Thursday, June 14, 2018

चिखलाने माखलेल्या वाटेवरची तंगडतोड बरोबर #काजवोत्सव (#fireflies_festival) आणि #किल्ले_राजमाची.


चिखलाने माखलेल्या वाटेवरची तंगडतोड बरोबर #काजवोत्सव (#fireflies_festival) आणि #किल्ले_राजमाची. 

साधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते आणि सलग 4 महिने पाऊस मागच्या उन्हाळ्याने व्याकुळ आणि तप्त झालेल्या धरतीवर पाण्याचा शिडकावा घालतो आणि धरतीमाता तृप्त होते. शेतकरी राजा पेरणीच्या कामाला लागतो, अर्थातच त्याला पुढील वर्षाच्या अन्नधान्याची व्यवस्था करणे भाग असतेच. याच काळात आमच्यासारख्या असंख्य निसर्गप्रेमी मंडळींची पावले आपसुकपणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकण्यास आतुर झालेली असतात. मे महिन्याच्या उत्तरार्धात काही मंडळी भटकंतीचा प्लॅन (ब्ल्यू प्रिंट) करायला घेतात तर काही जण उठले आणि निघाले भटकायला, असे! या वर्षीच्या पावसाळ्यातील पहिलावहिला धम्माल आणणारा आणि जबरदस्त तंगडतोड असलेला ट्रेक आमच्या नानाने निवडला तो म्हणजे #किल्ले_राजमाची. बरं गाडीने थेट पायथ्यापर्यंत जायचे का तर अजिबात नाही, रात्री लोणावळ्याहून चालत निघायचे आणि चालतच राहायचे. वाटेत काय म्हणे तर काजवे बघायचे. बहुतेक सर्वांना #काजवा हा कीटक माहीत आहेच, त्याला काय बघायचा असा साहजिक प्रश्न मनात आलाच, पण नंतर थोडं अधिक वाचन केल्यावर असं लक्षात आलं की या दिवसांत भरपूर प्रमाणात काजवे पाहायला मिळतात. 



थोडसं काजव्याविषयी... उष्ण कटिबंधीय आणि पाऊस वनांमध्ये (#Tropical_Rain_Forest) आढळणारा जेमतेम 1/2 सेंटीमीटर लांबीचा कीटक म्हणजे काजवा होय. काजवा आठवला की दुसरं तिसरं काही आठवत नाही, फक्त आठवतो तो मिणमिनता प्रकाश आणि तोही त्याच्या पृष्ठभागावर! विचार करता, इथं लोकांनी वर्षानुवर्षे राज्यकारभार केला तरी गावेच्या गावे अजून अंधारातच, आणि हा काजवा तोही एवढासा, लाईट आणतो तरी कुठून? त्याच असं, काजवा ज्या वेळी प्रौढावस्थेत येतो आणि तो मिलनासाठी सज्ज होतो त्यावेळी त्याच्या छोट्याशा शरीरात काही रासायनिक घडामोडी घडतात आणि एक मंद शीतल प्रकाश तयार होतो आणि तो आपणांस सहजगत्या विजेच्या बल्ब सारखा दिसतो. बरं, ह्या प्रकाशाचे तो करतो काय, तर मिलनाच्या हंगामात तो आपल्या मादीला आपल्याकडे आकर्षित करतो, आणि त्यांचा प्रजनन काळ चालू होतो. काजव्याचा जीवन कालावधी साधारण 8 ते 10 आठवड्यांचा असतो, त्यातील 4 आठवडे अंडकोष निर्मिती ते काजव्याचा जन्म असा असतो. हे 4 आठवडे मादी झाडाच्या सालीखाली किंवा आंबट ओल्या मातीच्या पहिल्या थराखाली राहते. काजव्याचा विणीचा हंगाम मराठी आषाढ महिन्यात असतो, या दिवसांत काही लक्ष पटीत काजवे पाहावयास मिळतात. इथं मला मराठीतील एक गाणं आठवत,

  लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया,

  झळाळती कोटी ज्योती या...







हाच काजवोत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आमचा 11 जणांचा घोळका शनिवारच्या संध्याकाळी आपापली कामे उरकून तयार झाला आणि आम्ही लोणावळ्याकडे प्रस्थान सोडले. पहिल्या जथ्यात अमर, सुमती म्हणजेच अमरचा संसार, स्वप्नील, प्रियांका आणि मी गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये शिरलो आणि आमचा प्रवास चालू झाला. दुसऱ्या जथ्यात पूजा, सायली, किसन ही नुसती बडबड गँग सोबत रवी, आनंदा आणि नाना असे एकूण 11 जण रात्री 9 च्या सुमारास लोणावळा इथं पोहोचलो. प्राथमिक तयारी आणि ओळख परेड उरकून चालायला सुरुवात केली. 

लोणावळा शहरातून बाहेर पडल्यानंतर लगेचंच अपेक्षेप्रमाणे काजवे दिसू लागले पण ते थोडेच होते. लोणावळ्याहून किल्ले राजमाचीच्या पायथ्याचे गाव म्हणजे उधेवाडी असे एकूण 18 किमी. अंतर पायी चालायचे असते. जसजसे पुढे जाईल तसतसा काळोख अगदी गडद होत चालला होता आणि आभाळ ढगांनी भरून गेलं होतं, मेघवर्षा होईल अशी अपेक्षा होती पण पावसाने भ्रमनिरास केला. खडबडीत रस्त्यांवरून चालताना अर्थातच "बिकट वाट वहिवाट" या उक्तीचा अर्थ लक्षात येत होता आणि सह्याद्रीतील प्रत्येक वाट हाच अनुभव करून देत असते, नवीन त्यात काहीच नाही आणि आम्ही मुळातच भटके! मायबाप सरकारने आम्हास भटक्या व विमुक्त जातींमध्ये समाविष्ट करून घ्यायला काहीच हरकत नाही असे! मधेच एखादी घटका आभाळ हटत होते आणि लक्ख चंद्रप्रकाशात जंगल अधिकच दाट होताना दिसत होतं. साधारण 6 तासांची तंगडतोड करून (रस्ता खडबडीत जरी असला तरी जास्त उंच किंवा खोल चढउतार अजिबात नाहीत) आम्ही पायथ्याच्या गावी पोहोचलो. संपूर्ण परिसरात जंगली श्वापदांचा वावर आहेच त्याबरोबर आम्हास एका पुलाजवळ भेटलेला घोणस जातीचा साप भरपूर प्रमाणात आढळतो. खूप सावधपणे चालावं लागतं या वाटेवरून! पुढे गेल्यावर जांभळी फाटा येतो, तिथं आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली, मुक्कामाच्या जागी पोहोचेस्तोवर कमरेपासून खालचा भाग बोट लावेल तिथं गुदगुल्या असा दुखत होता. उधेवाडी गावाच्या वेशीवर एका झोपडीवजा हॉटेलमध्ये बाकीच्या लोकांना आजूबाजूला सरकवत जागा करून पथारी पसरली, एवढंच आठवतंय. झोप कधी  लागली कळलंच नाही हो. सकाळी 6 वाजता उठल्यावर आम्हाला कळलं की आमची बडबड गँग झोपलेली नाहीच म्हणून!! 






सकाळी उठून थोडंस फ्रेश झाल्यावर पुढचा गडकोट भ्रमंतीचा झक्कास प्लॅन तयार होतात, समोर खुणावत होती ती म्हणजे किल्ले राजमाची! इडली सांबर, चहा आणि बिस्किटांवर आडवा हात मारला आणि तडक किल्ल्याची वाट धरली. एक विशेष गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते आहे की, किल्ले राजमाची हा काही किल्ला नसून किल्ले श्रीवर्धन आणि किल्ले मनरंजन ह्या दोन दुर्गांच्या बरोबर मध्ये राजाश्रय लाभलेली माची आहे. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठीच्या वाटा याच माचीवरून जातात. दोन्ही किल्ले सध्या महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात आणि दोन्ही किल्ल्यांच्या डागडुजीचे काम जोरात सुरू आहे. माचीवर पोहोचताच आपल्याला उजवीकडची वाट किल्ले श्रीवर्धनकडे तर डावीकडची वाट किल्ले मनरंजनकडे घेऊन जाते. माचीवर स्थित सातवाहन काळातील मंदिरे अजूनही सुस्थितीत आहेत. या किल्ल्याचे बांधकाम सातवाहन राजाने केल्याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. दोन्ही किल्ले काळ्याकभिन्न खडकावर बांधलेले आहेत. वेळेअभावी आम्ही किल्ले मनरंजनवर न जाताच परतलो. किल्ले श्रीवर्धन गडावर जाणारी पायवाट अत्यंत सोपी आहे, तसेच मध्येच काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील आहेत. उणे 20 मिनिटांच्या चालीत आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो, इथला बुरुज आणि बांधकाम बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले आढळले. किल्ल्यावर पाहण्यासारखे विशेष असे काहीही नाही, एके ठिकाणी कातळात खोदलेली कोरीव गुहा सापडली, बहुतेक मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी ती खोदलेली असावी. बालेकिल्ला बुरुज भक्कम आहे. आणखीन थोडं पश्चिमेस गेल्यावर "कातळधार" बुरुज येतो, दुमजली बांधकाम आणि चोरवाट जी शत्रूला सहज गुंगारा देऊ शकत असे. बुरुजावरून पश्चिमेकडे पाहिल्यास कातळधार धबधबा आणि हिरवागार निसर्ग दृष्टीक्षेपात येतो, धबधब्यास अजून पाणी आलेले नव्हते, पण वरुणराजा जर चांगला बरसला तर नक्की धोधो वाहणारा धबधबा पहावयास मिळतो. पश्चिमेकडचा सोसाट्याचा वारा अंगावर घेतल्यावर तन मन प्रफुल्लित तर होणारच आणि झालेही! किल्ला पाहून झाल्यावर परतीची वाट धरली आणि खाली गावात आलो. किल्ले मनरंजन गडावर स्थानिक लोकांनी संरक्षित करून ठेवलेली 4 पाण्याची टाकी आहेत. भर उन्हाळ्यात देखील ही टाकी जिवंत पाण्याने भरलेली असतात. इथूनच पायथ्याशी असलेल्या उधेवाडी गावास पाणीपुरवठा केला जातो. 










नानाने अगोदरच जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली होती. चिकन रस्सा, तांदळाची भाकरी तीही चुलीवर भाजलेली, अहाहा, दणकून वढं काढली, अक्षरशः हिंदीमधे एक म्हण आहे "जेल से छुटे और खाने पे टूट पडे" तीस सार्थ केले. सगळी मंडळी जमा झाली आणि परतीच्या मार्गावर मार्गक्रमण चालू झालं, आमच्यापैकी काही जणांनी गाडीने परत जाण्याचे ठरविले, पण तो आनंद फारकाळ टिकला नाही, चिखलाने माखलेल्या रस्त्यावर गाडीची चाके जागीच फिरू लागली, मग काय तर आपल्या पायाच्या गाडीने परत चाल सुरू केली. दोन तासांच्या पायपीटीनंतर जांभळी फाट्यावर आलो, इथून मात्र परतीच्या प्रवासास गाडी उपलब्ध होती. एक तासाच्या प्रवासानंतर लोणावळा शहर गाठले, चहा सोबत वडापाव हाणला. गप्पाटप्पा झाल्यानंतर सर्वांनी पुण्याकडे प्रस्थान केले. आम्ही 5 पुणेकर प्रगती सुपरफास्टने तर बाकी सगळे लोकलने प्रवास करून आपापल्या घरी सुरक्षित परतले. ट्रेकचे नियोजन करणारा आमचा रांगडा गडी सर्वेश उर्फ नाना, मी त्याला प्रेमाने नान्या म्हणतो तो कोटी कोटी धन्यवादास प्राप्त आहे. 

किल्ले राजमाची हा ट्रेक नसून सपाट जंगल प्रदेशातील पायवाटेवरची तंगडतोड आहे. एका बाजूने अंतर एकूण 18 किमी आहे. किल्ले राजमाचीकडे दोन मार्गाने जाता येते त्यातील एक लोणावळ्याहून तर दुसरा कोकणातील कर्जतहून आहे. कर्जतहून गेल्यास अंतर साधारण 8 किमी इतकेच आहे. जाताना माहितगार व्यक्ती बरोबर असावी, स्पेशली रात्री जाणार असाल तर, कारण पायवाटेने चालताना बहुतांश ठिकाणी डावीकडे खोल दरी तर उजवीकडे डोंगररांग आहे, सोबतीला वन्यजीव आणि भले विषारी साप पण आहेतच. रात्रीच्या प्रवासादरम्यान बॅटरीशिवाय कोणीही चालण्याचे अघोरी धाडस करू नये, कारण जीवन आणि मृत्यू दरम्यानची वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. 

आज इतकंच, आपणांस सह्यादीच्या नयनरम्य निसर्गाचा, थंडगार वाऱ्याच्या झुळूकेचा, अंगावर अलगद बरसणाऱ्या पावसाच्या शिडकाव्याचा आणि लख लख चंदेरी काजवोतस्वाचा आनंद घ्यावयाचा असेल तर किल्ले राजमाची तुमची वाट पाहत अभेद्य उभी आहे! जरूर जा आणि मनसोक्त आनंद लुटा.

धन्यवाद, सहभागी सदस्यांचे आभार. भेटू लवकरच अशाच दर्जेदार भटकंती सहित, तोवर आपणा सर्वांना ...

|| जय जिजाऊ, जय शिवराय | जय हिंद, जय महाराष्ट्र || 




आपला,

श्री. अभिजीत शिंदे, पुणे, महाराष्ट्र.

Friday, June 8, 2018

#किल्ले_वासोटा #व्याघ्रगड

सह्याद्रीच्या कुशीतील आणि कोयना धरण परिक्षेत्रातील अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या किल्यांपैकी एक हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण ४००० फूट उंचीचा आणि वनदुर्ग प्रकारातील आहे. देशभरातील सर्व गिर्यारोहकांचे आकर्षण आणि सर्वात आवडता किल्ला असं वर्णन करता येईल. #छत्रपती_शिवाजी महाराजांनी हा किल्ला 16 व्या शतकात #हिंदवी_स्वराज्यात सामावून घेतला आणि ह्या किल्ल्याचे नामकरण #व्याघ्रगड असे केले. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीव समृद्ध बनला आहे. किल्ल्याच्या परिसरात वाघ, बिबटे, रानकुत्रे, अस्वले, गवे आणि अनेकविध जातींचे साप आणि इतर अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे.


संक्षिप्त इतिहास: जावळीच्या खोऱ्यातील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल खानाच्या वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी #ताई_तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला आणि अजिंक्य ठेवला. तिथून पुढच्या काळात हा किल्ला #ताई_तेलीणीचा_किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. याच दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो . समोरच मारुतीचं बिन छपराचं सुंदर मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचील पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. काळकाईच्या ठाण्यावरून सरळ पुढे पाहिल्यास दोन सुळके दिसतात, त्यापैकी एका सुळक्यावर भगवा ध्वज फडकताना दिसतो, हा सुळका म्हणजेच #नागेश्वर होय. ह्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर सर्व ऋतूंमध्ये निसर्ग पाण्याचा अभिषेक घालत असतो.




मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही पाण्याची टाकी काही अंशी मातीने भरलेली आहेत व माती उपसून टाके स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय. आता या गडावर जाणारी वाटा अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदांचा मुक्त वावर असल्याने सहसा येथे कोणी जात नाही. वनखात्याने जुन्या वासोट्यावर जाण्यास बंदी घातलेली आहे. पूर्वीच्या काळी बाबूकड्यावरून गुन्हेगारांना #कडेलोटाची म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. नव्या वासोट्यावरून जेव्हा आपण दरीत पाहतो तेव्हा एका स्वर्गस्थ अनुभवाचे आपण साक्षीदार होतात.

मागच्या आठवड्यात येत्या रविवारी कुठंतरी ट्रेकला जावं असं मनात आलं आणि एवढ्यात फोनचा आवाज झाला आणि पाहतो तर काय, आमचे सह्यमित्र डॉ. धुमाळ साहेबांचा कॉल होता. साहेबांनी फोनवर लगेचच फर्मान सोडले की आपण शनिवारी दुपारी वासोट्यासाठी निघतोय, क्षणाचाही विलंब न करता मी येणार असं सांगून टाकलं. बरोबर आमचा अजून एक रांगडा सह्यमित्र सर्वेश उर्फ नाना येणार असल्याचे कळले मग काय "दुग्धशर्करा" योगच हो. शनिवारी दुपारीच ऑफिसचे सगळे काम उरकले आणि कल्टी मारली. नानाच्या गाडीतून तडक शिरवळ गाठले आणि आमच्या सह्यमित्रांना मिठीच मारली. डॉक्टर साहेबांचे मित्र डॉ. प्रविण, डॉ. स्वप्नील, डॉ. उगले बंधू, दोन भाचे, सचिन आणि भोळे काका असा 11 जणांचा घोळका वासोटा मोहिमेसाठी सज्ज झाला. सामानाची जुळवाजुळव केली आणि सर्व सामान गाड्यांमध्ये भरले. शेवटी डॉक्टर साहेबांच्या गाडीचे स्टेरिंग व्हील कोणाकडे असेल यावर घमासान चर्चा झाली आणि अर्थातच ही जबाबदारी मी सर्वेशकडून हिसकावून घेतली आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
सायंकाळच्या सुमारास आम्ही बामणोली गाव गाठले, गावातील जलतारा नामक हॉटेल बुक केलेले होते. लगोलग जागा हेरून मुक्कामाचे तंबू ठोकून घेतले आणि गप्पाटप्पा चालू झाल्या, टेबल सजले, त्यावर आंबळी, मरळ या डिशेस येऊन थांबत होत्या आणि संपत पण होत्या. गाण्यांचा, डब्बे वादनाचा आणि तुफान नाचण्याचा कार्यक्रम रात्री 12 वाजेस्तोवर चालू राहिला. मी मात्र बरेच दिवस राहून गेलेला किल्ला पाहायला मिळणार या स्वप्नात रमलो आणि झोपी गेलो.
डॉक्टर साहेबांनी सकाळी 6 वाजता आरोळी ठोकली, आणि ताडकन उठलो. तंबू आवरला आणि फ्रेश झालो. चहा घेतला, इतर सदस्य एकेक करून उठले आणि तयार झाले. नानाने तोवर बोट बोलावली होतीच. बोट आली आणि श्री. कदम यांचेशी भेट झाली, तेच आमचे सारथी आणि आजचे मार्गदर्शक म्हणून बरोबर राहणार होते. सगळे बोटीवर स्वार झालेवर कदमांनी बोटीच्या इंजिनाला हँडल मारले आणि बोट वासोट्याकडे रवाना झाली. "शिवसागर" जलाशयाच्या निळ्याशार पाण्यातून बोट लाटा उमटवत मार्गक्रमण करत होती आणि उत्कंठा शिगेला पोहोचत होती. वनविभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आणि बोटीचा प्रवास पुढे चालू झाला. कदमांची बोट फारच स्लो होती, इतर बोटी सपासप पुढे निघून जात होत्या, विचारणा केली असता इंजिनाचा डिझेल पाईप लीक असल्याचे कळले. मजल दरमजल करत सकाळी 1130 ला बोट वासोट्याच्या धक्क्याला लागली आणि आवराआवर करून बोटीतून एकदाच बाहेर पडलो. ओळख परेड झाली आणि वेळ न दवडता ट्रेकला सुरुवात केली.
वासोटा किल्ला वनविभाच्या अखत्यारीत येतो आणि संरक्षित असल्यामुळे प्लास्टिक किंवा इतर निसर्गास हानी पोहोचवणाऱ्या वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. पाण्याच्या बाटल्यांची गणती करून अनामत रक्कम घेतली जाते. परत येताना वर नेलेल्या बाटल्या दाखवल्या की अनामत रक्कम अर्थातच परत मिळते. आम्ही प्रत्येकी 3 लिटर पाणी आणि खायला चटरफटर बरोबर घेतले आणि गर्द जंगलात शिरलो. जंगल घनदाट जरी असले तरी वाट मळलेली आहे, दिवस मावळण्यापूर्वी गड उतरला तर शक्यतो वाट चुकण्याचा काही संबंध येत नाही. विविध प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांविषयीचे माहिती फलक वाचत गप्पागोष्टी करत चाल सुरू ठेवली. चढाई श्रेणी मध्यम आहे आणि गर्द झाडी असल्यामुळे उन्हाचा फार त्रास होत नाही. साधारण दीड तास चालल्यावर पडझड झालेला बालेकिल्ला दृष्टीपथात येतो आणि काही वेळासाठी जंगल नाहीस होतं. शेवटच्या टप्प्यात कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो आणि आपल्या ट्रेकच्या चढाईचा टप्पा पूर्ण होतो. किल्ला पाहून झाला आणि उतरायला सुरुवात केली, साधारण एक तास तीव्र उतारावर आदळआपट होत होत खाली आलो. उन्हाळ्याच्या दिवसांत वाटेतील माती भुसभुशीत आणि घसरडी होते, अर्थातच चांगल्या दर्जाचे बूट घातले असले तरीही पृष्ठभागाला सह्याद्रीचा प्रसाद मिळतोच. शेवटचा उतार झाल्यावर विसावा घेण्यास थांबलो, सर्व जण एकत्र आले आणि बोटीकडे कूच केले. अर्थातच सर्वजण थकले होते, मीही थकलो होतो पण आमचा "चॉकलेट बॉय" अजिबात थकला नव्हता आणि मला बोटीत एकच काम बाकी होतं ते म्हणजे नानाचं फोटो सेशन, विविध पोजेस आणि अँगल मधले फोटो घेणं चालूच राहिलं. एकूण 300 च्या आसपास फोटो काढले त्यातले किमान 150 फोटो एकाच व्यक्तीचे असतील. उशिरा सायंकाळी बोट परत धक्क्याला लागली आणि ट्रेक संपला. बॅगा परत गाडीत भरल्या आणि ट्रेकच्या सुंदर आठवणी मनात साठवून परतीचा प्रवास धरला. भेटू परत अशाच दर्जेदार किल्ले आणि घाटवाटा भटकंती सह... जय जिजाऊ, जय शिवराय!!
सूचना : वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही. तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे, तशीच परिस्थिती खाण्याची पण आहे त्यामुळे जवळ किमान दोघांना पुरेल एवढे खाद्यपदार्थ ठेवावेत.





Old Vasota .. entry restricted.

Kalkai che Thane