Wednesday, December 5, 2018

|| बेलाग कातळकड्याच्या मोहमायेचा कहर – किल्ले हरिहर! ||


|| बेलाग कातळकड्याच्या मोहमायेचा कहर – किल्ले हरिहर! ||

“भटकंती” या शब्दाच्या अर्थाच्या आसपास राहणारे आणि त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करणारे आम्ही भटके आजवर बरेच किल्ले पाहून, घाटवाटा आणि दऱ्याखोऱ्यामध्ये अक्षरश: वरावरा फिरून, मुक्काम ठोकून आलेलो आहोत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. काही ठिकाणी वाट चुकणे, धडाधड आपटणे, तहानेने व्याकूळ होणे, एखाद-दुसरा भिडू गळपटणे, त्यास आधार देत परत आणणे हे आता नित्याचे झाले आहे. बरेच दिवस झाले एक वेगळ्या धाटणीतला किल्ला पाहण्याचे कार्यक्रम ठरत होते आणि काहीनाकाही कारणाने ते रद्द होत होते. मागच्याच आठवड्यात अशाच एक आगळ्यावेगळ्या सांधण दरीचा रोमांचक उतराईचा थरार अनुभवला होताच आणि तोच किंवा तसाच थरार अनुभवण्यासाठी सगळे आतूर झाले होते. सर्व भटक्यांच्या चर्चेला उधाण आलं आणि बेलाग, बेबंध आणि राकट असा किल्ले हरिहर निवडण्यात आला आणि एक दिवसीय कार्यक्रम पत्रिका ठरली. सांधण दरीच्या उतराईचा थरार अनुभवलेले जवळपास सर्व भटके सह्याद्रीच्या कुशीतील एकमेवाद्वितीय ८० अंश कोणातील कातळ पायऱ्या असलेला, बांधकाम इतकं उत्कृष्ट/अभेद्य की त्यास उध्वस्त करण्यासाठी तोफा घेवून समोर उभ्या ठाकलेल्या इंग्रज अधिकारीरुपी शत्रूला प्रेमात पडण्यास भाग पाडणारा आणि बेमालूमपणे माघार घ्यायला लावणारा “किल्ले हरिहर” डोळ्यासमोर उभा राहिला. आता सहकारी भिडूंची जमवाजमव करण्याची तयारी सुरु झाली, काही क्षणाच्या आत जवळपास २५ जण तयार झाले आणि दोन ते तीन दिवसांत हा आकडा ५० च्या वर जावून पोहोचला.

थोडसं “किल्ले हरिहर” विषयी...

सह्याद्रीच्या कुशीतील इतर काही किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्यास मोठ्या लढाया आणि राज्यकारभाराचा इतिहास नाही. छत्रपती शहाजी महाराजांनी त्यांचे अखत्यारीतील निजामशाहीच्या  पुनर्स्थापनेच्या वेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला जिंकून घेतला व निजामशाहीच्या पाडावानंतर तो स्वराज्यात सामील झाला, आणि नंतर सर्वकाळ अजिंक्य राहिला. इतर सर्व काळ हा किल्ला आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी टेहळणी स्वरुपात वापरला गेला असून या किल्ल्याचे बांधकाम सातवाहनपूर्व बौद्धकालीन असल्याचे लक्षात येते. या किल्ल्याच्या रौद्र्तेकडे पाहिल्यावर काळजात धस्स तर होतचं पण उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा किल्ला सह्याद्रीची उपरांग त्र्यंबक रांगेत अभेद्य उभा आहे.




हा किल्ला मुख्यत्वेकरून दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा म्हणजे पायथ्याच्या सभोवताली असलेले विरळ जंगल आणि त्यातून जाणारी पायवाट आणि दुसरा टप्पा अर्थातच आखीव-रेखीव कातळ पायऱ्या, ज्यांच्या प्रेमात कोणीही पडेल अशा. ज्या काळात हा किल्ला बांधला गेला, त्या काळातील लोकसंख्या आठवली आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने पाहिले तर त्याकाळचे लोकं किती हुशार आणि दूरदृष्टीचे होते याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही. कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून कोणीही सहज वर चढून जावू शकेल इतका पायऱ्यांच्या आकार, भर पावसातसुद्धा आत्मविश्वासाने न डगमगता चढताना आधारासाठी दोन्ही हातांची बोटे बसतील इतक्या खाचा किंवा खोबण्या, जिथं पायऱ्या बांधता येणार नाहीत अशा ठिकाणी खोदलेला कातळ बोगदा आणि पुढ कातळाच्या पोटात खोदलेल्या पायऱ्या, किल्ल्याच्या पठारावर मानवी वसाहत, संपूर्ण वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा करण्यासाठी ५ ते ६ पाण्याच्या टाक्या, मंदिर आणि तटबंदी. सार काही अजब, अद्भुत आणि अद्वितीय.

शिरवळ, पुणे आणि मंबई शहरांमध्ये स्थायिक जवळपास ५०-५५ भटके या किल्ल्याचा थरार अनुभवण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी आपापली कामे आटोपून संध्याकाळी उशिरा १० वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथे जमले, अर्थातच काहीजण मुंबईहून थेट पायथ्याच्या गावी पोहोचणार होते. अर्ध्याहून अधिक आज डॉक्टर्स होते आणि आमचे मार्गदर्शक डॉ. सुनील धुमाळ, डॉ. प्रविण डुंगरवाल, सचिन धस साहेब आणि इतर मित्र होते, गर्दीचे आकर्षण ठरलेला युवराज श्वेतांक, त्याची टीवटीवी दीदी आणि सोहम. शनिवार आहे, उपवास आहे हे सगळं बाजूला ठेवून सर्वांनी अंडाबुर्जी वर हात साफ केला, तोही इतका की त्या गाडीवरचे अन्नपदार्थ संपले. आम्हाला घेवून जाणारी बसगाडी आली, आणि सगळे स्थानापन्न झाले, वाटेत इतर भिडूंना घेवून आमच्या गाडीने पुणे सोडले ते किल्ल्याच्या पायथ्याचे गाव टाके हर्ष किंवा आजच्या हर्षेवाडीसाठी. वाटेत नारायणगाव येथील मसाला दुध पिवून झाले आणि पुढचा प्रवास चालू झाला. गाडीने एकेक गाव-वाडी, नाशिक शहर मागे सोडले आणि पहाटे ५:३० च्या दरम्यान पायथ्याचे गाव गाठले.




झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं, समोरच अभेद्य उभा हरिहर दृष्टीक्षेपात आला होता, शेजारच्या ब्रम्हा डोंगराच्या आणि हरिहरच्या खिंडीत शुक्रतारा आणि सोबतीला उगवतीच्या किरणांनी लालबुंद झालेलं आभाळ कसं विलोभनीय दिसत होत. वेळ न दवडता आवराआवर केली आणि चहा-नास्ता उरकून घेतला, बूट चढवले आणि किल्ल्याकडे प्रस्थान सोडले. लगोलग सर्वांनी आपापले भ्रमणध्वनी बाहेर काढले आणि अवघा आसमंत त्याच्या क्लिक्सने भरून गेला. किल्ल्याची चढाई आपण पश्चिम बाजूने करतो त्यामुळे शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे कातळाच्या मायेचा कहर आपणास अनुभवता येतो. अगदी किल्ल्याच्या पठारावर पोहोचेस्तोवर आपणास उन्हाचा त्रास होत नाही, संपूर्ण वेळ आपण सावलीतून थंडगार वाऱ्याच्या झुळूकेसोबत चालत राहतो. पहिला टप्पा हा गर्द-विरळ अशा स्वरूपाच्या झाडीचा जरी असला तरी दमून जायला लावतोच. दोन ठिकाणची खडक चढाई केल्यानंतर पहिल्यांदा गडाची मुख्य ओळख आणि आकर्षण असलेल्या कातळ पायऱ्या दृष्टीक्षेपात येतात आणि आपली उत्सुकता वाढते. पहिल्या टप्प्याच्या पठारावर जाताक्षणी पायऱ्या ठळक आणि सुस्पष्ट दिसू लागतात, हा टप्पा पूर्ण करून पायऱ्यांच्या तिथं पोहोचण्यास साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो.



आणि मग येतात त्या आखीव-रेखीव कातळ पायऱ्या...       ८० अंश कोणातील उभ्या आणि खड्या कातळात खोदलेल्या या पायऱ्या पहिल्यांदा सोप्या वाटतात परंतू आपण जसजसे वर जावू तसतशा धडकी भरायला लावतात. काळजी नको, दम लागलाच तर एकदोन जागी आपण विसावा घेवू शकतो इतकी जागा त्या अभियंत्याने करून ठेवलेली आहेच. मी पायऱ्यांची मोजदाद करण्याच्या भानगडीत न पडता सरळ वर जायला घेतलं. स्थानिक लोकांच्या मते एकूण ३०० पायऱ्या असून चढताना पाय घसरू नये म्हणून त्यांची रचना बहुतांश पायऱ्यांवर अंतर्वक्र आढळते. पायऱ्यांच्या दोन्ही कोपऱ्यावर सहज आधार घेता येऊ शकतील आणि आपल्या हाताची बोटे मावू शकतील अशा खाचा-खोबण्या. अगदीच १५ ते २० मिनिटांत हा टप्पा पूर्ण करून आपण कमानीत म्हणजेच प्रवेशद्वाराजवळ येतो. इथून पुढच्या टप्प्यावर पायऱ्या बांधणे अशक्यप्राय असल्याचे ओळखून तत्कालीन अभियंत्यांनी थेट दक्षिण बाजूने कातळ फोडून बोगदा सदृश वाट केलेली आहे जी २० ते २५ पावलांची आहे. पूर्ण उंचीच्या लोकांना मान तुकवून चालावं लागतं. पुढे कातळ पायऱ्या त्याही काही ठिकाणी कातळाच्या पोटातून. या पायऱ्या किल्ले कोथळीगड च्या पायऱ्यांशी मिळत्या-जुळत्या वाटतात. हा टप्पा पूर्ण करण्यास अजून १५ ते २० मिनिटे लागतात व आपण किल्ल्याच्या मुख्य पठारावर येवून थांबतो, प्रवेशाच्या उजव्या बाजूस बुरुज सदृश बांधकाम जे उध्वस्त स्वरुपात आढळते, इथं भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. किल्ल्याचे मुख्य पठार साधारण २.५ वर्ग की.मी. इतके आहे. 

अजून ध्वज तो फडफडतो आहे!
     जगण्याचे मजला बळ देतो आहे!
वादळ वारे उन झेलता,
      पाठीराखा हा भगवा माझा!!




      पुढे थोडसं चालून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर जावून पोहोचतो. इथं आपल्याला आपले पूर्वज भेटतात आणि तेही भरपूर संख्येने. आपल्यासारखी दिसणारी ही जमात दुसरी कोण? हाच एक त्यांचा भाबडा प्रश्न. आयुष्यात पहिल्यांदा मी माणसासारखी उभी राहणारी माकडे पाहिली. त्यांचा एकच सपाटा यांचेकडे खायला काय असेल अन आम्हाला काय मिळेल. सदा सर्वदा खाणे खाणे आणि खाणेच! (कृपया आपले खाद्यपदार्थ आपल्या झोळ्यामध्ये लपवून ठेवा, नाहीतर माकडांचा हल्ला आपल्यावर होवू शकतो, इथं भूतदया दाखविण्याची गरज नाही). आणखीन पुढ गेल्यावर एक छोटीसी टेकडी पार करून आपण बालेकिल्ल्यापाशी येवून पोहोचतो. बालेकिल्ला पाहून झाल्यावर किल्ल्याच्या पूर्व पठारावर गेल्यावर आपणास ब्रम्हगिरी रांग दिसू लागते, तसेच याच रांगेतील इतर किल्लेही दृष्टीपथात येतात. पठारावरील वेताळबाबाच्या मंदिराबाहेर एकूण ३ टाकी आहेत, त्यातील एका टाक्यातील पाणी पूर्णवेळ पिण्याजोगे आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने अजून थोडं पुढे गेल्यावर आपण पूर्व तटबंदीपाशी जातो, अर्थात याही तटबंदीची पडझड झालेली आहे. आपल्या पूर्वजांपासून सावध राहत सर्वांनी भुकेचे डोहाळे पुरवले. डॉ. सरिताजींनी आणलेल्या गुळ-पोळ्या लईच भारी हो!!

      याठिकाणी आपला किल्ला पाहून संपतो आणि आपसूकपणे पावले परतीची वाट धरतात. परतीच्या वाटेवर एके ठिकाणी उध्वस्त असे हनुमानाचे मंदिर आहे, शेजारीच शिवलिंग सुद्धा आहे. संपूर्ण किल्ल्याचे पठार, पूर्व बाजूची तटबंदी, मंदिर आणि बालेकिल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. सर्व पाहून झाल्यावर विनाविलंब परतीची वाट चोखाळली. दक्षिण-पश्चिम बाजूच्या भगव्या ध्व्जापाशी आल्यावर सर्वांनी एकत्रित फोटोसेशन केले व छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून आसमंत दणाणून सोडला.

      आता उत्सुकता एकच, सहजपणे चढून आलेल्या पायऱ्या तितक्याच सहजतेने उतरता येतील का? उतरताना कोणत तंत्र वापरायचं? या प्रश्नांची उत्तरे मनात शोधता शोधता एकेक पायरी उतरावयास घेतली. दुरून जितक्या अवघड वाटतात तितक्या अवघड पायऱ्या नाहीतच मुळी. आजवरच्या भटकंती दरम्यान पायऱ्या उतरताना शिकलेलं तंत्र म्हणजे आडव्या चालीने उतरणे. आडवी चाल कशी, तर पायरीच्या समोरच्या टोकावर उजवा पाय ठेवायचा, स्थिर झाल्याची खात्री करून डावा पाय उजव्या पायाच्या बरोबर मागे ठेवून देणे, आणि हे करताना डाव्या हाताची बोटे वरच्या खाच्यात रोवून ठेवणे. १० ते २० पायऱ्या या पद्धतीने उतरल्यावर बाजू बदलणे. आता डावा पाय खालच्या पायरीवर, त्याच्या मागे उजवा पाय आणि उजव्या हाताची बोटे एक पायरी वरच्या खाच्यात. या तंत्राच्या वापराने आपण सहज खाली उतरू शकतो आणि एका पायावर किंवा गुडघ्यावर जास्त ताण पडत नाही. पायऱ्या उतरण्यास सोप्या जरी वाटत असल्या तरीही "अखंड सावध असावे". माझ्यासोबतच्या इतर भिडूंना या तंत्राच्या वापराविषयी सांगितले असता काहीजणांनी ते आत्मसात केले आणि प्रत्यक्षात वापरले सुद्धा. बाकीचे सारे गुरुजी बोले अन विद्यार्थी हाले!! आपलेच ते पाढे ५५, असो!! साधारण २० मिनिटांत आपण कातळ पायऱ्या उतरून किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यावर परत येवून ठेपतो. इथून पुढे परतीची चाल अगदीच अर्ध्या तासाची आणि आपण टाके हर्ष किंवा हर्षेवाडी या पायथ्याच्या वाडीत पोहोचतो अन आपला ट्रेक संपतो.

      गिरिदुर्ग प्रकारात गणना होईल असा आणि चढाई श्रेणी सोपी ते मध्यम असलेला हा किल्ले हरिहर सह्याद्रीच्या उपरांगेत म्हणजेच त्र्यंबक रांगेत अभेद्य उभा आहे. किल्ल्याच्या संपूर्ण वाटेवर बहुतेक ठिकाणी स्थानिक लोकांनी टपऱ्या टाकलेल्या आहेत, त्यामधून ते अत्यंत माफक दरांत लिंबू सरबत, चहा आणि ठराविक नास्त्याचे पदार्थ बनवून देतात. स्थानिक लोकांची ही सेवावृत्ती मनास खरेच भावली. ही सेवा स्थानिक लोकं शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी पुरवतात याची कृपया नोंद घ्यावी.

किल्ल्याकडे जाण्यासाठीचे मार्ग:

१.      नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
२.      नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणार्‍या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.

      आज वेळेअभावी सर्व सदस्यांचा नामोल्लेख टाळत आहे. भेटू लवकरच आणखीन एका दर्जेदार भटकंती सहित, सह्याद्रीच्या कुशीत रममाण होण्यासाठी जीव आसुसलेला आहेच. संपूर्ण ट्रेक यशस्वी करणारा आमचा नाना नेहमीप्रमाणे कौतुकास पात्र आहेच आहे, सोबत देवा, विशाल, डॉक्टर साहेब पण आहेतच. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय! जय हिंद, जय महाराष्ट्र!!

शेवटी इतकच...

गेली इतुकी वर्षे झरझर,
जातील पुढची तीही भरभर,
वेळ काढला व्यर्थ धरेवर,
सारे पाहिले पारखुनी तर,
असे वाटते, स्वैर फिरावे गुंतत या गगनात,
असे जगावे, असे मारावे, करुनिया यमावर मात...


  
आपला,


अभिजीत शिंदे
 पुणे.
 +९१ ९५२ ७३३० ५६७.

टीप: इतर सर्व फोटो पाहण्यासाठी इथं दिलेल्या लिंकवर एक टिचकी मारा.

https://photos.app.goo.gl/eY3pnCtriPdojkbx

Friday, October 19, 2018

|| राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा “किल्ले हरिश्चंद्रगड”... ||


|| राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा “किल्ले हरिश्चंद्रगड”... ||


बहुप्रतीक्षित असा किल्ले हरिश्चंद्रगड करणे उद्देश मनात ठेवून काही दिवसांपूर्वी आमच्या डॉक्टर साहेबांना विनवणी केली असता त्यांनी ती लगेच विचाराधीन घेतली आणि लवकरच उरकून टाकू असे खात्री वजा आश्वासन दिले. माझ्या पश्चात त्यांनी बाकीच्या भिडूंना फोन कॉल्स करून जमवाजमव करायला सुरुवात केली अचानक एक दिवस मला त्या ग्रुपमध्ये घेतले सुद्धा!! मी आश्चर्यचकित झालो, एवढ्या जलद आश्वासनाची पूर्तता होतीय याचा एक विलक्षण आनंद झाला. त्याच आनंदात मी माझी नेहमीची झोळी भरून ठेवली, आता प्रतीक्षा होती त्या दिवसाची, दिवस ठरला. त्या रात्री प्रवासात एकही मिनिट झोप लागली नाही, किंबहुना झोपायचे नव्हतेच. गाडीत बसल्यावर एकेक भिडूला घेत आम्ही आमचं मार्गक्रमण सुरु ठेवल, शेवटी नानाला उचलला आणि गाडीने वेग धरला तो पाचनई गावासाठी. प्रत्येकाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता, डीजे मराठी गाण्यांवर प्रत्येकजण थिरकू लागला होता. नारायणगाव येथे नेहमीप्रमाणे सर्वांनी मसाला दुध रिचवले, कोणी दोन ग्लास ओढले तर कोणी एकातच समाधानी झाले. यावेळी संपूर्ण नवे चेहरे होते पण त्यातले एकूणच सगळे प्रसन्न, हसतमुख चेहरे पाहून आम्ही नेहमीचे भटके अगदी मनातून आनंदी झालो. हमरस्ता सोडून गाडीने गावाकडचा रस्ता धरला आणि उत्कंठा शिगेला पोहोचली. तीन तासांच्या रटाळ प्रवासाने अगदी भल्या पहाटे, झुंजूमुंजू व्हायला अगदी थोडासा वेळ शिल्लक असताना गाडी पाचनई येथे पोहोचली. समोरच्या लांबसडक काळ्याकभिन्न कातळ कड्याकडे नजर गेलीच, मनोमन वाटले हाच का तो हरिश्चंद्र राजा आणि राणी तारामती यांचा किल्ला, पण तो हा नव्हता, पण किल्ल्याचा एक भाग “वेताळकडा” होता तो. आमचा सहकारी नागेशच्या घरी मुक्कामाची व्यवस्था होती, जसे सगळे घरी पोहोचले तसेच जागा बघून आडवे झाले, डॉक्टर साहेब कधी निद्रादेवीच्या अधीन झाले कळलेच नाही. 


थोडसं पाचनई ह्या गावाच्या नावाविषयी...

पाचनई हा अपभ्रंश आहे पाच नद्यांचा, या पाच नद्यांना कोणतीही नावे नाहीत, त्या अनामिकच आहेत. गावाच्या उत्तर बाजूस समोरच्या उभ्या असलेल्या आडव्या कड्यावरून आणि त्याच्या समोर असलेल्या गायरान कड्यावरून एकूण ५ नद्यांचा उगम होतो ज्या धबधब्यांच्या स्वरुपात खाली कोसळतात, अर्थातच पावसाळ्यात. त्या पाच नद्या सपाटीवर येवून एकत्र येतात आणि पुढचा प्रवास करतात. त्या पाच नद्यांचे उगमस्थान म्हणजेच पाचनई होय. याच गावाच्या शिवारातून किल्ल्यासाठी एक वाट जाते, तीच ती वाट म्हणजे पाचनईची वाट...

अंघोळ वजा हातपाय धुवून तयार झालो आणि आमचा स्पेशल ट्रेकर्स ड्रेस परिधान केला आणि इतर सामानाची आवराआवर केली. तोवर नागेशच्या घरच्यांनी पोहे, उपमा तयार केलेला होता, नाश्ता उरकून घेवून इतर भिडूंना आवराआवर करण्यास सांगितले. राहुल आणि पल्लवी आजच्या दिवसाचं लेट लतीफ जोडपं! सगळे एकत्र आले, ओळख परेड झाली आणि लगोलग चालायला सुरुवात केली. आजची चढाई दमछाक करणारी असणार असे मनोमन वाटले वेताळकड्याकडे पाहिल्यावर. गावाच्या वेशीवर आल्यावर लगेचच एक रस्ता उजव्या बाजूला “हापाट्याचा कडा” पाहण्यास घेवून जाते. माझी जबाबदारी नानाने अगोदरच मला देवून टाकली होती, सर्वांच्या मागे चालायचे आणि शेवटी राहणाऱ्या भिडूंना घेवून यायचे. पहिल्या मार्गदर्शक फलकापासून सर्वांचे फोटोसेशन चालू झाले. झपझप चालणारी मंडळी पुढे खड्या चढाईच्या वाटेला लागली होती, मागे मी अनघा, संयुक्ता आणि डॉक्टर साहेब कासव चालीने पुढे पुढे सरकत होतो. पहिल्या टप्प्याची सोपी वाट सोडून परत एकदा सपाट भागावर भात खाचरांमध्ये आलो. आजूबाजूला भाताची पिके वाऱ्याच्या झुळुकेने हलताना खूप छान दिसत होती. आता होता दुसरा टप्पा, थोडासाच परंतू सुटलेले दगडगोटे आणि सरकणारी मातीची वाट, तीनचार नागमोडी वळणे घेत पायऱ्यांच्या टप्प्यावर येवून पोहोचलो, एव्हाना अनघा आणि संयुक्ता दमल्या होत्या. त्यांची चाल पाहून डॉक्टर साहेबांनी कधी कल्टी मारली कळलेच नाही हो. पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केल्यावर समोर पुढे आडवा कडा दृष्टीक्षेपात आला, सोबत दमलेले नंदन-पूनम आणि सुशील हे भिडू दिसले. बिचाऱ्यांचे पहिले दुसरे ट्रेक असतील हे, आणि ओझं घेवून न चालण्याच्या सरावामुळे घामाघूम झालेले होते ते तिघेही. एके ठिकाणी विश्रांतीस थांबले असता सर्वांना खाली न बसण्याचा सल्ला दिला, एकदा का आपण खाली बसलो आपले स्नायू आराम अवस्थेत जातात आणि पुन्हा दुखायला लागतात आणि पुढच्या टप्प्यांवर त्रास होतो. हा मधला टप्पा झाडाझुडपांनी भरलेला असले कारणाने उन्हाचा फार चटका लागत नाही. या टप्प्यावरून पुढे साधारण १०० मीटर अंतराचा टप्पा ७० अंश कोणाचा आणि तिरकी वाट, खरा कस काढणारी आणि संघर्ष करायला शिकवणारी. या टप्प्यावर झाडे नाहीत, आता कुठे सूर्य थोडासा वरती आलेला आणि वातावरण स्वच्छ झालेलं. इथे सर्वानीच मस्त फोटोसेशन करून घेतलं, करण, नारायण, श्वेता, राहुल-पल्लवी, कॅप्टन रॉस, विष्णूप्रताप आणि मुंबईचे वकीलसाहेब, संदीप, अभिषेक सर्वजण भेटले. आमचे शेवटचे दोन भिडूही आले.

आडवा कडा – उत्तर महाराष्ट्रातील सह्याद्रीची पर्वतरांग ही थोडीशी वेगळी भासते, सर्वात वरचा टप्पा काळाकभिन्न कातळ खडकाचा, खडे रौद्रकडे. सर्वात वरच्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मधोमध वर्षानुवर्षे वाहणाऱ्या वाऱ्याने तयार झालेली पोकळी किंवा विस्तीर्ण मोठी खोबणं! याच पोकळीतून पुढची आडवी वाट जाते, सावली पाहून दमलेले सर्व भिडू इथं काही वेळासाठी विश्रांतीसाठी थांबले. काहीठिकाणी मोठाल्या गुहासदृश जागा तयार झालेल्या आहेत जिथं आपण आरामात आपला तंबू ठोकू शकतो. पुढे ही वाट साधारण ५०० मिटर अंतराच्या चालीने गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर येते. याच आडव्या कड्यावरून दोन धबधबे आपल्या समोर कोसळतात, अर्थातच पावसाळ्यात. यंदा पावसानेही आपला कारभार लवकरच आटोपला आहे. आडवा कडा आणि गायरान कडा जिथं जोडले जातात तिथे गडावरून येणारे पाण्याचे प्रवाह एकत्र येवून अजून एक मोठाला धबधबा तयार होतो.

आता वेळ होती न्याहारीची, सर्वांनी पथारी पसरली, दमले भागलेले जीव सारे भुकेने व्याकूळ झाले होते. सर्वांनी काहीनाकाही बरोबर आणले होते, सर्वांनी एकत्र न्याहारी घेतली आणि कड्यावरच्या डोहातील थंडगार पाणी पिवून कासावीस झालेल्या जीवाला थोडी शांती दिली. ही शांती फार काळ टिकणार नव्हती, कारण पुढे अजून एक रग्गड चढाई करून किल्ले हरिश्चंद्रगड नुसता दृष्टीक्षेपात येणार होता. इथून पुढे डावीकडची वाट जी थेट बालेकिल्ल्याकडे जाते, तिने मार्गक्रमण करायचे ठरवले आणि पथारी उचलली. सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे जाते. अजून एक टेकडी पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य आणि विस्तीर्ण पसरलेल्या वेताळकडा पठारावर पोहोचतो, हे पठार साधारण २ ते ३ वर्ग किमी इतके आहे. आता समोर दोन अजून उंच शिखरे दिसू लागली होती, ती म्हणजेच हरिश्चंद्र गडाचा बालेकिल्ला डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचे आणखीन उंच तारामती शिखर. आता पठारावरची वाट थोडी उंच, सखल आणि सपाट जमिनीवरची वाट, पाहावे तिकडे सोनकीची पिवळी धम्मक फुले, हिरवीगार गवत कुरणे, झाडे वेली आणि दिवसाउजेडी कर्णकर्कश आवाज करणारे किडे. वातावरणाचा बाज काही औरच, अधूनमधून अनेकाविध रंगांची फुलपाखरे कानोसा घेत आजूबाजूने घिरट्या घालत होती. त्यांच्या मनी बहुधा एकच प्रश्न असावा .. “कोण बरे हे लोकं??”. आता सूर्य डोक्यावर आलेला आणि त्या नारायणाने आता त्याचा रंग दाखवायला सुरुवात केलेली होती. आता मात्र पावले झपझप बालेकिल्ल्याच्या दिशेने पडत होती. अर्ध्याअधिक तासाच्या कसदार चालीने आपण बालेकिल्ल्याच्या जवळ पोहोचतो. आता पुढचे लक्ष जे समोर खुणावत होते ते म्हणजे बालेकिल्ला.

दोन-तीन भिडूंनी बालेकिल्ल्यावर न जाता खालीच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिथं एका सुरक्षित जागी सोडून इतरांनी बालेकिल्ल्याची वाट धरली, वाट अशी कसली नाहीच मुळी. आपण जिथून जाऊ शकू तीच वाट. आमच्यातील दोन भिडूंच्या पायाचे स्नायू आखडले, त्यांना व्यायाम दिला आणि पुढे नेले. अर्ध्या तासाच्या रग्गड चालीने आम्ही बालेकिल्ला गाठला, त्याअगोदर संपूर्ण पडझड झालेली तटबंदी दिसली, तटबंदीचे दगड इतके आखीव-रेखीव की जे आजच्या अभियांत्रिकीला लाजवतील असे. किल्ल्याच्या सुरवातीला एक पाण्याचे टाके बुजलेल्या अवस्थेत आहे परंतु तिथलं पाणी पिण्यायोग्य आहे. सुरुवातीला कोणीही पाणी प्यायचे धाडस केले नाही. अजून थोडसं पुढ गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या भग्नावस्थेतील इमारतीत प्रवेश करतो. सुरुवातीला एक पाण्याचे टाके आहे, ज्यातील पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये. त्याकाळच्या जीवनशैलीच्या खाणाखुनांमधील एक दगडी जाते तुटलेल्या अवस्थेत सापडले, ते सगळे एकत्र करून त्यास मूर्त स्वरूप देण्याचा एक प्रयत्न केला. समोरच एका दगडी चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिस्त मूर्ती बसवलेली आहे, आता एकच महाराजांच्या समोर नतमस्तक झालो आणि मनोमन महाराजांचे आशीर्वाद घेतले. एक वेगळं काहीतरी साध्य केल्याचा अनुभव आला.


      बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूस गेले असता विस्तीर्ण पसरलेली सह्याद्रीची विशाल आणि रौद्र पर्वतरांग नजरेस पडते, हे दृष्य पाहणे म्हणजे स्वर्गस्थ अनुभवच हो!! खालच्या बाजूला पिंपळगाव जोगा धरण, त्याच्या उजवीकडील बाजूस संपूर्ण माळशेज घाटरस्ता आणि त्याच्याच मागील रांगेत नानाचा अंगठा आणि किल्ले जीवधन व नाणेघाट सुस्पष्ट दिसत होते तसेच शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, नानाचा अंगठा, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुली, कलाडगड, भैरवगड-मोरोशी, तसेच भैरवगड-शिरपुंजे आणि कुंजरगड असे किल्ले दिसतात. खिरेश्वर गाव आणि पडलिंगी नेढ समोरच दिसते. आता किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहून झाला होता, थकवा कुठच्याकुठे गायब झाला होता. बालेकिल्ल्यावरून उजव्या बाजूस अजून एक उंच शिखर दिसते ते म्हणजे तारामती शिखर, आता उत्सुकता होती ते सर करण्याची.

      नेढ म्हणजे काय असते?

      काही दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीच्या पोटातील तप्त लाव्हा बाहेर पडून सह्याद्रीच्या पर्वतरांगेची निर्मिती झाली त्यादरम्यान काही कातळभिंती सुद्धा तयार झाल्या ज्या तुलनेने लहान पण उंच होत्या. त्या कातळभिंतीची लांबी किमान १०० ते १५० फुट व जाडी अगदीच ३ ते ५ फुटांची होती. कोकण पट्ट्यातील वेगाने वाहणारा आणि घाटमाथ्यावर येणारा वारा या भिंतीवर आदळून त्या भिंतींची झीज होण्याची प्रक्रिया काही लाख वर्षे विनासायास चालू राहिलेली,  त्यामध्ये दरवर्षीचा पाऊस सुद्धा वाऱ्याला मदत करायचाचं. दरम्यानच्या काळात भिंतीमध्ये झीज होवून एखाद छिद्र पडणे आणि वारा आरपार वाहू लागणे, कालांतराने हे छिद्र मोठे होत जाणे. ही नैसर्गिकरित्या तयार झालेली छिद्रे म्हणजेच नेढ होय. अशी अनेक नेढी सह्याद्रीच्या अंतरंगात लुप्त झालेली आहेत, काही हौशी लोकांनी या नेढ्याचा शोध घेतला त्यास स्थानिक गावांची नावे दिली. बालेकिल्ल्यावरून सुस्पष्ट दिसणार हेच ते “पडलिंगी” नेढ! या नेढ्यापर्यंत पोहोचण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे मित्र व मार्गदर्शक श्री. रमेश खरमाळे आणि त्यांचे दोन सहकारी इथंवर पोहोचलेले आहेत.

      बालेकिल्ला पाहून झाला होता, आता पोटात भुकेचा आगडोंब उसळायला लागला होता. गड उतरून परत काहीतरी खाण्याचा बेत केला आणि लक्षात आले की सर्वांकडचे पाणी संपले आहे, तटबंदीच्या बाजूच्या टाक्यातील पाण्याचा कानोसा घेतला, थोडसं पिवून बघितलं तर काय पाणी एकदम थंडगार. पटापट बाटल्या भरून घेतल्या, एव्हाना ते पाणी पाहून नाक मुरडणारे मला दे, मला दे म्हणू लागले होते. १५-२० मिनिटांच्या सावध चालीने घसरगुंड्या वाटेने खाली उतरलो. आता नागेश म्हणाला की आपण हत्तीचं नेढ पाहून घेवू? काही भिडूंनी इथून थेट मंदिर गाठण्याचा निर्णय घेतला आणि ते तिकडे निघून गेले सुद्धा. आम्ही नागेश बाबाची शेपटी धरली आणि १५ मिनिटांच्या चालीनंतर हत्तीच्या नेढ्यापाशी पोहोचलो, हे नेढ आणि वर उल्लेखिलेले नेढ याच्यात अर्थाअर्थी काहीही साम्य नाही. हि जागा म्हणजे तीन वेगवेगळ्या पौराणिक गुहा, त्याही संपूर्ण कातळात खोदलेल्या. एका गुहेत तीन माणसे आरामात राहू शकतील अशा या गुहा, वर्षाचे बाराही महिने गुहांच्या आतमध्ये खोदलेल्या टाक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता. गुहांमधल्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचण्यासाठी एक विशिष्ठ खोदीव पाट, सार काही अद्भुत. गुहेतील वातावरण इतकं शांत आणि थंड की खरेच ध्यानाला बसावे आणि वर्षानुवर्षे बसून राहावे असे. या नीरव शांततेचा अनुभव घेवून परतीची वाट धरली आणि अर्ध्या तासाच्या नागमोडी वाटेने किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरापाशी आलो, आता वेळ होती थकलेल्या जीवाला थंड पाण्यात बुडवण्याची, वेळ न दवडता बर्फाचा नैसर्गिक थंडावा असलेल्या पाण्यात मनसोक्त डुंबून घेतले.  

थोडसं हरिश्चंद्रगडाविषयी...

'शके चौतिसशे बारा । परिधावी संवत्सरा ।।
मार्गशीर्ष तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।।
सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'

महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही, परंतु तटबंदी वजा भिंतीचे पडझड झालेले दगड सर्वत्र विखुरलेले दिसतात. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर हि या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे के प्रतिक आहे. सन १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते, तसेच गडाच्या दक्षिण बाजुने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या  गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.

मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

चार खांब - चार युगांचे प्रतीक

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. पाणी काहीअंशी गढूळ होते, पावसाळ्यात जिवंत स्त्रोत वाहू लागल्याने पाणी पूर्ववत शुद्ध होवून जाते.  याच बर्फासारख्या थंड पाण्यातून प्रदक्षिणा मारता येते. या चार खांबांपैकी ३ खांब उध्वस्त झालेले आहेत तर चौथा खांब अजूनही शाबूत आहे. पुढच्या आणि मागच्या बाजूचा एक-एक खांबांचे काही भाग दिसतात. असे म्हणतात की, ज्या दिवशी चौथा खांब कोसळेल त्या दिवशी पृथ्वीचा सर्वनाश होईल. मी या गोष्टीकडे एक दंतकथा म्हणून पाहतो, या म्हणण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही.

जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि चहा घेवून किल्ल्यावरचे मुख्य आकर्षण असणारा आणि सर्वांना पहावासा वाटणारा कोकणकडा आणि तिथला सूर्यास्त पाहून आजच्या दिवसाची सांगता करण्याचे ठरले आणि लगोलग पावले कोकणकडा कडे चालू लागली. १५ मिनिटांच्या सहज चालीने आणि नागमोडी वाटेने, परिसरातील आटलेले ओढे-नाले पार करत कोकणकडा गाठला, तोवर सूर्य आजच्या दिवसाची रजा घेण्याच्या तयारीला लागला होता.

कोकणकडा ...

कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला अर्धचंद्र कोरीसारखा अंदाजे दीड किमी लांबीचा हा रौद्र-भीषण कडा. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.

कोकणकड्याला पडलेली धोकादायक भेग- हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे. कडय़ाच्या टोकापासून सुमारे पाच ते दहा फूट अंतरावर भेग असून, येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे. कोकणकड्यावर सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणार्‍या वार्‍याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे. इथं जाणाऱ्या पर्यटकांनी “अखंड सावध असावे”.

सूर्य मावळतीला जात असतानाचे दृष्य, क्षणोक्षणी बदलणाऱ्या वातावरणातील रंगछटा आणि लालबुंद होत चाललेला सूर्याचा गोळा हे सगळं पाहणे म्हणजे एक अनोखा “सुखसोहळा” होय. याच अनुभवाची शिदोरी मनात साठवून परतीची वाट धरली आणि मुक्कामाच्या तळावर आलो आणि थंडगार वाऱ्याच्या साथीने चहाची चुष्की घेतली. आता वेळ होती आजच्या दिवसाची रजा घेण्याची, परंतु रजा घेऊ देईल तो सर्वेश कसला. स्नायुंना आराम पडावा म्हणून डॉक्टर साहेबांनी सर्वांकडून करवून घेतलेला हलका व्यायाम आणि नंतर शेकोटी पेटवून तिच्या भोवती सर्वांनी फेर धरून केलेली दंगामस्ती आणि सोबतील संदीपचे अफलातून गिटार वादन, अहाहा!! संध्याकाळचे थोडसं जेवण घेतलं आणि कुणालाही काहीही कळायच्या आत तंबूत घुसलो आणि निद्रेच्या अधीन झालो. मागून हळूच डॉक्टर साहेबांनी तंबूत प्रवेश घेतला. रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यात तंबूची चाललेली फडफड आम्हाला काही झोपू देत नव्हती, असे वाटत राहायचे की हा वारा आम्हासहित तंबूला दुसऱ्या जागी घेवून जातो की काय?

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली, उठून ब्रश करून थोडसं फ्रेश होवून घेतलं आणि पहिला एकेक कप चहा घेतला. रात्री उशिरापर्यंत जागे राहिलेले भिडू अजून गाढ झोपेत होते. ना-नुक्कड करत तारामती शिखर सर करायचे असे ठरवून टाकले. आता इतर लोकांचे आवरेस्तोवर न थांबता शिरवळचे दादा आणि मी निघण्याचा निर्णय घेतला, सोबत राहुलही आम्हाला मिळाला. तारामती शिखराकडे जाणारी वाट अगदीच खडतर म्हणता न येणारी परंतु सुरुवातीलाच कारवीच्या दाट झाडीतून नंतर गवत पठारावरून पुढे जावून ती कोकणपट्टा आणि घाटमाथा सीमेवर म्हणजेच समुद्र सपाटीपासून १३३५ मीटर उंचीवर येवून थांबते. वेस्टर्न घाट इको क्लब, अकोले या संस्थेने सदर उंची निश्चित करून एका दगडावर लिहून ठेवलेली आहे. इथं आल्यानंतर कोकणातील सोसाट्याचा वारा आपणास मंत्रमुग्ध करून टाकतो. पुढील चढाई साधारण ९६ मीटर उंचीची आणि तीन ठिकाणी कातळटप्पे असणारी आहे. सुमारे १५ मिनिटांच्या कसदार चढाईने आपण तारामती शिखर सर करून सपाटीवर पोहोचतो. इथं पोहोचल्यावर आपण महाराष्ट्र देशातील सर्वात उंच कळसुबाई शिखराच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर येवून एका विलक्षण सिद्धीस पात्र होता. तारामती शिखरावरून आजूबाजूला पाहिल्यास सह्याद्रीची विस्तीर्ण पसरलेली पर्वतरांग आणि तिच्यातले अनेकाविध किल्ले आणि शिखरे नजरेस पडतात, पैकी नवरा-नवरी, आजोबाचा किल्ला आणि बरेच. दूर उत्तर-पूर्व बाजूस दोन पर्वतांच्या पलीकडे आपणास कळसुबाईचे शिखर सुस्पष्ट दिसते. इकडे पश्चिमेकडे पाहिले असता, कोकणकडा, माळशेज घाट आणि कल्याण पर्यंतचा संपूर्ण कोकणपट्टा एका नजरेत सामावतो. शिखराच्या माथ्यावर कातळात तयार केलेलं एक शिवलिंग आहे जिथे स्थानिक लोकं आपली पूजा वाहतात आणि एक प्रकारे संवर्धनास मदत करतात. तारामती शिखरावर थोडा वेळ थांबल्यानंतर आता उताराची हुरहूर लागली आणि लगोलग उतरावयास सुरुवात केली. उताराच्या दुसऱ्या टप्प्यावर आमच्या टीमचे बाकी भिडू भेटले अर्थातच सर्वजण ढेपाळलेले. सगळ्यांना लवकर परतण्याची विनंती करून आम्ही उताराची वाट धरली आणि पाहतो तर काय राहुल परत एकदा त्याच्या तारामती सोबत पुन्हा एकदा शिखर सर करण्यास सज्ज झाला होता. वेळ न दवडता खाली उतरून मंदिरापाशी आलो, पुनश्चः एकदा गुहेतील थंडगार पाण्यात अंघोळ उरकली, तोवर आम्हाला टप्पा दिलेला आमचा मित्र नंदू, अविश आणि योगेश भेटले. सर्वांना नमस्कार सांगून मंदिरात जावून दर्शन घेतले. झोळी भरली, नाश्ता उरकून इतर भिडूंची वाट न पाहता संतोष भाऊ, दादा आणि मी किल्ला उतरून पाचनई गावात परतलो. आज उन्हाचा तडाखा कालच्यापेक्षा जास्त होता, काल चढाई करताना जितके घामाघूम झालो होतो त्याच्या दुप्पट घामाघूम आज झालो. वाटेत एके ठिकाणी मस्त लिंबू सरबताचा आस्वाद घेतला आणि गावात परतून आजच्या रग्गड भटकंतीची सांगता केली. परतीच्या वाटेवर एके ठिकाणी “पाप-पुण्याचा घडा” ही दोन कुंडे आहेत, त्यापैकी पुण्याचा घडा हा सदैव पाण्याने भरलेला असतो तर पापाच्या घड्यातील पाणी उन्हाळ्यात पार तळाला जाते, हाही एक निसर्गाचा अविष्कारचं म्हणावा लागेल.  

किल्ले हरिश्चंद्रगड उंची – १४२२ मीटर म्हणजेच ४६६५ फूट ..
तारामती शिखर उंची – १४३१ मित्र म्हणजेच ४६९४ फूट समुद्र सपाटीपासून ..
कोकणकडा – ३००० फुटांचा रौद्र-भीषण कडा ..

चढाई श्रेणी – मंदिरापर्यंत सोपी ते मध्यम आणि दोन्ही शिखरे मध्यम ते अवघड ...

महाराष्ट्र देशीच्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!

शेवटी ...

गेली इतुकी वर्षे झरझर,
जातील पुढची तीही भरभर,
वेळ काढला व्यर्थ धरेवर,
सारे पाहिले पारखुनी तर,
असे वाटते, स्वैर फिरावे गुंतत या गगनात,
असे जगावे, असे मारावे, करुनिया यमावर मात...

  
आपला,

अभिजीत शिंदे
पुणे.
+९१ ९५२७ ३३० ५६७.

फोटो पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा...

https://photos.app.goo.gl/TFu5kiofkPn2F48s6

Thursday, June 14, 2018

चिखलाने माखलेल्या वाटेवरची तंगडतोड बरोबर #काजवोत्सव (#fireflies_festival) आणि #किल्ले_राजमाची.


चिखलाने माखलेल्या वाटेवरची तंगडतोड बरोबर #काजवोत्सव (#fireflies_festival) आणि #किल्ले_राजमाची. 

साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते आणि सलग 4 महिने पाऊस मागच्या उन्हाळ्याने व्याकुळ आणि तप्त झालेल्या धरतीवर पाण्याचा शिडकावा घालतो आणि धरतीमाता तृप्त होते. शेतकरी राजा पेरणीच्या कामाला लागतो, अर्थातच त्याला पुढील वर्षाच्या अन्नधान्याची व्यवस्था करणे भाग असतेच. याच काळात आमच्यासारख्या असंख्य निसर्गप्रेमी मंडळींची पावले आपसुकपणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकण्यास आतुर झालेली असतात. मे महिन्याच्या उत्तरार्धात काही मंडळी भटकंतीचा प्लॅन (ब्ल्यू प्रिंट) करायला घेतात तर काही जण उठले आणि निघाले भटकायला, असे! या वर्षीच्या पावसाळ्यातील पहिलावहिला धम्माल आणणारा आणि जबरदस्त तंगडतोड असलेला ट्रेक आमच्या नानाने निवडला तो म्हणजे #किल्ले_राजमाची. बरं गाडीने थेट पायथ्यापर्यंत जायचे का तर अजिबात नाही, रात्री लोणावळ्याहून चालत निघायचे आणि चालतच राहायचे. वाटेत काय म्हणे तर काजवे बघायचे. बहुतेक सर्वांना #काजवा हा कीटक माहीत आहेच, त्याला काय बघायचा असा साहजिक प्रश्न मनात आलाच, पण नंतर थोडं अधिक वाचन केल्यावर असं लक्षात आलं की या दिवसांत भरपूर प्रमाणात काजवे पाहायला मिळतात. 



थोडसं काजव्याविषयी... उष्ण कटिबंधीय आणि पाऊस वनांमध्ये (#Tropical_Rain_Forest) आढळणारा जेमतेम 1/2 सेंटीमीटर लांबीचा कीटक म्हणजे काजवा होय. काजवा आठवला की दुसरं तिसरं काही आठवत नाही, फक्त आठवतो तो मिणमिनता प्रकाश आणि तोही त्याच्या पृष्ठभागावर! विचार करता, इथं लोकांनी वर्षानुवर्षे राज्यकारभार केला तरी गावेच्या गावे अजून अंधारातच, आणि हा काजवा तोही एवढासा, लाईट आणतो तरी कुठून? त्याच असं, काजवा ज्या वेळी प्रौढावस्थेत येतो आणि तो मिलनासाठी सज्ज होतो त्यावेळी त्याच्या छोट्याशा शरीरात काही रासायनिक घडामोडी घडतात आणि एक मंद शीतल प्रकाश तयार होतो आणि तो आपणांस सहजगत्या विजेच्या बल्ब सारखा दिसतो. बरं, ह्या प्रकाशाचे तो करतो काय, तर मिलनाच्या हंगामात तो आपल्या मादीला आपल्याकडे आकर्षित करतो, आणि त्यांचा प्रजनन काळ चालू होतो. काजव्याचा जीवन कालावधी साधारण 8 ते 10 आठवड्यांचा असतो, त्यातील 4 आठवडे अंडकोष निर्मिती ते काजव्याचा जन्म असा असतो. हे 4 आठवडे मादी झाडाच्या सालीखाली किंवा आंबट ओल्या मातीच्या पहिल्या थराखाली राहते. काजव्याचा विणीचा हंगाम मराठी आषाढ महिन्यात असतो, या दिवसांत काही लक्ष पटीत काजवे पाहावयास मिळतात. इथं मला मराठीतील एक गाणं आठवत,

  लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया,

  झळाळती कोटी ज्योती या...







हाच काजवोत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आमचा 11 जणांचा घोळका शनिवारच्या संध्याकाळी आपापली कामे उरकून तयार झाला आणि आम्ही लोणावळ्याकडे प्रस्थान सोडले. पहिल्या जथ्यात अमर, सुमती म्हणजेच अमरचा संसार, स्वप्नील, प्रियांका आणि मी गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये शिरलो आणि आमचा प्रवास चालू झाला. दुसऱ्या जथ्यात पूजा, सायली, किसन ही नुसती बडबड गँग सोबत रवी, आनंदा आणि नाना असे एकूण 11 जण रात्री 9 च्या सुमारास लोणावळा इथं पोहोचलो. प्राथमिक तयारी आणि ओळख परेड उरकून चालायला सुरुवात केली. 

लोणावळा शहरातून बाहेर पडल्यानंतर लगेचंच अपेक्षेप्रमाणे काजवे दिसू लागले पण ते थोडेच होते. लोणावळ्याहून किल्ले राजमाचीच्या पायथ्याचे गाव म्हणजे उधेवाडी असे एकूण 18 किमी. अंतर पायी चालायचे असते. जसजसे पुढे जाईल तसतसा काळोख अगदी गडद होत चालला होता आणि आभाळ ढगांनी भरून गेलं होतं, मेघवर्षा होईल अशी अपेक्षा होती पण पावसाने भ्रमनिरास केला. खडबडीत रस्त्यांवरून चालताना अर्थातच "बिकट वाट वहिवाट" या उक्तीचा अर्थ लक्षात येत होता आणि सह्याद्रीतील प्रत्येक वाट हाच अनुभव करून देत असते, नवीन त्यात काहीच नाही आणि आम्ही मुळातच भटके! मायबाप सरकारने आम्हास भटक्या व विमुक्त जातींमध्ये समाविष्ट करून घ्यायला काहीच हरकत नाही असे! मधेच एखादी घटका आभाळ हटत होते आणि लक्ख चंद्रप्रकाशात जंगल अधिकच दाट होताना दिसत होतं. साधारण 6 तासांची तंगडतोड करून (रस्ता खडबडीत जरी असला तरी जास्त उंच किंवा खोल चढउतार अजिबात नाहीत) आम्ही पायथ्याच्या गावी पोहोचलो. संपूर्ण परिसरात जंगली श्वापदांचा वावर आहेच त्याबरोबर आम्हास एका पुलाजवळ भेटलेला घोणस जातीचा साप भरपूर प्रमाणात आढळतो. खूप सावधपणे चालावं लागतं या वाटेवरून! पुढे गेल्यावर जांभळी फाटा येतो, तिथं आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली, मुक्कामाच्या जागी पोहोचेस्तोवर कमरेपासून खालचा भाग बोट लावेल तिथं गुदगुल्या असा दुखत होता. उधेवाडी गावाच्या वेशीवर एका झोपडीवजा हॉटेलमध्ये बाकीच्या लोकांना आजूबाजूला सरकवत जागा करून पथारी पसरली, एवढंच आठवतंय. झोप कधी  लागली कळलंच नाही हो. सकाळी 6 वाजता उठल्यावर आम्हाला कळलं की आमची बडबड गँग झोपलेली नाहीच म्हणून!! 






सकाळी उठून थोडंस फ्रेश झाल्यावर पुढचा गडकोट भ्रमंतीचा झक्कास प्लॅन तयार होतात, समोर खुणावत होती ती म्हणजे किल्ले राजमाची! इडली सांबर, चहा आणि बिस्किटांवर आडवा हात मारला आणि तडक किल्ल्याची वाट धरली. एक विशेष गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते आहे की, किल्ले राजमाची हा काही किल्ला नसून किल्ले श्रीवर्धन आणि किल्ले मनरंजन ह्या दोन दुर्गांच्या बरोबर मध्ये राजाश्रय लाभलेली माची आहे. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठीच्या वाटा याच माचीवरून जातात. दोन्ही किल्ले सध्या महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात आणि दोन्ही किल्ल्यांच्या डागडुजीचे काम जोरात सुरू आहे. माचीवर पोहोचताच आपल्याला उजवीकडची वाट किल्ले श्रीवर्धनकडे तर डावीकडची वाट किल्ले मनरंजनकडे घेऊन जाते. माचीवर स्थित सातवाहन काळातील मंदिरे अजूनही सुस्थितीत आहेत. या किल्ल्याचे बांधकाम सातवाहन राजाने केल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. दोन्ही किल्ले काळ्याकभिन्न खडकावर बांधलेले आहेत. वेळेअभावी आम्ही किल्ले मनरंजनवर न जाताच परतलो. किल्ले श्रीवर्धन गडावर जाणारी पायवाट अत्यंत सोपी आहे, तसेच मध्येच काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील आहेत. उणे 20 मिनिटांच्या चालीत आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो, इथला बुरुज आणि बांधकाम बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले आढळले. किल्ल्यावर पाहण्यासारखे विशेष असे काहीही नाही, एके ठिकाणी कातळात खोदलेली कोरीव गुहा सापडली, बहुतेक मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी ती खोदलेली असावी. बालेकिल्ला बुरुज भक्कम आहे. आणखीन थोडं पश्चिमेस गेल्यावर "कातळधार" बुरुज येतो, दुमजली बांधकाम आणि चोरवाट जी शत्रूला सहज गुंगारा देऊ शकत असे. बुरुजावरून पश्चिमेकडे पाहिल्यास कातळधार धबधबा आणि हिरवागार निसर्ग दृष्टीक्षेपात येतो, धबधब्यास अजून पाणी आलेले नव्हते, पण वरुणराजा जर चांगला बरसला तर नक्की धोधो वाहणारा धबधबा पहावयास मिळतो. पश्चिमेकडचा सोसाट्याचा वारा अंगावर घेतल्यावर तन मन प्रफुल्लित तर होणारच आणि झालेही! किल्ला पाहून झाल्यावर परतीची वाट धरली आणि खाली गावात आलो. किल्ले मनरंजन गडावर स्थानिक लोकांनी संरक्षित करून ठेवलेली 4 पाण्याची टाकी आहेत. भर उन्हाळ्यात देखील ही टाकी जिवंत पाण्याने भरलेली असतात. इथूनच पायथ्याशी असलेल्या उधेवाडी गावास पाणीपुरवठा केला जातो. 










नानाने अगोदरच जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली होती. चिकन रस्सा, तांदळाची भाकरी तीही चुलीवर भाजलेली, अहाहा, दणकून वढं काढली, अक्षरशः हिंदीमधे एक म्हण आहे "जेल से छुटे और खाने पे टूट पडे" तीस सार्थ केले. सगळी मंडळी जमा झाली आणि परतीच्या मार्गावर मार्गक्रमण चालू झालं, आमच्यापैकी काही जणांनी गाडीने परत जाण्याचे ठरविले, पण तो आनंद फारकाळ टिकला नाही, चिखलाने माखलेल्या रस्त्यावर गाडीची चाके जागीच फिरू लागली, मग काय तर आपल्या पायाच्या गाडीने परत चाल सुरू केली. दोन तासांच्या पायपीटीनंतर जांभळी फाट्यावर आलो, इथून मात्र परतीच्या प्रवासास गाडी उपलब्ध होती. एक तासाच्या प्रवासानंतर लोणावळा शहर गाठले, चहा सोबत वडापाव हाणला. गप्पाटप्पा झाल्यानंतर सर्वांनी पुण्याकडे प्रस्थान केले. आम्ही 5 पुणेकर प्रगती सुपरफास्टने तर बाकी सगळे लोकलने प्रवास करून आपापल्या घरी सुरक्षित परतले. ट्रेकचे नियोजन करणारा आमचा रांगडा गडी सर्वेश उर्फ नाना, मी त्याला प्रेमाने नान्या म्हणतो तो कोटी कोटी धन्यवादास प्राप्त आहे. 

किल्ले राजमाची हा ट्रेक नसून सपाट जंगल प्रदेशातील पायवाटेवरची तंगडतोड आहे. एका बाजूने अंतर एकूण 18 किमी आहे. किल्ले राजमाचीकडे दोन मार्गाने जाता येते त्यातील एक लोणावळ्याहून तर दुसरा कोकणातील कर्जतहून आहे. कर्जतहून गेल्यास अंतर साधारण 8 किमी इतकेच आहे. जाताना माहितगार व्यक्ती बरोबर असावी, स्पेशली रात्री जाणार असाल तर, कारण पायवाटेने चालताना बहुतांश ठिकाणी डावीकडे खोल दरी तर उजवीकडे डोंगररांग आहे, सोबतीला वन्यजीव आणि भले विषारी साप पण आहेतच. रात्रीच्या प्रवासादरम्यान बॅटरीशिवाय कोणीही चालण्याचे अघोरी धाडस करू नये, कारण जीवन आणि मृत्यू दरम्यानची वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. 

आज इतकंच, आपणांस सह्यादीच्या नयनरम्य निसर्गाचा, थंडगार वाऱ्याच्या झुळूकेचा, अंगावर अलगद बरसणाऱ्या पावसाच्या शिडकाव्याचा आणि लख लख चंदेरी काजवोतस्वाचा आनंद घ्यावयाचा असेल तर किल्ले राजमाची तुमची वाट पाहत अभेद्य उभी आहे! जरूर जा आणि मनसोक्त आनंद लुटा.

धन्यवाद, सहभागी सदस्यांचे आभार. भेटू लवकरच अशाच दर्जेदार भटकंती सहित, तोवर आपणा सर्वांना ...

|| जय जिजाऊ, जय शिवराय | जय हिंद, जय महाराष्ट्र || 




आपला,

श्री. अभिजीत शिंदे, पुणे, महाराष्ट्र.