Thursday, April 4, 2019

“ कासव महोत्सव २०१९ – वेळास, रत्नागिरी ”

कासव महोत्सव २०१९वेळास, रत्नागिरी


या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे !!
या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती !
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी !
५० वर्षांचे आयुष्य माझे पुनश्च: स्मरावे!
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे !!

ऑलिव्ह रिडले टर्टल” या आजघडीला इतर प्रजातींच्या तुलनेत भरपूर प्रमाणात आढळणारी परंतु धोक्यात असणाऱ्या या कासवांच्या प्रजातीच्या जीवनचक्रास तंतोतंत लागू पडतील अशा या ओळी. सुदैव इतकच ती अजून लोप पावलेली नाही, त्याला कारण ठरलेत वेळास ता. मंडणगड, जि. रत्नागिरी गावचे सजग नागरिक! या गावकऱ्यांच्या कासव संवर्धन कार्यक्रमास आणि प्रयत्नास वनखात्याने देखील पाठबळ आणि संरक्षण दिले आहे. इसवी सन २००२ पासून या गावच्या नागरिकांनी “कासव संवर्धन” कार्यक्रम हाती घेतला आणि आज त्या कार्यक्रमास एक बहारदार अशा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावाकडे कधीही कमी संख्येने येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता भरपूर वाढली आहे. स्थानिक लोकांच्या हातांस काम मिळाले आहे, इथल्या खाद्य संस्कृतीची ओळख इतर ठिकाणच्या लोकांस होवू लागली आहे आणि इथल्या लोकांचे एकूणच जीवनमान उंचावले आहे. साल २०१९ चा हा कासव महोत्सव पाहण्याचे आमच्या चमूने ठरविले आणि #IndiaTreks या संस्थेने नियोजनाची जबाबदारी घेतली, अर्थातच मीही त्या टीममध्ये होतोच, तारीख ठरली २३ आणि २४ मार्च २०१९.

२३ मार्च हा छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे जयंतीचा दिवस, जगातला एकमेव महान आणि लोकाभिमुख राज्यव्यवस्था म्हणजेच “स्वराज्य” निर्माण करणारा हा राज्यकर्ता तारीख आणि तिथीच्या घोळात अडकलेला किंवा अडकवला गेलेला, असो! शुक्रवारच्या संध्याकाळी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बीभत्सपणे आरडाओरडा करत टुकार तरुणांची निघालेली मोटारसायकल, आणि इतर वाहनांची फेरी दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वर्गातून पाहिली असेल तर महाराज नक्कीच म्हणाले असतील, या नालायकांसाठी का आम्ही तलवारी उपसल्या अन स्वराज्यनिर्मिती केली काय? आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आणि आमच्या प्रवासाची आखणी केली, कारण पुढे जावून वेळासमध्ये अतिशय पारंपारिक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवजयंती उत्सव आम्हास पहावयास मिळणार होता. रात्री ११ च्या सुमारास आमच्या गाडीने स्वारगेट सोडले आणि ताम्हिणी घाट मार्गाने माणगाव इथं जाण्यासाठी प्रस्थान सोडले. वाटेत इतर सहकारी भिडूंना गोळा करत मध्यरात्री ३ च्या सुमारास गाडी माणगाव इथं पोहोचली. इथं आम्हास आमचा सह्यभिडू विशाल येवून मिळणार होता. विशाल आला आणि सीटांची थोडी अदलाबदल करून गाडी वेळासकडे मार्गस्थ झाली. तीन तासांच्या प्रवासानंतर भल्या पहाटे आम्ही वेळास इथं दाखल झालो. गाडी पोहोचण्यास तसा थोडा उशीर मात्र नक्कीच झाला होता, कारण प्रगतीशील महाराष्ट्रातल्या रस्त्यावर पडलेले सर्वदूर असे खड्डे, कंबर मोडायची फक्त राहिली होती.


थोडेसे “ऑलिव्ह रिडले” कासव या समुद्री जीवाविषयी... 

जीवशास्त्रीय दृष्ट्या कासवांच्या १० प्रजाती जगभर अस्तित्वात आहेत, पैकी ७ प्रजातींचे माहेरघर आपला भारत देश आणि इथला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. बहुतांश कासवाच्या प्रजाती या उष्णकटिबंधीय समुद्रात राहतात, उदा. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर. या ७ प्रजातींपैकी “ऑलिव्ह रिडले” या जातीच्या कासवांचे माहेर म्हणजे कोकणातील वेळास आणि इथला १० किमी लांबीचा समुद्रकिनारा, किती अद्भुत ना. जन्मताना २ ते २.५ सेमी लांबीरुंदीचा हा समुद्री जीव पूर्ण वाढ झाल्यावर २ ते २.५ फूट लांबीचा आणि ३५ ते ४० किलो वजनाचा होतो. या प्रजातीच्या कासवांचे एकंदर आयुष्यमान हे ५० वर्षांचे असते, काही प्रजातींचे आयुष्यमान तर ३५० वर्षांपर्यंत असल्याचे जीवशास्त्र सांगते. ५० वर्षांपैकी पहिली १५ वर्षे तारुण्य आणि प्रजननक्षम होण्यासाठी लागतात. कासवांसाठी आयुष्याच्या पहिल्या ३ वर्षांचा काळ हा अतिशय खडतर मानावा लागेल कारण पहिल्या ३ वर्षांत जगण्याची हमी नसते. जिथं जन्माची हमी नाही, तिथं जगण्याची हमी कोण देणार किंवा घेणार! या कासवांचे अन्न हे मुख्यत्वे करून मांसाहार असतो, त्यामध्ये सर्व प्रकारचे छोटे समुद्री जीव, जेलीफिश, गोगलगायी, खेकडे आणि शिंपले. कधीकाळी ही कासवे समुद्री शेवाळ आणि समुद्रातील झाडांच्या सालीसुद्धा खातात. आजच्या तारखेला साधारण ८००,००० (आठ लाख) प्रजननक्षम कासवे पृथ्वीतलावर जिवंत आहेत, काही वर्षांपूर्वी हीच संख्या किमान चार पट असावी.






ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम वर्षभर असतो परंतु मादी वर्षातून एकदाच समुद्र किनाऱ्यावर वाळूत घरटी करून त्यात अंडी घालते. एकावेळी एका घरट्यात मादी साधारण १०० च्या आसपास अंडी घालते. कासवांचा जन्मदर जरी अधिकचा असला तरी त्यांचा मृत्युदर खूपच मोठा आहे. सरासरी १०० कासवांमागे ५ ते १० जिवंत राहतात आणि आपले पूर्ण आयुष्य जगतात, सर्वच प्रजातींच्या बाबतीत लागू होणारा आणि आपणास चिंतेत टाकणारा हा दर आहे.

म्हणूनच, वेळास गावच्या नागरिकांचे करावे तितके कौतुक कमीच पडणार आहे. त्यास कारण की, २००२ सालापासून या लोकांनी कासव संवर्धनाचा वसा घेतला आणि तो आजही निरंतर चालू ठेवलाय. पहाटे ३ किंवा ४ वाजता उठून अथांग पसरलेल्या सागर किनाऱ्यावर गस्त घालत फिरणे, अंडी घालण्यासाठी आलेल्या मादीवर लक्ष ठेवून तिस नैसर्गिकरित्या अंडी घालू देणे आणि अंडी घालून झाल्यावर तिस समुद्रात परतेपर्यंत लक्ष ठेवणे. घरट्यातील अंडी सुरक्षितपणे एका जागी जमा करून त्यांस योग्य उब मिळेल इतक्याच खोलीवर गाडून ठेवणे, संपूर्ण ५० दिवस त्यावरही लक्ष ठेवणे आणि सरतेशेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक कासवास त्याच्या हक्काच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करणे हे सोप्प काम नाही बरे. दरवर्षी हजारो कासवे हकनाक बळी पडत होती, त्यांची संख्या आता तुलनेने खूप कमी झालेली आढळते, हेच या संवर्धन कार्यक्रमाचे फलित. वेळास गावच्या कासव संवर्धन कामात लक्ष घालणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे जाहीर आभार आणि शुभेच्छा!!


भल्या पहाटे गाडीने बाणकोट पासून अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावरील रस्त्याने ५० एक घरे असलेल्या “वेळास” मध्ये प्रवेश केला. बस थांब्याच्या एका बाजूस कट्ट्यावर बसलेल्या पुलंच्या “अंतू बर्वा” वजा आजोबांनी काही विचारण्याच्या आत सरळ तिकडे जा, कासवे सोडण्याची वेळ झालेली आहे असे सांगितले. आम्हाला काही विचारायचे आहे, यास केराची टोपली दाखविली. आम्ही कोकणात आल्याचे त्या काकांनी क्षणात दाखवून दिले. आम्हीही पक्के चेले त्यांचेच, दुसरा प्रश्न न करता तडक गाडी अंदाजे एक किमी लांब असलेल्या पुलापाशी नेवून थांबवली. सर्वांना खाली घेत समुद्राकडे कूच केले, काही लोकं जरूर थकले होते. १० मिनिटे चालत पायवाटेने गेल्यावर आपणास समोर अथांग समुद्र आणि त्यावरून वाहणाऱ्या गारगार वाऱ्याचा अनुभव घेता येतो. इथल्या समुद्राची वाळू ही सफेद रंगाची नसून तीस भुरकट काळा रंग लाभलेला आहे. आज समुद्राला ओहोटी आली होती त्यामुळे पाणी दूरवर लोटले गेले होते. किनाऱ्यापासून काही अंतर अलीकडे एक संरक्षित केलेला चौक दिसला, ज्यात ५ घरटी करून ती बांबूच्या टोपलीने तारीखवार झाकून ठेवलेली होती, जेणेकरून रात्री अपरात्री घरट्यातून बाहेर पडलेले कासव भरकटून जावू नये. आजूबाजूला लोकही जमा झालेले होते अन प्रत्येकजण उत्सुक होता तो नवजात कासवे पाहण्यासाठी.




वनकर्मचारी आणि तिघे स्थानिक आले, सोबत काही संस्थांचे स्वयंसेवक सुद्धा होते. चौकाचा दरवाजा उघडून आत गेले तसे लोकांनी आपापले कॅमेरे चालू करून पहिला फोटो आपणच टिपायचा म्हणून तयारी केली होती. कर्मचारी लोकांनी काही सूचना सांगितल्या व त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करा असा विनंतीवजा सज्जड दम भरला. हा दम भरणे खरंच गरजेचे असते, नाहीतर हौशी पर्यटक फोटो काढण्याच्या नादात त्या कासवांचा जीवसुद्धा घेतील इतके उतावीळ झालेले असतात. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती, इतकी की माझा कॅमेरा चौकाची भिंत ओलांडून आतमध्ये झाकोळत होता. पहिली टोपली उघडली गेली, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. दुसरी टोपली उघडली गेली, परत तेच, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. तिसरी टोपली उघडली गेली आणि टाळ्यांचा कडकडाट, किमान १० कासवे आपल्या हक्काच्या घराकडे कूच करण्यासाठी उत्सुक होती. लहान मुलांनी तर अक्षरश: ओरडून त्यांचे स्वागतच केले जणू! मीही मनोमन त्यांस म्हटले, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्हाला तुमच्या घरी जाताना पाहण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. कर्मचारी लोकांनी सर्व कासवे सुरक्षितपणे उचलून एका टोपलीत ठेवून दिली. आता वेळ होती चौथ्या टोपलीची, चौथी टोपली उघडली गेली, परत तेच, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. आता मात्र पाचवी आणि शेवटची टोपली शिल्लक होती. ती उघडता क्षणी परत टाळ्यांचा कडकडाट आणि नवजात कासवांचे पृथ्वीतलावर लोकांनी केलेले स्वागत, खरेच हे क्षण जगून घेण्यासाठीच असतात. या टोपलीखाली किमान १५ कासवे होती, त्यांनादेखील एका टोपलीत भरले आणि समुद्राकडे प्रस्थान ठेवले.

आता वेळ होती, कासवांना नैसर्गिकरित्या वाळूवरून झेपावताना पाहण्याची आणि त्यांस लागलेल्या त्यांच्या घराच्या ओढीची. एकेक करून त्या लोकांनी कासवांना वाळूवर ठेवले, आणि पाहतो काय, प्रत्येक एका कासवाने अगदी समुद्राच्या दिशेने अचूक झेप घेतलेली पहावयास मिळाली. काय ती ओढ अन काय तो उत्साह, सार काही स्तब्ध करणारं, तितकच अद्भुत देखील. इतक्या छोट्याशा जीवाच्या डोळ्यात देखील आपल्या घरी जाण्याची ओढ स्पष्ट दिसत होती, अर्थात त्या संवेदनशिलतेने पाहिले तर. साधारण १५ मिनिटांच्या चालीने सर्व कासवे एकापाठोपाठ एक अथांग समुद्राच्या कवेत जावून विसावली होती. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृष्य मनात साठवून आणि कासव गाणं गुणगुणत आम्ही समुद्रावरून काढता पाय घेतला...




काही वेळातच, घरी पोहोचून शुभश्च-शुचिर्भूतम होवून लगेच पाटील मावशींनी केलेले गोड पोहे आणि उपमा खावून घेतला. लगोलग किल्ले “बाणकोट” पाहण्यासाठी प्रस्थान सोडले. बाणकोट किल्ल्याचे नाव किल्ल्याच्या खालील गावाच्या नावाचा अपभ्रंश असल्याचे आढळते, गावाचे मूळ नाव इतिहासात “बावनकोट” असल्याचे आढळते. या किल्ल्यास परिचित असा कोणत्याही लढाईचा इतिहास नसून या छोटेखानी किल्ल्याच्या वापर मुख्यत्वे करून हरिहरेश्वर ते महाड पर्यंतच्या सावित्री नदीतील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झालेला आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे मातब्बर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून घेवून अजिंक्य ठेवला. तत्पूर्वी या किल्ल्यावर पोर्तुगीज, सिद्दी जौहर आणि आदिलशाही सुलतानांच्या राजवटी असत. त्याचे एक द्योतक असे की, आजही बाणकोट गावातील बहुतांश लोकं हे मुस्लीम धर्मीय आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोर्तुगीज काळाची ओळख सांगणारी तोफ असून ती सुस्थितीत आहे, किल्ल्याच्या बहुतांश भागाची पडझड झालेली असून आजमितीला या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर आपणास दोन्ही बाजूस बुरुज दिसतात, ज्यावर छोटेखानी टेहळणी मनोरे आहेत आणि तिथून समुद्रावरच्या होड्या आणि सावित्री नदीचा संगम स्पष्टपणे दिसतात. किल्ल्याच्या आतील भागात एक छोटी विहीर, कैदी ठेवण्यासाठी कोठडी आणि चोरवाट आहे. हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला सुमारे एक तासाचा अवधी पुरेसा आहे. किल्ला पाहून झाल्यावर परतीच्या प्रवासाची वाट धरली. वेळासला पोहोचून पाटील आजीबाईनी बनवलेल्या कोकणी पद्धतीच्या मासे आणि खेकड्यांचे जीवन सार्थकी लावायचे होते.








परत येवून पाहतो तर काय, खेकड्यांची कढी आणि माश्यांच्या कालवणाचा सुगंध अक्ख्या घरात पसरला होता. सुरुवातीला घासफूस खाणाऱ्या लोकांना जेवू घातले आणि नंतर एकसाथ मांसाहारी लोकांनी स्वयंपाकावर आडवा हात साफ केला, काही वेळापूर्वी भरलेली कालवणाने भरलेली पातेली, चपात्यांनी भरलेल्या टोपल्या रिकाम्या झाल्या अन आजूबाजूला पसरलेले होते ते माशांचे काटे आणि खेकड्यांच्या पेट्या. अहाहा... एवढं सगळं खावून झाल्यावर शरीर थकणे स्वाभाविक होते आणि त्यास आता विश्रांतीची गरज होती. सर्वांनी सावलीखाली जागा पाहून पथाऱ्या पसरल्या आणि निद्रादेवीस अधिष्ठान घातले. मीही झोपी जाण्याच्या विचारात होतोच, तोवर काही पारंपारिक वाद्यांचा आवाज कानात घुमला, रस्त्यावर येवून पाहिले तर डोळ्यांसमोर एक छोटेखानी मिरवणूक तरळली. एका हातगाडीवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवलेली होती, तीस फुलांच्या हारांची आरास घालण्यात आलेली होती, आजूबाजूला पारंपारिक वेशभूषेत दिसणारे मावळे, शस्त्रास्त्रे ज्यामध्ये दांडपट्टा, काही तलवारी मांडल्या होत्या. गावाच्या मधल्या रस्त्यावरून ही मिरवणूक येत होती आणि प्रत्येक घरासमोर थांबत होती. त्या त्या घरांतल्या सुवासिनी पंचारतीचे ताट घेवून महाराजांचे औक्षण करत होत्या, आबालवृद्ध मंडळी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत ही मिरवणूक चालली होती. आजच्या दिवसातील हे दुसरे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य होते, वेळास गावच्या गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा आमची मने जिंकली होती, आणि खुद्द शिवरायांनीसुद्धा या ग्रामस्थांना स्वर्गातून भरभरून आशीर्वाद दिले असतील. मनोमन शिवरायांना वंदन करून मीही थोडी विश्रांती घेतली.

            निश्चयाचा महामेरू | बहूत जनांसी आधारू |
            अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

            यशवंत कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
            पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा ||

            या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
            महाराष्ट्रधर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||


आजच्या सायंकाळी “समुद्रमंथन” करायचे होते, अर्थात मिळणार तर काहीच नव्हते, ना विष ना अमृत. जवळजवळ एक तास सगळे समुद्राच्या लाटांवर स्वार होवून नुसता धिंगाणा घालत होते, एक गोष्ट नक्की की, इथल्या गावांवर निसर्गाची मेहेरनजर आहे. इथले समुद्र किनारे स्वच्छ आहेत, समुद्राचे पाणी देखील स्वच्छ आहे. जवळपास दोन तास डुंबून झाल्यावर सूर्याने आजच्या दिवसाचा निरोप घेतला, मनभावन असा सूर्यास्त पाहून घरी परतलो आणि गोड्या पाण्याची अंघोळ केली. आई गं, काय सांगू समुद्राची वाळू कुठे कुठे जावून बसली होती. लगोलग आवरून घेतले आणि संध्याकाळच्या जेवणाच्या माध्यमातून अनेक कोंबड्या फस्त केल्या व त्यांचे जीवन सार्थकी लावले म्हणा. संध्याकाळी सर्वजण जमलो, अंताक्षरी खेळलो, गप्पाटप्पांचा कार्यक्रम झाला. आता वेळ होती झोपेची, अंगणात मिळेल त्या जागी पथारी पसरली आणि उद्या सकाळी लवकर उठून हरिहरेश्वर जवळ करायची ओढ मनात दाटवली आणि झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाग आली, सगळ्यांना जागे करून आवरण्यास सुचवले. पाटील काकांनी गरमागरम नास्त्याची व्यवस्था केली, नास्ता उरकला आणि सामानाची बांधाबांध केली. इथून निघताना पाय तर जड झाले होतेच परंतु अवचितपणे मनात कासवांचे दुडूदुडू चालणे एक आत्मिक समाधानाची अनुभूती करून देत होते. सर्वांना पुन्हा नक्की परत येवू असे सांगून गाडीने वेश्वी गावाकडे कूच केले. नदीच्या पलीकडच्या बाजूस हरिहरेश्वरला आम्हास फेरी बोटने जायचे असल्यामुळे आणि गर्दी टाळण्यासाठी केलेली ही धडपड. जेटीवर बोट निघण्यास तयार होती, आम्ही तिकिटे घेतली व गाडीस बोटीवर चढवले. फारतर १० मिनिटांचा हा प्रवास पण एक वेगळाच अनुभव. कोकणात अशा बऱ्याच ठिकाणी फेरी बोट चालतात, मला सर्वात जास्त आवडलेली फेरी बोट म्हणजे जयगड ते तवसाळ दरम्यानची, बोटीच्या चालकाने १५ मिनिटांसाठी ती बोट मला चालवायला दिली होती, अर्थात तो बाजूला उभा होताच. दुसऱ्या बाजूच्या गावात आम्ही उतरलो ते गाव होते, बागमंडले. इथून पुढे ४ किमी अंतर कापून गाडी दक्षिण काशी तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर इथं पोहोचली. सर्वांनी आवश्यक सामान आणि कॅमेरे बरोबर घेतले व मंदिराकडे प्रस्थान ठेवले.



 मुख्य मंदिर संकुलात दोन वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत, एक म्हणजे श्री काळभैरवनाथ आणि दुसरे श्री हरेश्वर. माझा वैयक्तिक मंदिरांतील देवांवर विश्वास नसल्याने मी मंदिरात जाणे टाळले, इतर सर्वजण दर्शन घेवून बाहेर आले आणि आम्ही प्रदक्षिणा मार्गावर चालू लागलो. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने एका उंच टेकडीवर जाणारी पायवाट नंतर पायरीमार्गाने समुद्रकिनारी उतरते. तिथून किनाऱ्यावरून चालत आपण परत मंदिरापाशी येतो, हीच ती प्रदक्षिणा. समुद्राला ज्यावेळी भरती आलेली असते त्यावेळी ही प्रदक्षिणा पूर्ण होत नाही, तर ओहोटीच्या दिवशी ती अलगद पूर्ण करता येते. ज्यांना काशीला जायला जमले नाही, त्यांनी जरूर इथं यावे असे म्हणतात. दरम्यानच्या काळात आमच्यातील काही जणांनी प्रदक्षिणा मार्ग टाळून बोटिंग करण्यास निघून गेले, ते डॉल्फिन सफारीपण पाहून आले. आम्ही तोवर समुद्राच्या प्रत्येक एका लाटेसोबत फोटो काढण्याच्या मोह उरकून घेतला. साधारण एक तास कल्ला करून झाल्यावर परतीच्या प्रवासास निघण्याचे ठरले आणि शेवटचे ग्रुप फोटो सेशन उरकून घेवून गाडीने माणगाव कडे प्रस्थान ठेवले. माणगावमध्ये दुपारचे जेवण आणि समारोपाचे दोन शब्द सगळ्यांकडून वधवून घेतले, आणि मग ताम्हिणी घाटमार्गाने आमच्या गाडीने आमच्या कर्मभूमीत प्रवेश ठेवला.

शेवटी,

ससा रे ससा की कापूस जसा,
त्याने कासवाशी पैज लाविली,
बिगी बिगी धावू अन डोंगरावर जावू,
अशी शर्यत रे आपली...

      लहानपणाची आठवण करून देणाऱ्या या ससा आणि कासवांच्या शर्यतीत जिंकतं ते कासवचं! कारण सोप्प आहे, जन्मापासूनच त्याला त्याच्या घराकडे म्हणजेच उद्दिष्टाकडे जाण्याची लागलेली ओढ. ते उद्दिष्ट साध्य करत असताना ते अतिशय संयमितपणे चार पावले चालते आणि डोके वर करून तपासून घेते की माझे लक्ष्य अजून किती दूर आहे. परत चार पावले आणि परत चाचपणी. इथं जर ससा असता तर त्याने धूम ठोकली असती आणि काही अंतर जावून तो थकून गेला असता, आणि ध्येय्यापासून मुकला गेला असता. आपणही म्हणजेच मानव जातीनेसुद्धा कासवाप्रमाणे संयमाने चालत राहिलो, तर आपलीही उद्दिष्टप्राप्ती होईल आणि त्याचा आनंद काही वेगळाच असेल.



      वेळास इथं कासव महोत्सव पाहण्यास आलेल्या आमच्या सदस्यांचे #IndiaTreks तर्फे हार्दिक आभार! लवकरच भेटू अशाच दर्जेदार आणि विषयांकित भटकंती सहित, धन्यवाद!!


आपला,

श्री. अभिजीत शिंदे.
पुणे, महाराष्ट्र.
+९१ ९५२७३३०५६७.

2 comments:

  1. खुप खुप साभार
    लेख हा खूप सूंदर लिहला असून एक ठिकाण डोळ्यासमोरून जसेच्या तसे जाते.

    ReplyDelete