Monday, September 2, 2019

राजा कृष्णदेवरायांची “हंपी” – भाग २ रा...

राजा कृष्णदेवरायांची “हंपी” – भाग २ रा...


     


दिवस ३ रा – होस्पेट ते हंपी प्रवास आणि हंपी दर्शन ...

      सर्वचजण हंपीला जाण्यासाठी उत्सुक तर होतेच, सर्वांनी सकाळी लवकर उठून तयारी केली आणि हॉटेलमधला उत्कृष्ट असा दाक्षिण्य पद्धतीच नाश्ता उरकून हंपीकडे प्रस्थान सोडले, अगदीच १० ते १५ मिनिटांत “विजयनगर साम्राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहे” असा फलक नजरेसमोर दिसला, त्याअगोदर एका धरणाच्या भिंतीवर थांबून थोडेसे फोटोसेशन उरकून घेतले, समोर विस्तीर्ण पसरलेली केळीची बाग आणि ऊसपट्टा लक्ष वेधून घेत होता, वातावरणात आल्हाददायक गारवा होताच आणि दक्षिणेकडचा दमटपणा देखील. बाईकर्सना “विजय विठ्ठल” मंदिरापाशी भेटण्याची सूचना आधीच दिलेली होती परंतू डॉक्टर साहेबांच्या बुलेटने सकाळी चालू होण्यास सपशेल नकार दिला आणि त्यांची धावपळ चालू झाली, सगळी सर्वेशची कमाल अन धमाल. साधारण २० मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही मंदिर परिसरात येवून पोहोचलो, वाटेत एक वैशिष्ट्यपूर्ण कमान दिसली. मंदिराच्या अलीकडेच एक किमी अंतरावर वाहनतळ आहे, तिथून पुढचा प्रवास पायी चालत किंवा प्रदूषण विरहीत वाहनाने करावा लागतो. आम्ही अर्थातच पायी जाण्याचे ठरवले, १५ मिनिटांच्या पायपिटीनंतर समोर विजय विठ्ठल मंदिर संकुल दिसले. तिकिटे काढून तडक आत गेलो, मंदिर प्रांगण इतकं विस्तीर्ण आहे की काय पाहू अन काय नको असं होतं, समजत तर काहीच नाही. आम्ही माहितगार व्यक्ती घेतली, आनंद त्याचे नाव. मितभाषी, संयमी आनंदने आम्हास संपूर्ण मंदिराचा इतिहास प्रात्यक्षिकासहित सांगितला. मंदिराचे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिल्यांदा आपणास दिसतो तो गरुडरथ ज्यास भारतीय रिजर्व बँकेने आपल्या रुपये ५० च्या चलनी नोटेवर चित्रित केलेले आहे. विठ्ठलाच्या आरतीमधले “गरुड हनुमंत पुढे उभे राहती” तोच हा गरुडरथ. रथाची चारही चाके काही वर्षांपूर्वी फिरत्या अवस्थेत होती, परंतु पुरातत्व विभागाने त्याची झीज होवू नये म्हणून त्यांस स्थानबद्ध करून ठेवलेली आढळतात. गरुडरथाची माहिती घेवून इथं मनसोक्त फोटोसेशन करून घेतले. 







      विजय विठ्ठल मंदिराचा मुख्य गाभारा आजमितीला विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीविना सुनासुना आहे कारण, इथला विठूराया आमच्या महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये विसावला आहे. सुरेश भटांच्या अभंगांमध्ये त्याच हे विलोभनीय वर्णन आढळते, “कानडा राजा पंढरीचा”. बहामनी सुलतानांच्या आक्रमणांनी हा प्रदेश उध्वस्त होत असताना इथल्या मुख्य पुजाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सुरक्षितपणे पंढरपूर येथे आणून त्यंची प्रतिस्थापना केली. यावरही बरेचसे मतभेद आहेत, असो. या मंदिराचा सभामंडप ५६ खांबांवर उभारलेला असून त्यातील काही खांब हवेत तरंगते आहेत. याच सभामंडपात राजा कृष्णदेवरायाचा दरबार भरत असे. दरबाराचे काम संपल्यावर इथं राजासाठी मैफल होत असे. या सभामंडपाच्या ५६ खांबावर वादक विविध तंतुवाद्ये वाजवीत असत, किती अद्भुत! कालांतराने आपल्या भारतावर इंग्रजांनी हुकुमत गाजवली, त्यादरम्यान या मंदिराचा एक खांब कापून इंग्रजांनी अभ्यासासाठी लंडनला नेला व त्या दिवसापासून इतर ५५ खांबांमधील तंतुवाद्यांचे आवाज बंद झाले ते आजतागायत बंदच आहेत. आनंदने बऱ्याच गोष्टी इतक्या बारीकपणे समजावून सांगितल्या की त्या ऐकतच राहावे असे वाटत होते. वेळ मर्यादित असल्यामुळे विठ्ठलाच्या पायाशी नमस्कार ठेवून इथून पुढच्या टप्प्यावर जाण्याचे ठरवले व काढता पाय घेतला. मी आजवर भेटी दिलेल्या ठिकाणांमधील सर्वोत्तम असे ठिकाण आज पाहण्यात आले. मंदिराच्या प्रत्येक खांबावरील कलाकुसरीची माहिती लिहिणे शक्य नाही, पण ती पाहताना आश्चर्य मात्र नक्की वाटते.


आता परत हंपी शहराकडे प्रस्थान ठेवून पुढची अजून काही विस्मरणात गेलेली ठिकाणे पहायची होती. इकडेही आम्हाला एका माहितगार माणसाची आवश्यकता होती, त्याची जागा “अली” नावाच्या एका मुस्लीम तरुणाने ती भरून काढली, सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हा तरुण मुस्लीम असूनसुद्धा हिंदू संस्कृतीचा त्याचा प्रचंड मोठा अभ्यास होता. अलीने आम्हास ४ महत्वाची ठिकाणे तसेच त्यांची इत्यंभूत माहिती देण्याचे आश्वासन दिले. क्वीन्स बाथ, होळीचा माळ, हजार राम मंदिर आणि शेवटी विरुपाक्ष मंदिर...

१.      क्वीन्स बाथ – आजकालच्या स्विमिंग पूलसारखाच परंतू आखीव रेखीव संकुल जे त्याकाळी राणीवश्याच्या अंघोळीसाठी बांधलेला एक महालच जणू. दोनमजली चार विस्तीर्ण खोल्या, बरोबर मध्ये राण्यांच्या अंघोळीचा तलाव, दासींच्या वेगळ्या खोल्या, अबब. त्या अंघोळीच्या तलावात साधारण १५ किमी अंतरावरील तुंगभद्रा नदीच्या पात्रातून एका बंदिस्त कालव्याद्वारे स्वच्छ पाणी यायचे. आज तो बंदिस्त कालवा पडझड झाल्यामुळे बंद पडलेला आहे.

२.      होळीचा माळ – एकूण ५० एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेला होळीचा माळ म्हणजेच राजा कृष्णदेवरायाचा महाल, राजदरबार, गुप्त बैठकांसाठी जमिनीच्या खाली असणाऱ्या खोल्या, वैशिष्ट्यपूर्ण अशी पायरी विहीर, जनता दरबारासाठी वेगळी जागा व होलिका उत्सव साजरा करण्यासाठीचा वेगळा माळ. आजमितीला इथली एकही वास्तू अस्तित्वात नसली तरीही त्यांची भव्यता नजरेत मावत नाही. या संपूर्ण जागेला एक बृहदमोठी अशी तटबंदी होती तसेच पूर्वाभिमुखी प्रवेशद्वाराचे दरवाजे काळ्या पाषाणांनी बनलेले होते. हे दरवाजे सकाळच्या प्रहरात चार हत्तींच्या सहाय्याने उघडले जायचे व सायंकाळच्या प्रहरात बंद केले जायचे. आजही सदर दरवाजे तिथे आडवे पडलेले आढळतात. होळीच्या माळावर प्रवेश केल्यावर आमचा बाईकर्स चमू आम्हास परत येवून मिळाला. संपूर्ण होळीचा माळ पाहायला साधारण दोन तासांचा अवधी लागतो पण आम्ही पटपट तो पाहून घेतला आणि पुढच्या वास्तूकडे कूच केले. वाटेत काळ्या पाषाणात तयार केलेली जेवणाची ताटे पाहण्यात आली तसेच दोन नंदी ज्यांच्यातून तंतुवाद्यांचे आवाज निघतात, अर्थात त्यासाठी आपल्याला आपले कान त्यावर लावावे लागतात. सारे काही अद्भुत आणि तितकेच विलोभनीय. काही वर्षांपूर्वी या परिसराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केल्यानंतर थोडे खोदकाम तथा शोधकार्य हाती घेतले होते. त्याच खोदकामात जमिनीत गाडली गेलेली पायरी विहीर सापडलेली आहे. याही विहिरीत तुंगभद्रेच्या पात्रातून खुल्या कालव्याद्वारे पाणी आणलेले आढळते. ही विहीर त्याकाळी बारमाही असायची व नंतरच्या काळात पाणी येणे बंद झाल्यामुळे ती जमिनीत लुप्त पावली गेलेली होती.

३.      हजार राम मंदिर – प्रभू रामचंद्र अयोध्येतून १४ वर्षांच्या वनवासाला निघाल्यापासून ते शबरीची बोरे, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, रावणाने सीतामातेचे केलेले अपहरण, जटायूचे रावणाशी युद्ध, जांबुवंत आणि हनुमान सेनेचे लंकेवरील आक्रमण आणि सीतामातेची सुटका असे संपूर्ण रामायण इथल्या भिंतीवर सुमारे एक हजार शिल्पांमध्ये कोरलेले आहे. म्हणूनच या मंदिरास हजार राम मंदिर संबोधले जाते. या शिल्पांची भव्यता पाहताक्षणीच डोळ्यांत भरतेच, परंतू रामायण सुद्धा डोळ्यांसमोर तरळते. राजा कृष्णदेवराया इतका मोठा रामभक्त होता की त्याने त्याकाळी इतके सुंदर शिल्प घडवले व हा वारसा आज आपल्यासाठी उपलब्ध आहे.

विरुपाक्ष मंदिर – हंपी आणि परिसरातील एकमेव मंदिर जिथे पूजापाठ आणि धर्मकार्ये चालू आहेत असे हे विरुपाक्ष मंदिर होय. विरुपाक्ष देवता महाविष्णू अवतार मानली जाते. मंदिराचा गोपूर पाहताक्षणीच मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असल्याचे जाणवून देतो. गोपुराचा रंग सोनेरी असून मावळतीची सूर्यकिरणे त्यास अजून सोनेरी करतात. हेही मंदिर बहामनी सैन्य उध्वस्त करण्यासाठी निघाले असता साक्षात विष्णूंचा अवतार असलेल्या वराहांचा एक मोठा घोळका त्या सैन्याच्या आडवा आला. आता वराह हे मुस्लिमांमध्ये निषिद्ध मानले जाते म्हणून त्यांनी विचार बदलला आणि एक मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. विरुपाक्षाची मूर्ती पुरातन तर आहेच पण बाहुबली अवतारात दिसते, पाहताक्षणीच ती जागृत असल्याचा भास झाल्यावाच्यून राहत नाही. मंदिराला साधारण ५० हून अधिक रेखीव खांब आहेत ज्यावर हेमाडपंथी कलाकुसर साकारण्यात आलेली आहे. कलाकुसरीत वापरलेले रंग आजही जसेच्या तसे सजीव वाटतात.








विरुपाक्ष मंदिर पाहून झाल्यावर आता वेळ होती या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्याची, त्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर गेलो. आधीच तिथं बऱ्याच हौशी देशी-विदेशी लोकांनी आपापल्या जागा धरून बसलेले दिसले, पाठीमागे वळून पाहिले असता विरुपाक्ष मंदिराचा गोपूर मावळतीच्या किरणांनी शुभ्र सोनेरी रंगात न्हावून निघालेला दिसला. थोड्याच वेळात सूर्यास्त झाला, मनसोक्त फोटो सेशन उरकून घेवून टेकडीच्या खालच्या बाजूस स्थित गणेशाचे दर्शन घेवून आजच्या विलोभनीय दिवसाचा समारोप केला. संध्याकाळी हंपीनजीक एका गावात जावून रात्रीच्या मुक्कामाची सोय पाहिली, ३१ डिसेंबर जो साजरा करायचा होता. बेत खूप छानपणे जमून आला, डॉक्टर आणि त्यांचा गिटार व कराओके आणि त्यांच्याच सुमधुर आवाजातील गायलेली गाणी. माझ्याकडे भट्टीवर चिकन फ्राय करण्याची जबाबदारी आली आणि तीही मी लीलया पेलून नेली. रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले व २०१८ वर्षास निरोप दिला व मोकळ्या मैदानात ठोकलेल्या तंबूंमध्ये शिरून निद्रादेवीस अधिष्ठान घातले.







१ जानेवारी २०१९ चा दिवस उजाडला अगदीच सकाळी सकाळी जाग आली. इतर भिडूंना जागे केले, थोडेसे फ्रेश होवून दाक्षिणात्य इडली सांभार, ओम्लेटवर आडवा हात मारून घेतला व विनाविलंब सामान गाडीत भरले व परतीच्या प्रवासासाठी गाडीचे स्टीअरिंग ताब्यात घेतले, बाईकर्स भिडूंचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास आरंभला. येताना इल्कल, मुधोळ, निपाणी व कोल्हापूर येथे विश्रांती घेवून रात्री ११:०० च्या दरम्यान पुणे येथे सुंदर आठवणींचा खजिना मनात साठवून पोहोचते झालो.

बादामी, पट्टडकल, आयहोळे, होस्पेट आणि शेवटी हंपी ही सहल बाईक राईड किंवा कार ड्राईवने वर्षभरात कधीही करता येते, शक्यतो उन्हाळ्याच्या चार महिन्यात गर्मीचा त्रास सहन करत करावी लागते. जाताना मनाशी एक गोष्ट ठाम करून घ्यावी की आपण नास्तिक नाही आहोत, नाहीतर ही सर्व मंदिरे नाही पाहता येत. संपूर्ण अंतरात जेवणाच्या आणि वाजवी दरात मुक्कामाचे बरेचशे पर्याय उपलब्ध आहेत. बादामीमध्ये देवीच्या पूजेचे कुपन असेल तरच आपणास भक्तनिवासात राहता येते. संपूर्ण प्रवासादरम्यान आपण कर्नाटक आणि काही वेळासाठी तेलंगाना राज्यात जातो त्यामुळे मराठी खाद्यपदार्थ निवडक ठिकाणीच मिळतात. 

आज इतकच, भेटू लवकरच अशाच दर्जेदार भटकंती आणि प्रवास वर्णनांसहित ... 

तोवर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय !!



सहभागी भिडू – डॉक्टर धुमाळ साहेब आणि त्यांची निसान टरेनो व बुलेट, देवा घाणेकर, सर्वेश धुमाळ, राहुल आणि पिया सावंत, खुशी, चैतन्य पंचपोर आणि मी टरेनोचा सारथी अभिजीत शिंदे. सर्वांचे मन:पूर्वक आभार...



संपूर्ण फोटो’ज पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा... धन्यवाद!!!


https://photos.app.goo.gl/kwzqurtLx9d1UabR6