सह्याद्रीच्या कुशीतील आणि कोयना धरण परिक्षेत्रातील अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या किल्यांपैकी एक हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण ४००० फूट उंचीचा आणि वनदुर्ग प्रकारातील आहे. देशभरातील सर्व गिर्यारोहकांचे आकर्षण आणि सर्वात आवडता किल्ला असं वर्णन करता येईल. #छत्रपती_शिवाजी महाराजांनी हा किल्ला 16 व्या शतकात #हिंदवी_स्वराज्यात सामावून घेतला आणि ह्या किल्ल्याचे नामकरण #व्याघ्रगड असे केले. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीव समृद्ध बनला आहे. किल्ल्याच्या परिसरात वाघ, बिबटे, रानकुत्रे, अस्वले, गवे आणि अनेकविध जातींचे साप आणि इतर अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे.
संक्षिप्त इतिहास: जावळीच्या खोऱ्यातील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल खानाच्या वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी #ताई_तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला आणि अजिंक्य ठेवला. तिथून पुढच्या काळात हा किल्ला #ताई_तेलीणीचा_किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. याच दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो . समोरच मारुतीचं बिन छपराचं सुंदर मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचील पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. काळकाईच्या ठाण्यावरून सरळ पुढे पाहिल्यास दोन सुळके दिसतात, त्यापैकी एका सुळक्यावर भगवा ध्वज फडकताना दिसतो, हा सुळका म्हणजेच #नागेश्वर होय. ह्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर सर्व ऋतूंमध्ये निसर्ग पाण्याचा अभिषेक घालत असतो.
मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही पाण्याची टाकी काही अंशी मातीने भरलेली आहेत व माती उपसून टाके स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय. आता या गडावर जाणारी वाटा अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदांचा मुक्त वावर असल्याने सहसा येथे कोणी जात नाही. वनखात्याने जुन्या वासोट्यावर जाण्यास बंदी घातलेली आहे. पूर्वीच्या काळी बाबूकड्यावरून गुन्हेगारांना #कडेलोटाची म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. नव्या वासोट्यावरून जेव्हा आपण दरीत पाहतो तेव्हा एका स्वर्गस्थ अनुभवाचे आपण साक्षीदार होतात.
मागच्या आठवड्यात येत्या रविवारी कुठंतरी ट्रेकला जावं असं मनात आलं आणि एवढ्यात फोनचा आवाज झाला आणि पाहतो तर काय, आमचे सह्यमित्र डॉ. धुमाळ साहेबांचा कॉल होता. साहेबांनी फोनवर लगेचच फर्मान सोडले की आपण शनिवारी दुपारी वासोट्यासाठी निघतोय, क्षणाचाही विलंब न करता मी येणार असं सांगून टाकलं. बरोबर आमचा अजून एक रांगडा सह्यमित्र सर्वेश उर्फ नाना येणार असल्याचे कळले मग काय "दुग्धशर्करा" योगच हो. शनिवारी दुपारीच ऑफिसचे सगळे काम उरकले आणि कल्टी मारली. नानाच्या गाडीतून तडक शिरवळ गाठले आणि आमच्या सह्यमित्रांना मिठीच मारली. डॉक्टर साहेबांचे मित्र डॉ. प्रविण, डॉ. स्वप्नील, डॉ. उगले बंधू, दोन भाचे, सचिन आणि भोळे काका असा 11 जणांचा घोळका वासोटा मोहिमेसाठी सज्ज झाला. सामानाची जुळवाजुळव केली आणि सर्व सामान गाड्यांमध्ये भरले. शेवटी डॉक्टर साहेबांच्या गाडीचे स्टेरिंग व्हील कोणाकडे असेल यावर घमासान चर्चा झाली आणि अर्थातच ही जबाबदारी मी सर्वेशकडून हिसकावून घेतली आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
सायंकाळच्या सुमारास आम्ही बामणोली गाव गाठले, गावातील जलतारा नामक हॉटेल बुक केलेले होते. लगोलग जागा हेरून मुक्कामाचे तंबू ठोकून घेतले आणि गप्पाटप्पा चालू झाल्या, टेबल सजले, त्यावर आंबळी, मरळ या डिशेस येऊन थांबत होत्या आणि संपत पण होत्या. गाण्यांचा, डब्बे वादनाचा आणि तुफान नाचण्याचा कार्यक्रम रात्री 12 वाजेस्तोवर चालू राहिला. मी मात्र बरेच दिवस राहून गेलेला किल्ला पाहायला मिळणार या स्वप्नात रमलो आणि झोपी गेलो.
डॉक्टर साहेबांनी सकाळी 6 वाजता आरोळी ठोकली, आणि ताडकन उठलो. तंबू आवरला आणि फ्रेश झालो. चहा घेतला, इतर सदस्य एकेक करून उठले आणि तयार झाले. नानाने तोवर बोट बोलावली होतीच. बोट आली आणि श्री. कदम यांचेशी भेट झाली, तेच आमचे सारथी आणि आजचे मार्गदर्शक म्हणून बरोबर राहणार होते. सगळे बोटीवर स्वार झालेवर कदमांनी बोटीच्या इंजिनाला हँडल मारले आणि बोट वासोट्याकडे रवाना झाली. "शिवसागर" जलाशयाच्या निळ्याशार पाण्यातून बोट लाटा उमटवत मार्गक्रमण करत होती आणि उत्कंठा शिगेला पोहोचत होती. वनविभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आणि बोटीचा प्रवास पुढे चालू झाला. कदमांची बोट फारच स्लो होती, इतर बोटी सपासप पुढे निघून जात होत्या, विचारणा केली असता इंजिनाचा डिझेल पाईप लीक असल्याचे कळले. मजल दरमजल करत सकाळी 1130 ला बोट वासोट्याच्या धक्क्याला लागली आणि आवराआवर करून बोटीतून एकदाच बाहेर पडलो. ओळख परेड झाली आणि वेळ न दवडता ट्रेकला सुरुवात केली.
वासोटा किल्ला वनविभाच्या अखत्यारीत येतो आणि संरक्षित असल्यामुळे प्लास्टिक किंवा इतर निसर्गास हानी पोहोचवणाऱ्या वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. पाण्याच्या बाटल्यांची गणती करून अनामत रक्कम घेतली जाते. परत येताना वर नेलेल्या बाटल्या दाखवल्या की अनामत रक्कम अर्थातच परत मिळते. आम्ही प्रत्येकी 3 लिटर पाणी आणि खायला चटरफटर बरोबर घेतले आणि गर्द जंगलात शिरलो. जंगल घनदाट जरी असले तरी वाट मळलेली आहे, दिवस मावळण्यापूर्वी गड उतरला तर शक्यतो वाट चुकण्याचा काही संबंध येत नाही. विविध प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांविषयीचे माहिती फलक वाचत गप्पागोष्टी करत चाल सुरू ठेवली. चढाई श्रेणी मध्यम आहे आणि गर्द झाडी असल्यामुळे उन्हाचा फार त्रास होत नाही. साधारण दीड तास चालल्यावर पडझड झालेला बालेकिल्ला दृष्टीपथात येतो आणि काही वेळासाठी जंगल नाहीस होतं. शेवटच्या टप्प्यात कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो आणि आपल्या ट्रेकच्या चढाईचा टप्पा पूर्ण होतो. किल्ला पाहून झाला आणि उतरायला सुरुवात केली, साधारण एक तास तीव्र उतारावर आदळआपट होत होत खाली आलो. उन्हाळ्याच्या दिवसांत वाटेतील माती भुसभुशीत आणि घसरडी होते, अर्थातच चांगल्या दर्जाचे बूट घातले असले तरीही पृष्ठभागाला सह्याद्रीचा प्रसाद मिळतोच. शेवटचा उतार झाल्यावर विसावा घेण्यास थांबलो, सर्व जण एकत्र आले आणि बोटीकडे कूच केले. अर्थातच सर्वजण थकले होते, मीही थकलो होतो पण आमचा "चॉकलेट बॉय" अजिबात थकला नव्हता आणि मला बोटीत एकच काम बाकी होतं ते म्हणजे नानाचं फोटो सेशन, विविध पोजेस आणि अँगल मधले फोटो घेणं चालूच राहिलं. एकूण 300 च्या आसपास फोटो काढले त्यातले किमान 150 फोटो एकाच व्यक्तीचे असतील. उशिरा सायंकाळी बोट परत धक्क्याला लागली आणि ट्रेक संपला. बॅगा परत गाडीत भरल्या आणि ट्रेकच्या सुंदर आठवणी मनात साठवून परतीचा प्रवास धरला. भेटू परत अशाच दर्जेदार किल्ले आणि घाटवाटा भटकंती सह... जय जिजाऊ, जय शिवराय!!







येवढा वीस्तुत छान लेख,शब्धान्चि योग्य संगळ पदोपदी आपण सोबत चालत असून त्या एक-एक क्षणाचा सोबत घटनांचा साक्षीदार राहत आहे. याप्रमाणे एक रेखीव स्वरूपात मांडणी आहे. खरंच अपेक्षे पेक्षा उत्कुश्ठ स्वरूपातील हा लेख असून शेवट हा हरिश्चंद्र आणी त्याच्या एक एक दगड, नद्या, झाडे ,फुले यांचा बारीक इतिहास जो मांडला तो सूंदर...! खरंच खूप छान प्रवासवर्णन आहे .नंदू नारखेडे पाटील.
ReplyDelete