-पास मधून जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून १३०५१ फूट इतकी असून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं भरपूर प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि इथली वाहतूक बंद होते. हा पास जुलै ते सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला असतो. रोहतांग-पास जगातील सर्वात जास्त सुंदर पासेसपैकी एक आहे.
३.      बारलाचा-पास - मनाली-लेह हमरस्त्यावरील अजून एक असलेला हा पास समुद्र सपाटीपासून १६०४० फूट इतक्या उंचीवर असून तीन रस्ते इथं एकत्र येतात. पहिला रस्ता मनाली, दुसरा लेह आणि तिसरा स्पितीवरून येणारा.
४.      खारदूंग-ला – लेह पासून उत्तरेकडे ४० किमी अंतरावर स्थित खारदूंग-ला पास जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा पास मानला जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १८३८० फूट इतकी आहे. हा पास लेह शहर आणि सियाचीन ग्लेसियरला जोडतो. सियाचीनची म्हणजे जगातील सर्वात उंचीवरची समरभूमी किंवा युद्धभूमी होय. 
५.      चांग-ला – मराठीतील चांगला पण वास्तवात देखील चांगला, सुंदर असा हा पास लेह आणि पंगोंग-त्सो रस्त्यावर स्थित असून या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १७५९० फूट इतकी आहे. चांग-ला पास जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा खारदुंग-ला नंतरचा एक पास मानला जातो. 
६.      नामिका-ला – सुमारे १२१४० फूट उंचीवरील हा पास झंस्कार आणि कारगील परिसराला जोडतो. हा पास झंस्कार परिसरात येतो. झंस्कार परिसरात अजून फोटू-ला आणि लाचूलुंग-ला हे पास येतात जे अनुक्रमे १३४७८ फूट आणि १६५९८ फूट उंचीवर स्थित आहेत.

लडाख परिसरातील पर्वतरांगा... 
१.      द ग्रेट हिमालय रेंज – हिमालयाची विस्तीर्ण पर्वतरांग भारत आणि बाकी आशियाई देशांना विभक्त करते जसे की नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान. हिमालयाच्या याच पर्वतरांगेत ३० पेक्षाही जास्त जगातील उंचच उंच शिखरे आहेत जसे की “एवरेस्ट” आणि “कांचनजंगा” जे आज नेपाळच्या हद्दीत आहेत. 
२.      द झंस्कार रेंज – उत्तरेकडील बाजूच्या हिमालयाची ही उपरांग लडाखचा पाठीचा कणा असून लामायुरूपर्यंत पश्चिमेकडे आणि झंस्कारपर्यंत पसरलेली आहे. मुख्यत: ही रांग आपणास झंस्कार नदीच्या अस्तित्वाने आणि तिच्या सौंदर्याने ओळखीस पडते आणि ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते व अंतत: सिंधू नदीस येवून मिळते. 
३.      द लडाख रेंज – हिमालयाची एक अंतर्गत उपरांग लडाख जी लेह शहराच्या उत्तरेकडे असून ती तिबेटमधील कैलाश पर्वत रांगेत लुप्त होते. याच रांगेत जगातील सर्वोच्च उंचीवरील वाहन चालवण्यास योग्य असा बहूप्रसिद्ध पास आहे ज्याच नाव आहे “खारदुंग-ला”.
४.      द काराकोरम रेंज – अक्साई-चिन ते गिलगीट पर्यंत पसरलेली सुमारे ५०० किमी लांबीची ही रांग सुमारे ८०% टक्के आजच्या पाकिस्तानात आहे. या रांगेत किमान ६० उंच शिखरे आहेत ज्यांची उंची सुमारे २३००० फूट इतकी आहे. याच रांगेत जगातील दुसरे उंच शिखर के-२ स्थित आहे ज्याची उंची २८२५१ फूट आहे.

गाडीत बसलो आणि लेहच्या सफरीवर निघालो, लेह शहरातून गाडीने मनाली हमरस्त्याने पूर्वेकडे प्रस्थान सोडले. २० किमी अंतरावर पोहोचल्यावर आम्ही “ठिकसे मॉनेस्टरी” इथं पोहोचलो. इथल्या गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून अध्यात्मिक आणि आत्मिक मन:शांतीचा अनुभव घेतला आणि रणछोडदास चांचडच्या ३ इडियटस या चित्रपटातील शाळेला भेट दिली, ही शाळा कडाक्याच्या हिवाळ्यात बंद ठेवली जाते. ही शाळा पाहून आम्ही त्याच इडियट लोकांना अनुभवले आणि परतीचा प्रवास चालू केला. आजच्या दिवसाचं तिसर स्थळ म्हणजे “शेय महाल”, बौद्ध समाजाचे समाज मंदिर असलेलं हे ठिकाण आहे, इथं येवून बौद्ध प्रार्थनेस उपस्थिती लावली आणि लेह शहराकडे प्रस्थान ठेवले. वाटेत एके ठिकाणी थांबून चहाचे झुरके मारले. अगदीच काही अंतरावर रिक्झीनने गाडी थांबवली आणि आम्हास सिंधू नदी जी लडाख प्रांतात इंडस नावाने ओळखली जाते तिचे छोटेखानी पात्र दाखवले. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलाश पर्वतावर होतो आणि ती दक्षिणोत्तर वाहते आणि लेह शहरापासून पुढे जात ती झंस्कार आणि इतर उपनद्यांना आपल्या कवेत घेवून कारगील प्रांतातून पुढे जात सिंध-पाकिस्तानात जाते व तिथला प्रदेश सुजलाम सुफलाम करते. याच प्रदेशाला सिंधप्रांत संबोधले जाते.

 
      सिंधू नदीच्या पात्रात काही वेळ घालवल्यावर आता वेळ होती ती थोड्याशा का होईना पोटपूजेची. तडक लेह शहर गाठले आणि लडाख स्पेशल हॉटेलमध्ये शिरलो व ऑर्डर केला “थुक्पा” आणि “मटण मोमो’ज”. थुक्पा म्हणजे चिकनचे सूप आणि त्यात शिजवलेल्या नुडल्स त्याही लडाख स्पेशल मसाल्यांमध्ये, अहाहा. खरंच सुंदर थुक्प्याचे झुरके घेत मोमो खाल्ले आणि सैन्य दलातील शहिदांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सुंदर अशा “हॉल ऑफ फेम” कडे प्रस्थान ठेवले. 

लेहपासून ३ किमी श्रीनगर रस्तावर स्थित हे स्मृतीस्थळ आपणास आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी जीव दिलेल्या सैनिकांच्या शहादतीची आठवण करून देतो आणि आपणास एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देते. तसेच सैन्यदलातील लोकांनी तयार केलेल्या सुंदर वस्तू इथं ना नफा ना तोटा तत्वावर विकल्या जातात त्याही शॉपिंग कॉम्प्लेक्सला भेट दिली. इथं काही वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरला नाही, कारण जे पैसे आम्ही खर्च करणार होतो ते थेट सैन्यदलाच्या उपयोगी पडणार होते याचा एक विलक्षण आनंद मनात होता.
हॉल ऑफ फेम येथील दिव्यज्योत 
 



      देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची विस्तृत माहिती आणि त्यांनी केलेला पराक्रम इथं शब्दशः मांडण्यात आलेला आहे, सियाचीन युद्धभूमीत आपले सैनिक कशा प्रकारे निसर्गाशी दोन हात करून भारतीय सीमेचे रक्षण करतात हेही इथं दाखवलेलं आहे. सारं काही सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे, समस्त भारतीय सेनेला त्रिवार मुजरा!!

      आता आजच्या दिवसाचे शेवटचे स्थळदर्शन बाकी होते ते म्हणजे “शांती स्तूपा”... मराठीमध्ये आत्मिक आणि अध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारी अनेक ठिकाणे लडाख परिसरात आहेत, त्यापैकीच एक शांती स्तूपा. लेह शहराच्या उत्तरेकडील एका टेकडीवर बृहद मोठे हे बौद्ध धार्मिक स्थळ आहे, शुभ्र पांढऱ्या रंगात रंगवलेले, अधेमध्ये सोनेरी छटा, कळसाचा रंग सोनेरी आणि खरोखर अद्भुत. एक गोष्ट ट=इथं मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथला बहुसंख्य समाज हा बौद्ध आहे आणि उरलेला मुस्लीम! सांख्यिक गणतीत मोजायचे झाल्यास ८०% बौद्ध आणि २०% मुस्लीम असे ते गणित. दोन्ही समाज शांतीप्रिय, कुठल्याही प्रकारचा दंगा-धोपा, भांडणतंटा नाही, जमिनीचे वाद नाहीत एकूणच तथागत गौतम बुद्धाच्या शांती तत्वज्ञानाचे खरेखुरे शिष्य. काही अपवाद वगळता, इथं दोन्ही समाजांमध्ये आपापसांत लग्नेही होतात असे कळले, हे ऐकताच मला आमच्या पुरोगामी महाराष्ट्राची आठवण झाली आणि “सैराट” आठवला, काय ते पुरोगामित्व!! असो, टीका करायची तर ती इतर कुठही करता येईल.

शांतीस्तूपा
       शांती स्तूपा पाहून झाल्यावर त्या संकुलाच्या तटबंदीवरील एका दिशादर्शक बाणाने लक्ष वेधले, तो होता “खारदुंग-ला”. मनोमन तिकडे जाण्याचा निश्चय केला अन तडक हॉटेल गाठले आणि रजईच्या आता स्वता:ला झोकून दिले ते सायंकाळचे ६ कधी वाजून गेले काही कळलेच नाही. संध्याकाळचे छोटेखानी जेवण घेवून निद्रादेवीस अधीन झालो.

लेह मधला दिवस ३ रा ... दुसरा दिवस संपूर्ण सार्थकी लावल्याच्या आनंदात सकाळी उशिरा उठलो. चहा, नाश्ता उरकून घेतला आणि खोलीच्या बाहेर पडतो तो काय, माझ्या आयुष्यातील पहिलीवहिली बर्फवृष्टी पाहण्याचा योग आला, निसर्गाने जणू हा आमच्यासाठीच योजून ठेवलेला सोहळा. छोटेछोटे बर्फाचे कण आकाशातून जमिनीकडे हळुवारपणे बरसत होते आणि पायाखालची जमीन संपूर्ण बर्फाच्या चादरीखाली लपलेली दिसली. याच बर्फवृष्टीचा आनंद घेत “चादर ट्रेक” साठी आलेल्या इतर  भिडूंची ओळख करून घेतली. आता वेळ होती ती चादर ट्रेक हा नेमका काय आहे ते समजून घेण्याची आणि त्यासाठी पाचारण केले गेले कृष्णा आणि त्याच्या टीमला. एकंदरीत तिशीतला कृष्णा हा मूळ व्यवसायाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त अभियंता, हैदराबादेतील एका उच्चभ्रू कुटुंबात वाढलेला हा एक अतिशहाणा म्हणावा असा एक मुलगा, चांगल्या पगाराची नोकरी सोडून ट्रेकच्या क्षेत्रात उतरलेला. या क्षेत्राचे उत्पन्न हे निमित्तमात्र असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्हास रणछोडदास चांचड भेटला होता. चादर ट्रेकचा किमान ८ ते १० वेळचा रग्गड अनुभव गाठीशी असलेली ही टीम आमची मार्गदर्शक होणार होती. सलग दोन तास चाललेलं हे मार्गदर्शन शिबीर शेवटी शेवटी रटाळवाण वाटायला लागलेल होतं परंतु तितकचं उपयुक्त देखील. शिबीर संपवून तीच टीम आम्हाला लेह शहरात फिरायला घेवून गेली. मार्केटमधे आम्ही फ्लीस, हातमोजे आणि कानटोप्या खरेदी केल्या, सोबत मिलिटरी स्वेटरसुद्धा!! दुपारच्या जेवणात चाओमीन राईस आणि सूप घेतलं. बऱ्यापैकी सगळ्या वस्तूंची खरेदी करून एकमेकांशी विचारपूस करून परतण्याचे ठरविले. अर्ध्या तासाच्या कंटाळवाण्या चालीने हॉटेलमध्ये परतलो, आणि आराम केला.

      सायंकाळी अनपेक्षितपणे दिल्लीच्या ग्रुपमधील मलिक भाईचा वाढदिवस साजरा केला. तुफान दंगामस्तीने आणि कॅम्पफायरने वातावरण भरून गेलं होतं. रात्री उशिरा पार्टी आवरली आणि उद्याच्या दिवशी चादरसाठी प्रस्थान ठेवण्याच्या ओढीने म्हणा किंवा उत्सुकता मनात साठवून झोपी गेलो.


अंक २ रा – लेह ते नेरेक फॉल्स (संपूर्ण चादर ट्रेकचे ४ दिवस)


क्रमश: लवकरच  ...
To see all the photos, please click the Google photos link below... 

https://photos.app.goo.gl/XLrZtgHjQA3h3oHw5

2 comments:

  1. खुप सुंदर वर्णन छान लिहीलेला लेख, लिखानातील प्रत्येक शब्ढ स्पर्श करून जातात प्रत्येक वस्तूला त्यात भर टाकली जागो जागी टाकलेले फोटो setion वा मस्त....!

    ReplyDelete
  2. खुप सुंदर वर्णन छान लिहीलेला लेख, लिखानातील प्रत्येक शब्ढ स्पर्श करून जातात प्रत्येक वस्तूला त्यात भर टाकली जागो जागी टाकलेले फोटो setion वा मस्त....!

    ReplyDelete