Wednesday, December 5, 2018

|| बेलाग कातळकड्याच्या मोहमायेचा कहर – किल्ले हरिहर! ||


|| बेलाग कातळकड्याच्या मोहमायेचा कहर – किल्ले हरिहर! ||

“भटकंती” या शब्दाच्या अर्थाच्या आसपास राहणारे आणि त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करणारे आम्ही भटके आजवर बरेच किल्ले पाहून, घाटवाटा आणि दऱ्याखोऱ्यामध्ये अक्षरश: वरावरा फिरून, मुक्काम ठोकून आलेलो आहोत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. काही ठिकाणी वाट चुकणे, धडाधड आपटणे, तहानेने व्याकूळ होणे, एखाद-दुसरा भिडू गळपटणे, त्यास आधार देत परत आणणे हे आता नित्याचे झाले आहे. बरेच दिवस झाले एक वेगळ्या धाटणीतला किल्ला पाहण्याचे कार्यक्रम ठरत होते आणि काहीनाकाही कारणाने ते रद्द होत होते. मागच्याच आठवड्यात अशाच एक आगळ्यावेगळ्या सांधण दरीचा रोमांचक उतराईचा थरार अनुभवला होताच आणि तोच किंवा तसाच थरार अनुभवण्यासाठी सगळे आतूर झाले होते. सर्व भटक्यांच्या चर्चेला उधाण आलं आणि बेलाग, बेबंध आणि राकट असा किल्ले हरिहर निवडण्यात आला आणि एक दिवसीय कार्यक्रम पत्रिका ठरली. सांधण दरीच्या उतराईचा थरार अनुभवलेले जवळपास सर्व भटके सह्याद्रीच्या कुशीतील एकमेवाद्वितीय ८० अंश कोणातील कातळ पायऱ्या असलेला, बांधकाम इतकं उत्कृष्ट/अभेद्य की त्यास उध्वस्त करण्यासाठी तोफा घेवून समोर उभ्या ठाकलेल्या इंग्रज अधिकारीरुपी शत्रूला प्रेमात पडण्यास भाग पाडणारा आणि बेमालूमपणे माघार घ्यायला लावणारा “किल्ले हरिहर” डोळ्यासमोर उभा राहिला. आता सहकारी भिडूंची जमवाजमव करण्याची तयारी सुरु झाली, काही क्षणाच्या आत जवळपास २५ जण तयार झाले आणि दोन ते तीन दिवसांत हा आकडा ५० च्या वर जावून पोहोचला.

थोडसं “किल्ले हरिहर” विषयी...

सह्याद्रीच्या कुशीतील इतर काही किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्यास मोठ्या लढाया आणि राज्यकारभाराचा इतिहास नाही. छत्रपती शहाजी महाराजांनी त्यांचे अखत्यारीतील निजामशाहीच्या  पुनर्स्थापनेच्या वेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला जिंकून घेतला व निजामशाहीच्या पाडावानंतर तो स्वराज्यात सामील झाला, आणि नंतर सर्वकाळ अजिंक्य राहिला. इतर सर्व काळ हा किल्ला आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी टेहळणी स्वरुपात वापरला गेला असून या किल्ल्याचे बांधकाम सातवाहनपूर्व बौद्धकालीन असल्याचे लक्षात येते. या किल्ल्याच्या रौद्र्तेकडे पाहिल्यावर काळजात धस्स तर होतचं पण उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा किल्ला सह्याद्रीची उपरांग त्र्यंबक रांगेत अभेद्य उभा आहे.




हा किल्ला मुख्यत्वेकरून दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा म्हणजे पायथ्याच्या सभोवताली असलेले विरळ जंगल आणि त्यातून जाणारी पायवाट आणि दुसरा टप्पा अर्थातच आखीव-रेखीव कातळ पायऱ्या, ज्यांच्या प्रेमात कोणीही पडेल अशा. ज्या काळात हा किल्ला बांधला गेला, त्या काळातील लोकसंख्या आठवली आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने पाहिले तर त्याकाळचे लोकं किती हुशार आणि दूरदृष्टीचे होते याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही. कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून कोणीही सहज वर चढून जावू शकेल इतका पायऱ्यांच्या आकार, भर पावसातसुद्धा आत्मविश्वासाने न डगमगता चढताना आधारासाठी दोन्ही हातांची बोटे बसतील इतक्या खाचा किंवा खोबण्या, जिथं पायऱ्या बांधता येणार नाहीत अशा ठिकाणी खोदलेला कातळ बोगदा आणि पुढ कातळाच्या पोटात खोदलेल्या पायऱ्या, किल्ल्याच्या पठारावर मानवी वसाहत, संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा करण्यासाठी ५ ते ६ पाण्याच्या टाक्या, मंदिर आणि तटबंदी. सार काही अजब, अद्भुत आणि अद्वितीय.

शिरवळ, पुणे आणि मंबई शहरांमध्ये स्थायिक जवळपास ५०-५५ भटके या किल्ल्याचा थरार अनुभवण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी आपापली कामे आटोपून संध्याकाळी उशिरा १० वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथे जमले, अर्थातच काहीजण मुंबईहून थेट पायथ्याच्या गावी पोहोचणार होते. अर्ध्याहून अधिक आज डॉक्टर्स होते आणि आमचे मार्गदर्शक डॉ. सुनील धुमाळ, डॉ. प्रविण डुंगरवाल, सचिन धस साहेब आणि इतर मित्र होते, गर्दीचे आकर्षण ठरलेला युवराज श्वेतांक, त्याची टीवटीवी दीदी आणि सोहम. शनिवार आहे, उपवास आहे हे सगळं बाजूला ठेवून सर्वांनी अंडाबुर्जी वर हात साफ केला, तोही इतका की त्या गाडीवरचे अन्नपदार्थ संपले. आम्हाला घेवून जाणारी बसगाडी आली, आणि सगळे स्थानापन्न झाले, वाटेत इतर भिडूंना घेवून आमच्या गाडीने पुणे सोडले ते किल्ल्याच्या पायथ्याचे गाव टाके हर्ष किंवा आजच्या हर्षेवाडीसाठी. वाटेत नारायणगाव येथील मसाला दुध पिवून झाले आणि पुढचा प्रवास चालू झाला. गाडीने एकेक गाव-वाडी, नाशिक शहर मागे सोडले आणि पहाटे ५:३० च्या दरम्यान पायथ्याचे गाव गाठले.




झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं, समोरच अभेद्य उभा हरिहर दृष्टीक्षेपात आला होता, शेजारच्या ब्रम्हा डोंगराच्या आणि हरिहरच्या खिंडीत शुक्रतारा आणि सोबतीला उगवतीच्या किरणांनी लालबुंद झालेलं आभाळ कसं विलोभनीय दिसत होत. वेळ न दवडता आवराआवर केली आणि चहा-नास्ता उरकून घेतला, बूट चढवले आणि किल्ल्याकडे प्रस्थान सोडले. लगोलग सर्वांनी आपापले भ्रमणध्वनी बाहेर काढले आणि अवघा आसमंत त्याच्या क्लिक्सने भरून गेला. किल्ल्याची चढाई आपण पश्चिम बाजूने करतो त्यामुळे शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे कातळाच्या मायेचा कहर आपणास अनुभवता येतो. अगदी किल्ल्याच्या पठारावर पोहोचेस्तोवर आपणास उन्हाचा त्रास होत नाही, संपूर्ण वेळ आपण सावलीतून थंडगार वाऱ्याच्या झुळूकेसोबत चालत राहतो. पहिला टप्पा हा गर्द-विरळ अशा स्वरूपाच्या झाडीचा जरी असला तरी दमून जायला लावतोच. दोन ठिकाणची खडक चढाई केल्यानंतर पहिल्यांदा गडाची मुख्य ओळख आणि आकर्षण असलेल्या कातळ पायऱ्या दृष्टीक्षेपात येतात आणि आपली उत्सुकता वाढते. पहिल्या टप्प्याच्या पठारावर जाताक्षणी पायऱ्या ठळक आणि सुस्पष्ट दिसू लागतात, हा टप्पा पूर्ण करून पायऱ्यांच्या तिथं पोहोचण्यास साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो.



आणि मग येतात त्या आखीव-रेखीव कातळ पायऱ्या...       ८० अंश कोणातील उभ्या आणि खड्या कातळात खोदलेल्या या पायऱ्या पहिल्यांदा सोप्या वाटतात परंतू आपण जसजसे वर जावू तसतशा धडकी भरायला लावतात. काळजी नको, दम लागलाच तर एकदोन जागी आपण विसावा घेवू शकतो इतकी जागा त्या अभियंत्याने करून ठेवलेली आहेच. मी पायऱ्यांची मोजदाद करण्याच्या भानगडीत न पडता सरळ वर जायला घेतलं. स्थानिक लोकांच्या मते एकूण ३०० पायऱ्या असून चढताना पाय घसरू नये म्हणून त्यांची रचना बहुतांश पायऱ्यांवर अंतर्वक्र आढळते. पायऱ्यांच्या दोन्ही कोपऱ्यावर सहज आधार घेता येऊ शकतील आणि आपल्या हाताची बोटे मावू शकतील अशा खाचा-खोबण्या. अगदीच १५ ते २० मिनिटांत हा टप्पा पूर्ण करून आपण कमानीत म्हणजेच प्रवेशद्वाराजवळ येतो. इथून पुढच्या टप्प्यावर पायऱ्या बांधणे अशक्यप्राय असल्याचे ओळखून तत्कालीन अभियंत्यांनी थेट दक्षिण बाजूने कातळ फोडून बोगदा सदृश वाट केलेली आहे जी २० ते २५ पावलांची आहे. पूर्ण उंचीच्या लोकांना मान तुकवून चालावं लागतं. पुढे कातळ पायऱ्या त्याही काही ठिकाणी कातळाच्या पोटातून. या पायऱ्या किल्ले कोथळीगड च्या पायऱ्यांशी मिळत्या-जुळत्या वाटतात. हा टप्पा पूर्ण करण्यास अजून १५ ते २० मिनिटे लागतात व आपण किल्ल्याच्या मुख्य पठारावर येवून थांबतो, प्रवेशाच्या उजव्या बाजूस बुरुज सदृश बांधकाम जे उध्वस्त स्वरुपात आढळते, इथं भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. किल्ल्याचे मुख्य पठार साधारण २.५ वर्ग की.मी. इतके आहे. 

अजून ध्वज तो फडफडतो आहे!
     जगण्याचे मजला बळ देतो आहे!
वादळ वारे उन झेलता,
      पाठीराखा हा भगवा माझा!!




      पुढे थोडसं चालून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर जावून पोहोचतो. इथं आपल्याला आपले पूर्वज भेटतात आणि तेही भरपूर संख्येने. आपल्यासारखी दिसणारी ही जमात दुसरी कोण? हाच एक त्यांचा भाबडा प्रश्न. आयुष्यात पहिल्यांदा मी माणसासारखी उभी राहणारी माकडे पाहिली. त्यांचा एकच सपाटा यांचेकडे खायला काय असेल अन आम्हाला काय मिळेल. सदा सर्वदा खाणे खाणे आणि खाणेच! (कृपया आपले खाद्यपदार्थ आपल्या झोळ्यामध्ये लपवून ठेवा, नाहीतर माकडांचा हल्ला आपल्यावर होवू शकतो, इथं भूतदया दाखविण्याची गरज नाही). आणखीन पुढ गेल्यावर एक छोटीसी टेकडी पार करून आपण बालेकिल्ल्यापाशी येवून पोहोचतो. बालेकिल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याच्या पूर्व पठारावर गेल्यावर आपणास ब्रम्हगिरी रांग दिसू लागते, तसेच याच रांगेतील इतर किल्लेही दृष्टीपथात येतात. पठारावरील वेताळबाबाच्या मंदिराबाहेर एकूण ३ टाकी आहेत, त्यातील एका टाक्यातील पाणी पूर्णवेळ पिण्याजोगे आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने अजून थोडं पुढे गेल्यावर आपण पूर्व तटबंदीपाशी जातो, अर्थात याही तटबंदीची पडझड झालेली आहे. आपल्या पूर्वजांपासून सावध राहत सर्वांनी भुकेचे डोहाळे पुरवले. डॉ. सरिताजींनी आणलेल्या गुळ-पोळ्या लईच भारी हो!!

      याठिकाणी आपला किल्ला पाहून संपतो आणि आपसूकपणे पावले परतीची वाट धरतात. परतीच्या वाटेवर एके ठिकाणी उध्वस्त असे हनुमानाचे मंदिर आहे, शेजारीच शिवलिंग सुद्धा आहे. संपूर्ण किल्ल्याचे पठार, पूर्व बाजूची तटबंदी, मंदिर आणि बालेकिल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. सर्व पाहून झाल्यावर विनाविलंब परतीची वाट चोखाळली. दक्षिण-पश्चिम बाजूच्या भगव्या ध्व्जापाशी आल्यावर सर्वांनी एकत्रित फोटोसेशन केले व छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून आसमंत दणाणून सोडला.

      आता उत्सुकता एकच, सहजपणे चढून आलेल्या पायऱ्या तितक्याच सहजतेने उतरता येतील का? उतरताना कोणत तंत्र वापरायचं? या प्रश्नांची उत्तरे मनात शोधता शोधता एकेक पायरी उतरावयास घेतली. दुरून जितक्या अवघड वाटतात तितक्या अवघड पायऱ्या नाहीतच मुळी. आजवरच्या भटकंती दरम्यान पायऱ्या उतरताना शिकलेलं तंत्र म्हणजे आडव्या चालीने उतरणे. आडवी चाल कशी, तर पायरीच्या समोरच्या टोकावर उजवा पाय ठेवायचा, स्थिर झाल्याची खात्री करून डावा पाय उजव्या पायाच्या बरोबर मागे ठेवून देणे, आणि हे करताना डाव्या हाताची बोटे वरच्या खाच्यात रोवून ठेवणे. १० ते २० पायऱ्या या पद्धतीने उतरल्यावर बाजू बदलणे. आता डावा पाय खालच्या पायरीवर, त्याच्या मागे उजवा पाय आणि उजव्या हाताची बोटे एक पायरी वरच्या खाच्यात. या तंत्राच्या वापराने आपण सहज खाली उतरू शकतो आणि एका पायावर किंवा गुडघ्यावर जास्त ताण पडत नाही. पायऱ्या उतरण्यास सोप्या जरी वाटत असल्या तरीही "अखंड सावध असावे". माझ्यासोबतच्या इतर भिडूंना या तंत्राच्या वापराविषयी सांगितले असता काहीजणांनी ते आत्मसात केले आणि प्रत्यक्षात वापरले सुद्धा. बाकीचे सारे गुरुजी बोले अन विद्यार्थी हाले!! आपलेच ते पाढे ५५, असो!! साधारण २० मिनिटांत आपण कातळ पायऱ्या उतरून किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यावर परत येवून ठेपतो. इथून पुढे परतीची चाल अगदीच अर्ध्या तासाची आणि आपण टाके हर्ष किंवा हर्षेवाडी या पायथ्याच्या वाडीत पोहोचतो अन आपला ट्रेक संपतो.

      गिरिदुर्ग प्रकारात गणना होईल असा आणि चढाई श्रेणी सोपी ते मध्यम असलेला हा किल्ले हरिहर सह्याद्रीच्या उपरांगेत म्हणजेच त्र्यंबक रांगेत अभेद्य उभा आहे. किल्ल्याच्या संपूर्ण वाटेवर बहुतेक ठिकाणी स्थानिक लोकांनी टपऱ्या टाकलेल्या आहेत, त्यामधून ते अत्यंत माफक दरांत लिंबू सरबत, चहा आणि ठराविक नास्त्याचे पदार्थ बनवून देतात. स्थानिक लोकांची ही सेवावृत्ती मनास खरेच भावली. ही सेवा स्थानिक लोकं शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी पुरवतात याची कृपया नोंद घ्यावी.

किल्ल्याकडे जाण्यासाठीचे मार्ग:

१.      नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
२.      नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणार्‍या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.

      आज वेळेअभावी सर्व सदस्यांचा नामोल्लेख टाळत आहे. भेटू लवकरच आणखीन एका दर्जेदार भटकंती सहित, सह्याद्रीच्या कुशीत रममाण होण्यासाठी जीव आसुसलेला आहेच. संपूर्ण ट्रेक यशस्वी करणारा आमचा नाना नेहमीप्रमाणे कौतुकास पात्र आहेच आहे, सोबत देवा, विशाल, डॉक्टर साहेब पण आहेतच. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय! जय हिंद, जय महाराष्ट्र!!

शेवटी इतकच...

गेली इतुकी वर्षे झरझर,
जातील पुढची तीही भरभर,
वेळ काढला व्यर्थ धरेवर,
सारे पाहिले पारखुनी तर,
असे वाटते, स्वैर फिरावे गुंतत या गगनात,
असे जगावे, असे मारावे, करुनिया यमावर मात...


  
आपला,


अभिजीत शिंदे
 पुणे.
 +९१ ९५२ ७३३० ५६७.

टीप: इतर सर्व फोटो पाहण्यासाठी इथं दिलेल्या लिंकवर एक टिचकी मारा.

https://photos.app.goo.gl/eY3pnCtriPdojkbx

9 comments:

  1. खुप सुंदर शब्दरचना आणि कल्पनेच पालिकडील सफारी होती आपली हरिहर ।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपला सहवास लाभला हेच आजच्या ट्रेकचे फलित.

      Delete
  2. शिंदे सरकार खरंच खुप सुंदर वर्णन केलंय आणि ब्लॉग वाचल्यावर पुन्हा एकदा गडावर जाऊन आलीची अनुभूती होते.
    भगव्याबद्दल चारोळी ही अप्रतिम लिहिल्या आहेत.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर वर्णन केले आहे. संपूर्ण प्रवास तिथे नसताना सुद्धा प्रत्यक्ष अनुभवला असे वाटते.

    ReplyDelete